नात्यांचे सर्व्हिसिंग
आज प्रत्येकाकडे दुचाकी किंवा चारचाकी यापैकी एक तरी वाहन
आहे, स्वतःकडे असलेल्या वाहनाला माणसं खूप जीवापाड जपताना दिसतात. तीन हजार
किलोमीटर वाहन चालले की ऑईल बदलतात, दहा हजार किलोमीटर फिरले की सर्व्हिसिंग
करतात, थोडा जरी तिचा कुरकुर आवाज आला की लगेच फिटरला दाखवतात. कारण वाहनाकडे
दुर्लक्ष केलं तर ते जीवावर बेतणारे असते. म्हणून प्रत्येक जण वेळच्यावेळी वाहनाची
सर्व्हिसिंग करतात. तीच सतर्कता मात्र माणसाची माणसासोबत वागताना आढळत नाही. छोट्या-छोट्या
गोष्टींवरून समज गैरसमज केले जातात. चांगली नाती तोडली जातात. पश्चाताप होतो,
कधीकधी तर काही नाती जीवघेणीही ठरतात, तेव्हा वाटते, आपणही नात्यांचे सर्व्हिसिंग
करायला हवे होते.
शब्दमल्हार प्रकाशित विश्वास ठाकूर लिखित ‘नात्यांचे
सर्व्हिसिंग’ (कथासंग्रह) पुस्तक खऱ्या अर्थाने मानवी नात्यांचा शोध घेणारे आहे.
या कथासंग्रहात ऐकून पंचवीस कथा आहे. लेखक बँकिंग क्षेत्राची असल्यामुळे त्यांनी
स्वतःच्या जीवनातील पंचवीस खरे अनुभव कथा रूपाने लिहिले आहेत. व्यवसायानिमित्त
संपर्कात आलेल्या वेगवेगळ्या पंचवीस व्यक्ती व त्यांच्याविषयी चांगलेवाईट अनुभव-कथा
वाचक म्हणून वाचताना पानोपानी आश्चर्याचा धक्का देऊन जातात. एरवी संत, सज्जन व
आपलासा वाटणारा माणूस प्रत्यक्षात किती वेगळा आहे हे कळते. खरंतर आज सगळं जग
पैशामागे धावते आहे. पैसा असला की माणसं गुळाला मुंग्या चिटकव्या तसे चिटकतात.
पैसा नसला की सारे जण तोंड फिरवतात. असा आपमतलबी माणूस लेखकाने नेमका रेखाटला आहे,
माणसे गरजेपुरते जवळ येतात व काम झालं की विसरून जातात. मात्र लेखकाला त्या
माणसांबद्दल बिलकुल आकस नाही, माणसं तोडायची नसतात ; जोडायची असतात ही लेखकाच्या
ठायी सकारात्मकता आहे, त्यामुळेच ते त्यांच्या क्षेत्रात यशस्वी झाले आहेत, तरीपण
माणूस म्हणून मागे वळून पाहताना त्यांना वाटते, दुरावलेल्या नात्यांत कुठेतरी
सर्व्हिसिंग व्हायला हवे होते.
सर्व्हिसिंग म्हणजे निर्माण झालेल्या गैरसमजावर मनमोकळी
चर्चा असा लेखकाला अर्थ अपेक्षित आहे, कारण प्रत्येक समस्येवर मनात किंतु न ठेवता
चर्चा केली मार्ग निघू शकतो. परंतु तसं न होता माणूस भावनेच्या गर्तेत फसत वेगळीच
समस्या उभी करतो. मग नको त्या परिणामाला सामोरे जावे लागते. त्यामुळे यंत्राची
आपल्यापणाने सर्व्हिसिंग करणाऱ्या माणसांनी नात्यांची पण सर्व्हिसिंग तितक्याच
जागरूकतेने करायला हवी हे समर्पकपणे लेखकाने या कथासंग्रहातून सूचित केले
आहे.
लेखकाने कथन केलेल्या अनुभव-कथा बँकिंग व्यवसायाशी संबधी
असल्या तरी वाचक म्हणून आपल्याशा वाटतात. प्रत्येक कथेचा शेवट उत्कंठावर्धक आहे,
विषयाला धरून प्रत्येक कथेची बांधणी केलेली आहे, कथा वास्तववादी असल्यामुळे
कंटाळवाणे वाटत नाही. शब्द साधेसोपे आहे. वाचकाला खिळवून ठेवण्याची ताकद कथांमध्ये
आहे, त्यामुळे प्रथितयश कथाकाराला लाजवेल असा ‘नात्यांची सर्व्हिसिंग’ कथासंग्रह
तयार झाला आहे. ‘पुढच्यास ठेच मागचा शहाणा’ समजून आपल्या आयुष्यात पेचप्रसंग
थोडेबहुत कमी करायचे असल्यास ‘नात्यांची सर्व्हिसिंग’ कथासंग्रह नक्की वाचला
पाहिजे. लेखकाचा भविष्यकाळ उज्वल आहे. पुढील लेखनास शुभेच्छा.
पुस्तक - नात्यांचे सर्व्हिसिंग (कथासंग्रह)
लेखक - विश्वास जयदेव ठाकूर
प्रकाशक - शब्दमल्हार प्रकाशन, नाशिक.
मूल्य - ९९/-
आस्वादक – संजय द. गोराडे (नाशिक)
मो नं - ९८५०६९१२१६
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें