बुधवार, 20 अक्टूबर 2021

नात्यांचे सर्व्हिसिंग (कथासंग्रह)


नात्यांचे सर्व्हिसिंग

आज प्रत्येकाकडे दुचाकी किंवा चारचाकी यापैकी एक तरी वाहन आहे, स्वतःकडे असलेल्या वाहनाला माणसं खूप जीवापाड जपताना दिसतात. तीन हजार किलोमीटर वाहन चालले की ऑईल बदलतात, दहा हजार किलोमीटर फिरले की सर्व्हिसिंग करतात, थोडा जरी तिचा कुरकुर आवाज आला की लगेच फिटरला दाखवतात. कारण वाहनाकडे दुर्लक्ष केलं तर ते जीवावर बेतणारे असते. म्हणून प्रत्येक जण वेळच्यावेळी वाहनाची सर्व्हिसिंग करतात. तीच सतर्कता मात्र माणसाची माणसासोबत वागताना आढळत नाही. छोट्या-छोट्या गोष्टींवरून समज गैरसमज केले जातात. चांगली नाती तोडली जातात. पश्चाताप होतो, कधीकधी तर काही नाती जीवघेणीही ठरतात, तेव्हा वाटते, आपणही नात्यांचे सर्व्हिसिंग करायला हवे होते.


शब्दमल्हार प्रकाशित विश्वास ठाकूर लिखित ‘नात्यांचे सर्व्हिसिंग’ (कथासंग्रह) पुस्तक खऱ्या अर्थाने मानवी नात्यांचा शोध घेणारे आहे. या कथासंग्रहात ऐकून पंचवीस कथा आहे. लेखक बँकिंग क्षेत्राची असल्यामुळे त्यांनी स्वतःच्या जीवनातील पंचवीस खरे अनुभव कथा रूपाने लिहिले आहेत. व्यवसायानिमित्त संपर्कात आलेल्या वेगवेगळ्या पंचवीस व्यक्ती व त्यांच्याविषयी चांगलेवाईट अनुभव-कथा वाचक म्हणून वाचताना पानोपानी आश्चर्याचा धक्का देऊन जातात. एरवी संत, सज्जन व आपलासा वाटणारा माणूस प्रत्यक्षात किती वेगळा आहे हे कळते. खरंतर आज सगळं जग पैशामागे धावते आहे. पैसा असला की माणसं गुळाला मुंग्या चिटकव्या तसे चिटकतात. पैसा नसला की सारे जण तोंड फिरवतात. असा आपमतलबी माणूस लेखकाने नेमका रेखाटला आहे, माणसे गरजेपुरते जवळ येतात व काम झालं की विसरून जातात. मात्र लेखकाला त्या माणसांबद्दल बिलकुल आकस नाही, माणसं तोडायची नसतात ; जोडायची असतात ही लेखकाच्या ठायी सकारात्मकता आहे, त्यामुळेच ते त्यांच्या क्षेत्रात यशस्वी झाले आहेत, तरीपण माणूस म्हणून मागे वळून पाहताना त्यांना वाटते, दुरावलेल्या नात्यांत कुठेतरी सर्व्हिसिंग व्हायला हवे होते.


सर्व्हिसिंग म्हणजे निर्माण झालेल्या गैरसमजावर मनमोकळी चर्चा असा लेखकाला अर्थ अपेक्षित आहे, कारण प्रत्येक समस्येवर मनात किंतु न ठेवता चर्चा केली मार्ग निघू शकतो. परंतु तसं न होता माणूस भावनेच्या गर्तेत फसत वेगळीच समस्या उभी करतो. मग नको त्या परिणामाला सामोरे जावे लागते. त्यामुळे यंत्राची आपल्यापणाने सर्व्हिसिंग करणाऱ्या माणसांनी नात्यांची पण सर्व्हिसिंग तितक्याच जागरूकतेने करायला हवी हे समर्पकपणे लेखकाने या कथासंग्रहातून सूचित केले आहे.   


लेखकाने कथन केलेल्या अनुभव-कथा बँकिंग व्यवसायाशी संबधी असल्या तरी वाचक म्हणून आपल्याशा वाटतात. प्रत्येक कथेचा शेवट उत्कंठावर्धक आहे, विषयाला धरून प्रत्येक कथेची बांधणी केलेली आहे, कथा वास्तववादी असल्यामुळे कंटाळवाणे वाटत नाही. शब्द साधेसोपे आहे. वाचकाला खिळवून ठेवण्याची ताकद कथांमध्ये आहे, त्यामुळे प्रथितयश कथाकाराला लाजवेल असा ‘नात्यांची सर्व्हिसिंग’ कथासंग्रह तयार झाला आहे. ‘पुढच्यास ठेच मागचा शहाणा’ समजून आपल्या आयुष्यात पेचप्रसंग थोडेबहुत कमी करायचे असल्यास ‘नात्यांची सर्व्हिसिंग’ कथासंग्रह नक्की वाचला पाहिजे. लेखकाचा भविष्यकाळ उज्वल आहे. पुढील लेखनास शुभेच्छा.

पुस्तक - नात्यांचे सर्व्हिसिंग (कथासंग्रह)

लेखक - विश्वास जयदेव ठाकूर

प्रकाशक - शब्दमल्हार प्रकाशन, नाशिक.

मूल्य - ९९/- 


आस्वादक – संजय द. गोराडे (नाशिक)

मो नं - ९८५०६९१२१६                    

 

बुधवार, 6 अक्टूबर 2021

गुलमोहराचं कुकू


‘गुलमोहराचं कुकू’

नाशिकचे युवा कवी प्रशांत केंदळे यांचा बहुचर्चित कवितासंग्रह ‘गुलमोहराचं कुकू’ वाचकास निसर्गाची सैर करत छान वाचनानंद देतो असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. हा कवितासंग्रह निसर्गाविषयी आपुलकी निर्माण करत माणसाच्या नकळत जाणिवा आणि नेणीवा जागृत करत सामाजिक भान देतो. निसर्गाची वेगवेगळी रूपके वापरून गुंफलेल्या कवितांमधून कवी सहज माणसातील माणूसपण जागे करतो व निसर्गाविषयी गोडी निर्माण करत आत्मचिंतन करायला भाग पाडतो.   

   ‘गुलमोहराचं कुकू’ कवितासंग्रह चार विभागात विभागलेला आहे. पहिला विभाग ‘माझ्या कवितेचा मळा’ शीर्षकाचा आहे. कवीच्या या कवितेच्या मळ्यात वाचक म्हणून फेरफटका मारताना कितीतरी कविता ओठावर अलगद सूर धरून गुणगुणाव्याशा वाटतात. निसर्गाचा संसर्ग झालेला कवी स्वतःच निसर्ग झाल्याचे पानोपानी कबूल करतो. त्याच्या देहातच निसर्ग भिनलेला असल्याने त्याची कविता निसर्गोद्गार काढत स्वतःचं वेगळेपण सिद्ध करते.

दिले कवितेने सारे

कवितेला काय देऊ

गात काळजाचे गाणे

देह सरणावर ठेवू

      कवितेमुळे जगण्याला एक वेगळीच संमृद्धता आली आहे. त्यामुळे शेवटच्या श्वास असेपर्यंत त्याला कवितेसाठी जगायचं आहे. कारण कवितेने कवी म्हणून दिलेला सन्मान त्याला जिवापेक्षा अनमोल वाटतो, म्हणून तो स्वतःला कवितेच्या शब्दपालखीचा भोई समजतो. शेतीमातीच्या प्रतिकांनी नटलेली प्रत्येक कविता कवी कुणब्याच्या रुपात खूपच छान पद्धतीने परिचय करून देतो.

पाण्यापरी विहिरीच्या खोल पाख्यातून यावी

कवितेने माझ्या शब्दांना गा संजीवनी यावी

           त्याच्या प्रत्येक कवितेचा शब्द विहिरीच्या खोल पाख्यातून पाणी झिरपावे तसे आहे. असे आत्मचिंतनातून योजलेले शब्द कवितेसाठी संजीवनी ठरतात. असा कुणबी रुपी कवी कवितेच्या मळ्यातून विठू मातीचा देह, गाव, पाडा, सुडी, तुकोबा, कुणब्या रे गड्या अशा एक से बढकर एक कविता वाचत वाचत वृक्षाच्या लळा लावत संग्रहाच्या दुसऱ्या भागात कधी आणून सोडतो कळत नाही.

झाडाचं व्रत घेऊन शिकत जावं देणं

साऱ्या देहाला फुटावी हिरवी हिरवी पान

           झाडे माणसांना सावली, फळे, फुले, लाकूड व पक्ष्यांना निवारा देत असतात, त्याला फक्त देणं माहीत असतं, त्याचं हे समर्पणाचं व्रत आपण माणूस म्हणून शिकलं पाहिजे हे कवीने या कवितेतून सुंदर रीतीने मांडले आहे.

रोप रोप लावताना

वाटे लावतो पणती

हीच मातीची दिवाळी

हिरवी मिणमिणती

           ‘रोप लावताना’ या कवितेत कवीला लावलेली रोपं पणतीप्रमाणे भासतात. त्या दिवशी मातीला खऱ्या अर्थाने दिवाळी असल्यासारखे वाटते. जेव्हा याच रोपांची झाडे होतात ; तेव्हा मातीच्या स्वप्नातील पाऊस होतात तर वर्तमानातील श्वास होतात. अशी ही झाडं येणारा भविष्यकाळ उज्ज्वल ठेवायचा असेल तर जपायला हवी. बुजुर्ग, वैभव, झाड तुटताना अशा मोजक्या पण वेगवेगळ्या कवितांमधून कवीने वृक्षांची महती खूप मार्मिकपणे मांडलेली आहे.

          कवितासंग्रहाचा तिसरा विभाग ‘काळीजकळा’ आहे. या तिसऱ्या विभागात कवीने काळजातील नात्यांचा भावबंध उलगडून सांगितला आहे. काळजात काट्याप्रमाणे खुपणाऱ्या व फुलाप्रमाणे सुखवणाऱ्या नातेसंबधावर प्रकाश टाकला आहे. ‘माय’ या कवितेत कवी केंदळे यांनी मायबाप विषयक केलेलं वर्णन तर अक्षरशः काळीज पिळवटून टाकणारे आहे.

वेडी बाभूळ वाढते साय खाऊन उन्हाची

वाटे मला माझी माय लेक तशीच रानाची

कवीने जाणीवपूर्वक मायेला योजिलेली वेड्या बाभळीची प्रतिमा खूप अर्थपूर्ण आहे. कारण बाभळीचं झाड कोणी ठरवून लावत नसते. ते स्वतःहून कुठेतरी बांधाला उगते व बिनापाण्याचे साय खाऊन वाढते. असं हे काटेरी जिणं नशिबी असलेल्या बाभळीत कवीला स्वतःची माय दिसते तर बाभळीच्या लाकडात घराचा आधार वाटणारा बाप मेढीसारखा भासतो. असं मुलांसाठी आयुष्याचं सरपण केलेल्या मायबापाला जपायलाही सांगायला कवी कवितेच्या शेवटी विसरलेला नाही. अशा नात्यांवर आधारलेल्या व निसर्गाच्या प्रतिकांनी फुलवलेल्या कविता वाचकाच्या काळजात खूप खोल स्पर्श करून जातात. ‘बाप लेकीची कहाणी’ या कवितेत बापाची लेकीबद्दल असलेला हळवा कोण मांडला आहे. ‘जन्म बाईचा असा’ या कवितेत बाई कुटुंबासाठी कशी रात्रंदिवस धुपते हे सांगितले आहे. आजी, सये, नाते, बांध, बाप कर्जात बुडला या कविता वाचक म्हणून वाचताना डोळे पान्हावतात.  

शेवटचा विभाग ‘ऊन झळा पाऊस कळा’ आहे, ऊन झळा सोसून व पाऊस कळा झेलून वाट्याला आलेल्या परिस्थिती या विभागात मांडली आहे. ‘ऊन वाढत जाताना’ या कवितेतील ‘ऊन वाढत जाताना आटत जातं तळं, मातीच्या आतडीचा कळू लागतो पीळ’ ओळी जीवनविषयक सल मांडत नभाला आळवणी करताना कवी दिसतो. ‘गुलमोहराचं कुकू’ या शीर्षक कवितेत कवी मातीसोबत पावसाला लगीन करायला सांगत भांगेत गुलमोहराचं कुकू भरत म्हणतो.

आता पावसा माताशी कर लगीन साजरं

गुलमोहराचं कुकू तिच्या भांगामधी भर

  पावस आणि मातीच्या लगीन सोहळा कवीने कवितेतून खूप छान मांडला आहे. बाभळीची पिवळी फुले म्हणजे कवीला हळद सोहळा वाटतो, वाळलेली पाने अक्षदा वाटतात. ऊन अंतरपाट वाटतो, अशी विविध रूपके वापरून कवितेतून उभा केलेला लगीन सोहळा खरोखर कवीच्या प्रतिभेचा उच्चांक आहे.  क्षणभर वाचक खरोखर या अनोख्या लगीन सोहळ्यात हरवून जातो. मात्र पाऊस आणि मातीचा संसार टिकला तर आपसूकच माणसाच्या जीवनात संमृद्धता येईल असे कवीला या कवितेतून अप्रत्यक्षपणे सुचवायचे असल्याचे जाणवते, अशा शेतीमातीशी सांगड घालत परिस्थितीबद्दल अवगत करून देणाऱ्या कविता वाचकाला नक्कीच अंतमुर्ख करायला लावणाऱ्या आहेत. अरे नभाळ्या, खाली भेगाळली भुई, जरा उघडीप झाल्यावर या कविता वाचकाला अक्षरश: सुन्न करतात व मनोमन परिवर्तन घडवून आणतात.


असा निसर्गाच्या प्रतिमा, प्रतीके व रूपके वापरून साकारलेला ‘गुलमोहराचं कुकू’ कवितासंग्रह खूप मोठे संचित मांडताना दिसतो. जे वाचकाचे आत्मभान जागे करणारे आहे, असा हा कवितेला श्वास मानणारा कवी प्रशांत केंदळे यांचा निसर्गाच्या शब्दकळांनी फुलवलेला कवितासंग्रह नक्कीच लहानापासून थोरांपर्यंत पसंतीस उतरणारा व दखलपात्र ठरणारा आहे. चपराक प्रकाशित असलेला ‘गुलमोहराचं कुकू’ कवितासंग्रह कवीच्या कवितेइतकाच अंतर्बाह्य सुंदर झालेला असून वाचक नक्कीच आवृत्यांवर आवृत्या संपवतील अशी आशा करतो व कवी प्रशांत केंदळे यांना पुढील लेखनास शुभेच्छा देतो. धन्यवाद.

 

आस्वादक - संजय द. गोराडे (नाशिक)

मो. नं  - ९८५०६९१२१६        

शुक्रवार, 28 मई 2021

देवमाणूस (बालकथा)


           देवमाणूस

“तेजस... उठ, किती वेळ अंथरुणावर अजगरासारखा पडून राहणार आहेस ?"

आळसावलेला तेजस झटक्याने अंथरुणावर उठून बसला. त्याला आज शाळेलेत जायचे नव्हते. रोजरोज शाळेत जाण्याचा त्याला कंटाळा आला होता. परंतु विजूदादा अजगर म्हटल्याने त्याला राग आला होता. घुशानेच अंथरुणावरून उठत त्याने मोठ्या भावावर डोळे वटारले होते.  

“असं काय मारक्या बैलासारखं माझ्याकडे बघतोस ?” विजूने पुन्हा त्याला डिवचले होते. 

“आई पहाय ग, दादा मला काय म्हणतोय ?” चिडत तेजसने आईला त्याचे नाव सांगितले. 

“नको विजू... कशाला त्याचं नाव घेतोय !” स्वयंपाकघरातून आईने विजूला दटावले.  

तेजस तणतण पाय आपटत रागाने स्वयंपाक घरात निघून गेला. त्याच्या माघारी विजू मात्र तोंड दाबून खुदुखुदू हसत होता. त्याला छोट्या भावाला चिडवण्यात नेहमीच मौज वाटत असे. तेजस मोठ्या गटात होता ; तेव्हा चांगला दहा वाजेपर्यंत झोपत होता. परंतु पहिलीला गेल्यापासून लवकर उठायला तो भलते नाटकं करत होता. त्यामुळे विजू त्याची खोडी काढून त्याला जागवत असे. दुसरं खोडी काढण्याचे अजून एक कारण होते, तेजस दिसायला खूप गबदुला व गोबऱ्या गालाचा होता. रागवला की त्याचे गोरे गाल व नाकाचा शेंडा खूप लाल होत असे. त्यात त्याला मस्करी बिलकुल सहन होत नसे. तो चिडतो म्हणून विजू त्याला अधिकच चिडवत असे. 

बळेबळे शाळेत पाठवलेला तेजस बसमधून खाली उतरला. रांगेत तो पाठीवरचे दप्तर सांभाळत शाळेच्या वर्गात जात होता. इच्छा नव्हती तरी आईने शाळेत पाठवले म्हणून तो थोडा नाराज होता. जड पावलाने तो रांगेत वर्गात जात असताना मागून एक मुलगा विचित्र आवाजात ओरडला, “ये हाथीभाई, मुंगीभाईसारखा काय चालतोय, घोडेभाईसारखं चल ना !”

त्याच्यामागून रांगेत येणारी मुलं त्या चमत्कारिक आवाजाने खोखो हसू लागली होती. आधीच त्याच्या लठ्ठपणाला सर्व मुलं हाथीभाई म्हणून चिडवत होते. त्यात त्याला मुंगीभाई व घोडेभाई म्हणताच चांगलाच हश्या पिकला होता. त्याने रागात पाठीमागच्या मुलांकडे पाहिले. ते त्याला वाकुल्या दाखवून खिजवत होते. तो रागाने लालेलाल झाला होता, पण कुणालाच काही म्हणाला नाही. कारण त्याला माहीत होते, आपण चिडलो की ; आपले मित्र आपल्याला अजून जास्त चिडवतात. तो निमुटपणे वर्गाच्या दिशेने चालत राहिला.

आज तेजसचे अभ्यासात बिलकुल लक्ष लागत नव्हते. सकाळी-सकाळी विजूदादा त्याला अजगर व मारका बैल म्हणाला होता. शाळेत आल्यावर मित्रही हाथीभाई, मुंगीभाई, घोडेभाई असे कायकाय म्हणाले होते. त्याचं चांगलं ‘तेजस’ नाव होतं, परंतु सगळे जण आज त्याला का कुणास ठाऊक ; वेगवेगळ्या प्राण्याच्या नावाने हाका मारत होते व खिल्ली उडवत होते. आई सोडून कोणीच का आपल्याला तेजस म्हणत नाही म्हणून तो नाराज झाला होता.

“ये गाढवा, मी फळ्यावर शिकतोय, लक्ष कुठे आहे तुझे !”  

शिक्षक रागावताच विचारात गढलेला तेजस भानावर आला. गोंधळून त्याने शिक्षकांकडे पाहिले. ते त्याला फळ्याकडे लक्ष द्यायला सांगत होते. त्याची कावरीबावरी मुद्रा पाहून बाकी मुले खदाखदा हसू लागली. मित्र मुद्दामून खिजवण्यासाठी हसत आहे पाहून त्याने मान खाली घातली होती. सर्वजण आज ठरवून आपल्याला वेगवेगळ्या प्राण्यांच्या नावाने हिणवत आहे असे त्याला उगाचच वाटले होते.

मधली सुट्टी होताच तेजस शाळेच्या मोकळ्या मैदानात एकटाच एका कोपऱ्यात घरून आणलेला डब्बा खात बसला. मित्रांत जेवायला बसलो तर उगाच ते आपल्याला एखाद्या प्राण्याच्या नावाने चिडवतील अशी त्याला भीती वाटली होती. तेवढ्यात चौथीच्या वर्गातील एक अनोळखी मुलगा त्याच्याजवळ येत म्हणाला, “ये छोटू... तिकडे मुलांमध्ये जेवायला बस ना, इकडे काय एकटाच भित्र्या मांजरीसारखा जेवायला बसला आहेस !”

तेजसला एकटेच कोपऱ्यात जेवायला बसलेले पाहून त्या अनोळखी मुलाला सहानुभूती वाटली होती. म्हणून त्याने आपुलकीचा सल्ला दिला होता. परंतु त्याला तेजसच्या मनस्थितीची बिलकुल कल्पना नव्हती. मांजरीसोबत त्याची तुलना करताच तेजसला खूप राग आला होता, परंतु तो मुलगा खूप मोठा असल्याने त्याने त्याचा राग आतल्या आत गिळून टाकला होता. 

दुपारी शाळा सुटताच तेजस काहीसा नाराजीने घरी परतला होता. घरात पाऊल टाकताच त्याला हॉलमध्ये आई आणि वडील बसलेले दिसले. वडील त्याच्याकडे पाहून आनंदाने म्हणाले, “आला माझा वाघ शाळेतून, कसा गेला बाळा आजचा दिवस ?”

वडील पण वाघ म्हणताच तेजस रडकुंडीला आला होता. त्यांच्याकडे पाहून न पाहिल्यासारखे करत तो सरळ आतल्या घरात निघून गेला. वडील रोजच त्याला कौतुकाने वाघ म्हणत असत, परंतु आजचे त्यांनी वाघ म्हटलेले त्याला आवडले नव्हते. 

शाळेतून आल्या-आल्या वडिलांच्या गळ्यात पडणारा तेजस सरळ आतल्या घरात निघून गेलेला आईला खटकले होते. त्याच्या त्या कृतीकडे ती अचंबित नजरेने पाहत राहिली होती. शाळेत काहीतरी बिनसले असल्याची तिला कल्पना आली. त्याच्या पाठोपाठ आतल्या खोलीत येत ती म्हणाली, “काय रे तेजू...काय झालं ?”

तेजस दप्तर पुस्तकाच्या कपाटात ठेवत नाराजीच्या सुरात उद्गारला, “आई, मी प्राण्यासारखा दिसतो का ग ?”

त्याच्या प्रश्नाने चकित होत आईने विचारलं, “का रे बाळा, तुला असं कोण काय म्हणालं ?” 

“सकाळी विजुदादा मला अजगर आणि मारका बैल म्हणाला, शाळेत गेलो तेव्हा मित्र हाथीभाई, मुंगीभाई आणि घोडाभाई म्हणत होते, वर्गात पण सर गाढव म्हणाले, मधल्या सुट्टीतही एक मुलगा भित्री मांजर म्हणाला, मी या सगळ्या प्राण्यांचा मिळून बनलो आहे का ग ?” निरागस तेजसने रडवेल्या स्वरात मनातली सल आईला विचारली.  

“नाही बाळा !” त्याच्या नाराजीचे कारण लगेच आईच्या लक्षात आले. प्रेमळ हात पाठीवर फिरवत ती त्याला म्हणाली, “तू तर माझा छान मुलगा आहेस !”

“मग मला का सर्वजण प्राण्यांच्या नावाने चिडवतात !” तेजसच्या बालमनाला प्रश्न पडला होता.  

“बेटा तू एक हुशार मुलगा आहेस, त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस !” आईने त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. 

“नाही आई, खरं सांग... मी त्यांच्यासारखा वागतो का ?” तेजसचे डोळे भरून आले होते. 

“त्याचं असं आहे बेटा !” त्याला दुखावलेलं पाहून आई समजावून सांगू लागली, “सकाळी आपण जास्त वेळ अंथरुणात झोपलो की ; त्याला अजगरासारखं झोपणं म्हणतात. कारण अजगर हा आळशी प्राणी आहे, तसंच मारका बैल, हत्ती, मुंगी, घोडा, मांजर यांच्याबद्दल आहे, जेव्हाही माणूस चुका करतो ; तेव्हा त्याला अशा प्राण्यांच्या नावाने टोकलं जातं !” 

“म्हणजे देवाने माणूस सगळ्या प्राण्यांचा मिळून बनवलाय का ग आई ?” तेजसच्या बालमनाला भलताच प्रश्न पडला होता.

“नाही बाळा, माणसाला देवाने खूप खास बनवलं आहे, पण हल्ली तो या प्राण्यांसारखा वागू लागला आहे, तो विसरून गेला आहे आपण माणूस आहोत ते, त्याने जर ठरवलं ना... तर तो माणसाचा देवमाणूससुद्धा होऊ शकतो !”

“आई... मग मला पण देवमाणूस व्हायचं आहे !” तेजस ठामपणे उद्गारला. 

त्याच्या डोळ्यात एक अलौकिक तेज चमकलेले आईला दिसले. समाधान पावल्यागत ती पुढे म्हणाली, “तर आजपासून अजगरासारखं अंथरुणात झोपून राहायचं नाही, कोणी काही बोललं तर मारक्या बैलासारखं पाहायचं नाही, सर्व कामे घोड्याच्या जलद वेगाने करायची ; मुंगीसारखे हळूहळू करायचे नाही आणि कोणतेही काम असू दे ; मांजरीसारखं घाबरायचं नाही, वाघासारखं पुढे होऊन करायचं, कारण जो प्राणी असतो त्याच्यात दुर्गुण असतात आणि जो माणूस असतो त्याच्यात सद्गुण असतात, सांग... तुला माणूस व्हायचं की प्राणी ?”

“माणूस... मी मोठा झालो की, छान माणूस बनेल !”

“माझा हुशार बाळ !” 

तेजस आनंदाने आईच्या गळ्यात पडला, कारण त्याच्यातील दुखावलेल्या माणसाला आनंद झाला होता. त्याने मनोमन ठरवून टाकले, ‘मोठा झाला झालो की ; मी असा माणूस बनेल, ज्याचा आईवडिलांना पण अभिमान वाटेल...!’  
***** 
© लेखक संजय द. गोराडे (नाशिक) 
मोबाईल :- ९८५०६९१२१६. 

सोमवार, 19 अप्रैल 2021

असंवेदनशीलतेचे दर्शन

असंवेदनशीलतेचे दर्शन  

कोरोना गेला असे वाटत असताना पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आली आणि सुधारत असलेलं माणसाचं जीवनमान पुन्हा विस्कळीत झाले. आज महाराष्ट्रात हजारोच्या संख्येने दिवसाला कोरोना रुग्ण सापडत आहे. सरकारी व खाजगी सर्व रुग्णालय कोरोनाग्रस्त रुग्णांनी खचाखच भरले आहे. बेड मिळत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी तर रुग्णालयाच्या आवारात रुग्ण उपचार घेत आहे. लॉकडाऊन करूनही रुग्णसंख्या आटोक्यात येत नाही आहेत. मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीत दोनदोन दिवस थांबावे लागत आहे. एकीकडे असे भयावह चित्र असताना दुसरीकडचे चित्र मात्र असंवेदनशीलतेचा कळस करणारे पहायला मिळते आहे. त्यात पहिला नंबर लागतो डॉक्टरांचा, दुसरा नंबर राजकारण्याचा आणि तिसरा नंबर हलगर्जीपणाने वागणाऱ्या लोकांचा. 


धन्वंतरीचा वारसा चालणारे डॉक्टर आज कोरोना काळात खरोखर प्रामाणिक सेवा देत आहे ? कधीकाळी देव वाटणारे डॉक्टर आज का कुणास ठाऊक गिधाडाच्या अवलादीची वाटू लागली आहे. गिधाडे तरी मेलेली जनावरे खातात. डॉक्टर रुपी गिधाडे जिवंत माणसाला अर्धमेले करून त्याच्या टाळूवरचे लोणी खात आहे. इतकी कशी संवेदनशीलता मारून टाकली आहे ! मान्य आहे डॉक्टर जीव धोक्यात घालून कोरोनाग्रस्त रुग्णांना सेवा देतात. म्हणून कसायाप्रमाणे रुग्णाचा गळा आर्थिक सुरीने कापणार ! मोठ्या अपेक्षेने रुग्ण हॉस्पिटलची पायरी चढतात. त्यांचा स्कोर आणि ऑक्सिजन सामान्य माणसांप्रमाणे असतो, परंतु ते कोरोनाने बाधित असतात. त्यांना जुजबी गोळ्या औषधे व मानसिक आधार दिला तरी ते बरे होणारे असतात. परंतु चालू आलेली शिकार जिवंत सोडतील ते डॉक्टर कसले. काही डॉक्टर चांगलेही असतील. पण गव्हात खडे नसून खड्यात गहू तसे आहेत. 

डॉक्टरांनी आपल्या सेवेचा धंदा केला आहे. आज दवाखान्यात रुग्ण अॅडमिट झाला की कमीतकमी एक लाख रुपये बिल निघते. मग त्या रुग्णाची बिल भरण्याची कुवत आहे की नाही याच्याशी अजिबात घेणेदेणे नसते. एक दिवसाचे रुग्णालयाचे चार्जेस कमीतकमी सात हजार रुपये आहेत. मेडिकलचा खर्च वेगळा. त्यात रेमडीसिवीरचे इंजेक्शन नसतानाही काही रुग्णालयात रुग्ण अॅडमिट करून घेतात आणि रेमडीसिवीरचे इंजेक्शन काळ्या बाजारातून आणायला सांगतात. वर काळ्या बाजारातून इंजेक्शन आणायचे संपर्क क्रमांकही तेच सुचवतात. आधीच परिस्थितीने हवालदिल वर्षापासून तग धरून आहे ; त्यात कोरोना होणं म्हणजे भिकेस लागण्यासारखे आहे. अशा प्रसंगी पैसाच सर्वस्व न मानता डॉक्टरांनी माणूसपणाला काळिमा फासणारी कृत्य कुठेतरी थांबवली पाहिजे, थोडेसे माणुसकी जिवंत ठेवली पाहिजे. कधीकाळी डॉक्टर आणि रुग्ण यांच्यात एक कौटुंबिक विश्वासाचे नाते होते. सर्व सामान्यासाठी देव असलेल्या डॉक्टरांनी या विश्वासाचा घात करू नये इतके सांगणे.  


कोरोनासारखी महामारी संबध जगावर ओढवली असताना सर्वात गलिच्छ राजकारण महाराष्ट्रात केलं जात आहे. तीन पक्ष सत्ता टिकवण्यासाठी तर एक पक्ष सत्ता मिळविण्यासाठी भांडत आहे. कुणालाच महाराष्ट्राच्या जनतेशी घेणेदेणे नाही. यात दोघांचे भांडण तिसऱ्याचे नुकसान होते आहे. नहाग निरपराध जनता यांच्या भांडणात भरडली जात आहे. केंद्र सरकार म्हणते आम्ही लसी पाठवल्या आहेत, राज्य सरकार म्हणते आम्हाला लसी मिळाल्या नाहीत. कोण खोटं बोलतं आणि कोण खरं बोलतं तेच कळत नाहीये. आतापर्यंत सचिन वाझे प्रकरणावर राजकारण चालू होते ; आता रेमडीसिवीर इंजेक्शनवर राजकारण चालू केले आहे. सत्ता पक्ष आणि विरोधी पक्ष दोघे एकमेकांना बदनाम करत आम्ही कसे जनतेचे कैवारी आहोत हे दाखवत आहे. खरंतर संपूर्ण देशात महाराष्ट्रात सगळ्यात जास्त कोरोना रुग्ण आहेत. अशा वेळी कोणतेही राजकारण न करता सर्व पक्षांनी एकत्र येऊन व स्वतःचा पक्ष विसरून जनतेचा मदतीसाठी धावून यायला हवे होते. परंतु तसे न होता सर्व पक्ष कुरघोडी करण्यात मग्न आहे. 

यात सर्वात अग्रेसर विरोधी पक्ष आहे. विरोधी पक्ष हा महाराष्ट्र सरकारचा विरोधक आहे की महाराष्ट्रातील जनतेचा तेच कळत नाहीये. इतक्या वर्षाच्या राजकारणात कधी नव्हे इतका भयंकर विरोधी पक्षनेता महाराष्ट्रातील जनतेला पहायला मिळाला आहे, सत्ता नाही म्हणून जनतेला वेठी धरण्याचं राजकारण अगदी नीच पातळीचे आहे, एकीकडे महाराष्ट्र सरकारला कुच्छकामी ठरवत आम्ही केंद्राकडून मदत आणू म्हणायचे, दुसरीकडे महाराष्ट्राला कशी कमीतकमी मदत मिळेल म्हणून पडद्यामागे राजकारण करायचे हे न कळण्याइतकी महाराष्ट्रातील जनता नक्कीच दुधखुळी नाही आहेत. कोरोनावर संजीवनी ठरणाऱ्या रेमडीसिवीर इंजेक्शनचा साठा करणाऱ्या राजेश डोकानियाला सोडवण्यासाठी अर्ध्या रात्री धावून जाणारे विरोधी पक्ष नेते जनतेच्या मदतीसाठी धावून आले असते तर महाराष्ट्रातील जनतेला अडचणीच्या काळात धावून येणारे नायक वाटले असते. परंतु पाण्याविना मासा तशी सत्तेविना भाजपची स्थिती झाली आहे. त्यांच्यातील खलनायकाला जनतेचे हाल दिसेनासे झाले आहे. अर्थात विरोधी पक्षनेते केंद्राच्या सांगण्यावरून तसे वागत असावे अशी कुठेतरी शंका येते आहे, नाहीतर महाराष्ट्रीय म्हणून त्यांच्या काळजाला पाझर फुटायला हवा होता. परंतु महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहेत. ती सगळे उघड्या डोळ्यांनी पाहते. जनतेच्या हा तळतळाट सूडबुद्धीने वागण्याऱ्या राजकारण्यांना नक्की भोगावा लागेल. आता या घडीला निष्पक्ष जनतेच्या मदतीसाठी धावून येणारा देव ठरेल, परंतु तेवढी सदसदविवेकबुद्धी असायला हवी.      

पुलावरून इतके सगळे पाणी वाहते आहे तरी जनतेचा हलगर्जीपणा मात्र कमी होताना दिसत नाहीये. जनतेची अवस्था गोष्टीतल्या वाघासारखी झाली आहे, एक वाघ माणसांच्या वस्तीत आला, तो वाघ पाहून माणसं सुरुवातीला खूप घाबरायची, परंतु तो वाघ कायमचाच माणसांच्या वस्तीत येऊन राहिल्याने त्यांची भीती कमी झाली. मग ते वाघाला शेजारी घेऊन झोपू लागले. परंतु वाघच तो, एकेकाला शक्तीने नव्हे युक्तीने गोडीत खाऊ लागला. हळूहळू सगळी वस्ती कमी झाली तरी माणसं म्हणत होती, ‘तो वाघ काही नाही करत रे !’ तशी सगळया महाराष्ट्रातील जनतेची गत झाली आहे, कोणीही कोरोनाला गांभीर्याने घ्यायला तयार नाहीत. स्वतःच्या घरात जोपर्यंत कोरोना घुसत नाही व पैसे देऊन आक्कल विकत घेत नाही ; तोपर्यंत एकालाही शहाणपण सुचणार नाही. लॉकडाऊन असूनही लॉकडाऊन नसल्यासारखे लोक वागत आहे. आपलं कोणी गेलं नाही ना ! असा संकोचित विचार करून बेफिकरीने वागत आहे, परंतु असे हलगर्जीपणाने वागणे म्हणजे भिकेचे डोहाळे लागण्यासारखे आहे. विनाकारण स्वतःच्या चुकीने आपण डॉक्टर मोठे करत आहोत व आपली जमापुंजी त्यांच्या घशात घालत आहोत. अशा वेळी राजकारणी सोडा रक्ताचीही माणसं उभी राहत नाही. तेव्हा कोरोना कोणीही हलक्यात घेऊ नये हे कळकळीचे सांगणे आहे, नाहीतर गोष्टीतील वाघासारखा कोरोना आपला केव्हा घास घेईल कळणार नाही. तेव्हा स्वतःसह कुटुंबाला कोरोनापासून वाचवावे व सुरक्षात्मक काळजी घेत लसीकरण करून घ्यावे, सामान्य जणांसाठी हाच काय तो बुडत्या जहाजाला काडीचा आधार आहे, नाहीतर आपल्या चुकीची किमंत आपल्याला मोजावी लागेल....   

संजय द. गोराडे (नाशिक)
मो. नं – ९८५०६९१२१६                     
  

बुधवार, 14 अप्रैल 2021

लाल दिनांक (बाल कथासंग्रह)

संस्कार पेरणारा बाल कथासंग्रह : लाल दिनांक 
       लेखक - नागेश सू. शेवाळकर

लहान मुलाचं एक आगळंवेगळं विश्व असतं, जे माया लावतील ; ते त्यांना आपलेसे वाटतात. त्यांच्या मनात कधीच आपपरभाव नसतो. ते क्षणात रुसतात तर क्षणात गोड होतात. त्यांच्याकडे भन्नाट कल्पना असतात. त्या कल्पना वास्तवात उतरवणं कधीकधी वडीलधाऱ्यांसाठी अशक्यप्राय असतं. तरी त्या कल्पना अलवार जपत नात्यांची वीण घट्ट करणाऱ्या, कौटुंबिक जिव्हाळ्यावर आधारित लहान मुलांचे विश्व उलगडून सांगणाऱ्या संस्कारक्षम कथा म्हणजे लेखक नागेश सू. शेवाळकर लिखित ‘लाल दिनांक’ कथासंग्रह होय. 

‘लाल दिनांक’ कथासंग्रहात पंधरा कथा आहेत. पहिली कथा ‘आमच्या मिस... आजी !” या कथेत स्माईल इंग्लिश स्कूलमध्ये शिकणारा समीर शाळेतील हॉलीबॉल, फुटबॉल, रिंग, सायकल, घसरगुंडी, झोका, घोडा, कार या खेळांत रमत नाही. या अद्ययावत खेळांपेक्षा त्याला आजीने शिकवलेले जुने खेळ आवडतात. आजीने शिकवलेला ‘मामाचं पत्र हरवलं’ हा खेळ शिक्षक त्याच्याकडून समजून घेतात व मुलांना खेळायला लावतात. ‘मामाचं पत्र हरवलं’ हा खेळ बाकी मुलांनाही खूप आवडतो. जुन्या काळातील या खेळाबाबत मुलांची आवड पाहून मुख्याध्यापिका समीरच्या आजीलाच शिक्षिका म्हणून शाळेत नेमतात. त्या आजी मुलांना त्यांच्या काळातील लोप पावत चाललेले खेळ, संस्कारगीतं, बडबडगीतं शिकवतात. अशी जुन्या काळातील खेळांबाबत गोडवा निर्माण करणारी व वाचकास वेगळं काहीतरी सुचवणारी कथा आहे. 

वास्तवाची जाण नसलेले मुलं कल्पनेच्या जगात विहार करणारी असतात. मग त्यांना गोष्टीतील परीलाही भेटण्याची इच्छा झाली तर नवल वाटू नये. परंतु या संग्रहात वाचण्यात आलेली ही ‘परीकथा’ ह्रदयाचा ठोका चुकवणारी आहे. प्रकाश नावाचा चार वर्षाचा मुलगा आईकडे परीला भेटण्याची इच्छा व्यक्त करतो. त्याची आई त्याला वास्तवाची जाण करून न देता त्याच्या कल्पनेला आणखी पंख देण्याचे काम करते. पुढे प्रकाशला बहीण होते. तिचं नाव परी ठेवलं जातं. आपल्या घरात परीने जन्म घेतला म्हणून त्याला खूप आनंद होतो. परंतु ही परी कल्पनेतील परीप्रमाणे आकाशात उंच उडत नाही पाहून तो नाराज होतो. पुढे जो थरार घडतो तो अंगावर काटा आणणारा आहे. ही कथा वाचकाच्या कायम स्मरणात राहणारी आहे. 

सुट्टी म्हटलं की मुलांचा आनंदाचा दिवस. सुट्टीच्या दिवशी आईवडिलांनी अजिबात अभ्यास करायला सांगू असे त्यांना वाटते. मंगेश पाडगांवकराचं छान बालगीत आहे, ‘सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय... शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय...!’ असेच ‘लाल दिनांक’ या शीर्षक कथेतील युवराजलाही शाळेत जावेसे वाटत नाही. तो दररोज कॅलेंडरवरील लाल तारखा पाहतो. लाल तारीख असली की शाळेला सुट्टी असते असा त्याचा समज असतो. शाळेत जायचा कंटाळा येतो म्हणून तो कॅलेंडरवरची तारीखच लाल पेनने रंगवतो. एका महिन्यात सुट्टीच्या लाल तारखाच नाही पाहून तो चक्क वडिलांना लाल तारखांचे कॅलेंडर आणायला लावतो. अशी गंमतीशीर शीर्षक कथा ‘लाल दिनांक’ वाचताना नकळत हसू येते.  

‘पंख मायेचे, वाढदिवस सचिनचा, श्यामची पत्रावळ, प्रोत्साहन, आठवण एका करामतीची, विश्वास जिंकला श्रावणबाळ, बक्षिसाची किमया, ओळखपत्र, पत्र बाप्पाचे, एक वाढदिवस असाही, नातू माझा भला’ अशा एकूण पंधरा कथा ‘लाल दिनांक’ कथासंग्रहात आहेत. लेखक नागेश सू. शेवाळकर यांनी बच्चेकंपनीचे भावविश्व नेमके चितारले आहे. यातील अधिकत्तर कथा आजी आणि नातू या नात्यांभोवती गुंफल्या गेल्या आहेत. त्यांच्या कथा कल्पनेत रमवणाऱ्या नसून भवतालचे वास्तव अवगत करून देणाऱ्या आहेत. ज्या छोट्यांना प्रेरणा व मोठ्यांनी छोट्यांशी कसं वागलं पाहिजे याचे भान देणाऱ्या आहेत. हा कथासंग्रह सोहम क्रिएशन अँण्ड पब्लिकेशन पुणे प्रकाशनाने प्रकाशित केलेला असून मुखपृष्ठ अमेय देशपांडे यांचे आहे. असा हा संस्कार पेरणारा बाल कथासंग्रह नक्कीच वाचनीय झाला आहे असे वाचक म्हणून वाटते. लेखक नागेश सू. शेवाळकर सर यांना पुढील लेखनास शुभेच्छा. 


आस्वादक - संजय द. गोराडे (नाशिक)
मो. नं - ९८५०६९१२१६    

शुक्रवार, 26 मार्च 2021

‘तीर्थरूप : वनवासी जीवनाची गोष्ट





'वैयक्तिक- कौटुंबिक अनुभवांचे सहज सुंदर, वस्तुनिष्ठ व समृद्ध चित्रण'

‘तीर्थरूप’ वनवासी जीवनाची गोष्ट'

कादंबरी हा साधना व तपश्चर्येचा भाग असतो. कादंबरी लिहिण्यासाठी तुलनेने अधिक मेहनत, एकाग्रता आणि कसोटी लागते. कादंबरी लेखनात एकाच वेळी विविध व्यक्तिरेखा विशिष्ट पद्धतीने व वैविध्यपूर्ण प्रकारे हाताळाव्या लागतात. घटना- प्रसंग यांचे योग्य क्रम राखताना काही ठळक गोष्टी, निवडक घटना अधोरेखित कराव्या लागतात. हे करताना आशयानुसार लेखनाची शैलीही सांभाळावी लागते. विशेषतः पहिल्यांदाच कादंबरी लिहिणाऱ्या हातांसाठी कादंबरीच्या या विविध घटकांमध्ये समतोल साधणे अधिक आव्हानात्मक ठरते. ‘निर्णय’ कथासंग्रहाने मराठी साहित्यात स्वतःची विशिष्ट ओळख निर्माण करणारे नाशिक येथील कथाकार संजय गोराडे हे एक जाणकार साहित्यिक- संवेदनशील व्यक्तिमत्त्व आहे. साहित्य व सांस्कृतिक उपक्रमांत विविध भूमिकांतून आणि सातत्याने वावरणारे मितभाषी लेखक म्हणून त्यांची ओळख आहे. ते ‘तीर्थरूप : वनवासी जीवनाची गोष्ट’ या पहिल्या कादंबरीतून मराठी वाचकांसमोर एका नव्या पद्धतीने व्यक्त होऊ पाहत आहेत.

 आत्मकथनात्मक स्वरूपाच्या या कादंबरीत त्यांनी आपल्या आयुष्यातील काही प्रसंग नेमकेपणाने रेखाटले आहेत. मानवी आयुष्य कधीही एखाद्या रेषेसारखे साधे किंवा सरळ नसते. त्यात असंख्य खाच- खळगे, चढ- उतार, सुख- दुःखे असतात, किंबहुना या सगळ्यांमुळेच मानवी आयुष्याला एक विशिष्ट अर्थ प्राप्त होतो. माणूस म्हणून ज्या- त्या टप्प्यावर आपली जडणघडण होते. या पार्श्वभूमीवर मानवी जगण्यातील विविध आव्हानांची- त्यातील चढ- उतारांची व मानवी नातेसंबंधांतील आपले- परकेपणाची जाणीव ही कादंबरी आपल्याला नेमकेपणाने करवून देते. कळत्या वयापासून आयुष्याची चौरेचाळीस पाने उलटताना आलेले बरे- वाईट अनुभव लेखक म्हणून संजय गोराडे स्वतःशी प्रामाणिक राहात कौशल्याने कादंबरीत नोंदवतात. त्यामुळे त्यांनी मांडलेले वैयक्तिक अनुभव हे एकीकडे वाचकाला ‘वाचनानंद’ देतात त्यासोबतच ते वैयक्तिक न राहता समूहाचे अनुभव बनत ‘सार्वत्रिक’ ठरतात. 

 लेखकाचे व त्याच्या भावंडांचे बालसुलभ वर्तन, वडिलांचे गैरजबाबदार वागणे- बारा गावचा मुंजा बनून भटकणे, स्वतःच्या संसाराची वाताहत होणे, लेखकाची आई (ब)वर काम आणि नातेसंबंध जपण्याचा दुहेरी ताण येणे, अतिश्रम- अतिताण यातून निर्माण झालेल्या अल्प- आजारात आईचे निधन होणे, आजीने वार्धक्य बाजूला सारत कंबर कसणे, पोटच्या पोरांप्रमाणे या लेकरांना सांभाळणे, आईविना पोरं म्हणून शेजारीपाजारी व नातेवाईकांकडून लाड होणे, शाळेत शिक्षण घेणे, अभ्यासात आघाडीवर असणे, तीन विषय नापास होऊनही वर्गात पहिला नंबर मिळविणे, कुमारवयात मुलीबद्दल नैसर्गिक आकर्षण उत्पन्न होणे, त्यातून सुटका होणे, मुक्या प्राण्याला जीव लावत एक बेवारस कुत्रे पाळणे, त्याच्यासोबत  भावानुबंध निर्माण होणे, जाणीव होत घराची जबाबदारी उचलणे, मोठे भाऊ आप्पांच्या धाक व शिस्तीत वाढणे, आय.टी.आय. करुन नोकरी स्वीकारणे, लग्न आणि त्यानिमित्ताने येणाऱ्या कौटुंबिक जबाबदाऱ्या स्वीकारणे, त्या उत्तम प्रकारे पार पाडणे, वेगवेगळी आजारपण यावर मात करत कुटुंबाचा डोलारा सांभाळणे आणि विशेष म्हणजे हे करताना जन्मदात्या बापाने आपल्यासाठी काहीही केलेले नसताना आपली जबाबदारी/ कर्तव्य म्हणून शेवटपर्यंत त्यांची जबाबदारी पेलणे, या सगळ्यांत आपल्यातील साहित्यप्रेम आणि सामाजिक जाणीव जपत शक्य ते योगदान देणे असा हा जीवनप्रवास सूत्रबद्ध पद्धतीने येथे चित्रित केलेला आहे. 

साधारण १७ प्रकरणांमध्ये या कादंबरीची रचना गोराडे यांनी केलेली आहे. पहिल्या प्रकरणात मातृछत्र हरपण्याची आणि लेखक जीवनाची दिशा बदलण्याची संवेदनशील घटना घडते. लेखक अवघा चार वर्षांचा असताना आई (ब)च्या मायेला पारखा होतो. जिवंत असताना नवऱ्याच्या बेजबाबदारपणामुळे कुंकवाला कुणी नावे ठेवू नये म्हणून ती अहोरात्र राबते. कुटुंबाला एकत्र बांधत घराची जबाबदारी वयाच्या चौदाव्या वर्षी (लग्न झाल्यापासून) अंगाखांद्यावर घेते. सासु- सासरे आणि दीर यांच्या सहकार्यामुळे परिस्थितीशी लढत राहते. मात्र ज्याच्या भरवशावर ती उंबरा ओलांडून आली होती तो नवरा स्वतः काडीचेही काम न करता अहोरात्र राबणाऱ्या बायकोला मात्र काडीचीही किंमत देत नसल्याने नाराजही होते. नवऱ्याच्या जुगार- गांजाच्या व्यसनामुळे व उटारेट्या करत फिरण्यामुळे संपूर्ण गोराडे कुटुंबाला त्रास होतो. ‘ब’ला समाजाकडून मानहानी सहन करावी लागते. घरात उपासमारही घडते. नवरा कुणाचेच ऐकत नाही म्हणून ‘ब’ त्याला समजावण्याचा प्रयत्न करते; ; तेव्हा तो तिला बेदम मारतो. सततच्या ताणतणावाने, अतिकष्टाने ‘ब’ खचत जाते. तिचे अचानक निधन होते. चुलता- चुलती, आजी- आजोबा, मामा- मामी, शेजारी- पाजारी आईवेगळ्या या मुलांना जीव लावतात, याचे वर्णन कादंबरीच्या सुरुवातीला येते. मनाच्या कोपऱ्यातील हळवी बाजू व निवडक घटना- प्रसंगांमुळे कादंबरीची सुरुवात वेधक व लक्षणीय ठरते.

 कादंबरीची सामर्थ्ये व उणीवांबाबत बोलायचे तर; या कादंबरीचे सगळ्यांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे सहजसुंदर मांडणी आणि वाचकाला खिळवून ठेवणारी आकर्षक भाषाशैली. लेखकाचा जीवनप्रवास मांडताना निवडलेल्या घटना नेमक्या आणि बोलक्या आहेत. . माणसाच्या जडणघडणीत त्याचा भूतकाळ आणि भोवताल या दोन महत्त्वाच्या बाजू असतात. या दोन्ही पातळ्यांमध्ये समतोल साधल्यामुळे कथानक गतिशील राहते. वाचनीय ठरते. मानवी नातेसंबंधाबाबत आस्था, साधे- सरळपणाने जगाकडे पाहणारा लेखक माणसातील आपुलकी आणि दुरावा अशा दोन्ही टोकांचे दर्शन कादंबरीतून नेमकेपणानेे घडवितो. आयुष्य कधीही साधेसरळ नसते त्यातील चढ- उतार यांची नेमकेपणाने मांडणी कादंबरीत जागोजागी येते. 

 साहित्य माणसाला अनुभूती देते, जाणीव देते, दिशा देते आणि समृद्धही करते या निकषावर ही कादंबरी प्रवाही आणि प्रभावी ठरते. कथानक फुलविण्यासाठी लेखक कुठेही तांत्रिकता- क्लृप्त्या वगैरे करण्याच्या भानगडीत पडत नाही. जे आहे ते साधे सरळ मांडण्याचा प्रयत्न करतो. काही ठिकाणी अजून रंजकता वगैरे आणता आली असती पण ती कटाक्षाने टाळून जसे आहे ते अधिकाधिक वास्तव आणि तेही सरळ पद्धतीने मांडण्याचा लेखकाचा प्रयत्न कौतुकास्पद आहे. निखळता आणि प्रामाणिकता हे या कादंबरीचे वैशिष्ट्य आहे. कलाकृती म्हणून सजवण्यापेक्षा माणूस म्हणून आलेले अनुभव अधिकाधिक वस्तुनिष्ठ पद्धतीने मांडल्याने कादंबरी वाचनीय, रंजक, प्रत्ययकारी आणि हृदयस्पर्शी ठरते. एका सर्वसामान्य कुटुंबाची, वनवासी जीवनाची शब्दांकित कहाणी म्हणून ‘तीर्थरूप’ ही आत्मकथनात्मक कादंबरी महत्त्वपूर्ण आहे.

डॉ. राहुल अशोक पाटील
समीक्षक - संशोधक - स्तंभलेखक


कादंबरी - तीर्थरूप : वनवासी जीवनाची गोष्ट
लेखक - संजय द. गोराडे
प्रस्तावना - डॉ. राहुल अशोक पाटील
प्रकाशन - घनश्याम पाटील, चपराक प्रकाशन, पुणे.
मूल्य - 250/-

https://shop.chaprak.com/product/tirthrup-vanwasi-jivnachi-gosht/ 

एक क्लिकवर मिळवा, चपराकच्या संकेतस्थळावर 'तीर्थरूप : वनवासी जीवनाची गोष्ट' कादंबरी

गुरुवार, 25 मार्च 2021

अंतरीचे रंग (वैचारिक ललितसंग्रह)


अंतरीचे रंग : सकारात्मकतेतून परिवर्तन घडविणारे पुस्तक 

एक पुरुष शिकला तर तो एकटाच सुशिक्षित होतो, पण स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंब सुशिक्षित होते. आज एकविसाव्या शतकात स्त्री शिकून सज्ञान झाली आहे. माणूस म्हणून ज्ञात झालेल्या स्वातंत्र्याविषयी व घटनेने बहाल केलेल्या अधिकारांविषयी ती सजग झाली आहे. तिला अंतरीच्या दडलेल्या भावविश्वातील असंख्य पैलू उलगडून दाखवायचे आहे, परंतु ते अंतरीचे पैलू उलगडून दाखवत असताना त्याचे रंग बेरंग होत तर नाही ना ! याचा नेमका सूतोवाच ‘अंतरीचे रंग’ या पुस्तकात लेखिका सुरेखा बोऱ्हाडे यांनी केले आहे.

चपराक प्रकाशित व सुरेखा बोऱ्हाडे लिखित ‘अंतरीचे रंग’ वैचारिक काहीसा ललित लेखसंग्रह आहे, यात आजच्या बदलत्या काळानुसार स्त्रियांनी केलेली प्रगती, प्रगती करत असताना उंचावलेल्या कक्षा आणि कक्षा उंचावत असताना घ्यावयाची दक्षता यावर नेमके भाष्य केले आहे. तसेच पुरुषी अहंकाराला इजा न पोहोचवता पुरुष वर्गाला स्त्रीचा आत्मसन्मान जपण्याचे हलकेफुलके मार्गदर्शन केले आहे. या लेखसंग्रहात दैनदिन जीवनातील स्त्रीविषयक वेगवेगळे लेख असून सकारात्मकतेतून परिवर्तन घडविणारे आहे. 

‘सेवा परमोधर्म’ या लेखाने पुस्तकाची सुरुवात होते. सुश्रुषा, सेवा, संगोपन ; जे स्त्रीचे उपजत गुण आहे. खरंतर ती वात्सल्याची साक्षात मूर्ती आहे. प्रेम, जिव्हाळा, संवेदनशीलता तिच्या ठायी नैसगिकच असते. म्हणून नर्सिंगसारख्या क्षेत्रात स्त्रियांची नेमणूक केली जाते. पेशंटचे स्पंजिंग करणे, पॉट बदलणे, स्वच्छता करणे, योग्य औषधे-इंजेक्शन देणे, रोग्याचे खाणे-पिणे या सर्व गोष्ट स्त्रिया किळस वा द्वेष न करता आपलेपणाने करतात. ज्या खूप जिकिरीच्या, कठीण, चिकाटीच्या व जोखमीच्या असतात. सेवा देण्यामागे पैसे कमवणे हा हेतू असला तरी कर्तव्य बजावताना तो कधीच प्रथम स्थानी नसतो. प्रथम स्थानी नेहमी त्यांची सेवा असते ; जी प्रामाणिक असते. म्हणून या क्षेत्रात नर्सोबा म्हणून कधीही पुरुष नेमले जात नाही वा आढळतही नाही. स्त्रीची सेवाभावी वृत्ती हीच तिची शक्ती आहे. तिच्या या सेवाभावी वृत्तीचा आदर करण्याचे लेखिकेने या लेखात सूचित केले आहे. 

दुसरा लेख आहे, ‘माझी गाडी... माझा वेग...!’ स्त्री ग्रहावर जाऊन आली आहे असे असताना सामान्य कुटुंबातील स्त्रिया साधी टू व्हीलर चालवायला कचरतात. माणसांच्या व गाड्यांच्या गर्दीत कोणाला धक्का लागला तर, वाहतुकाचा नियम मोडला तर, किंवा स्त्री आहोत आपली फजिती झाली तर, अशा अनेक शंकाकुशंकांनी खचून जात त्या टू व्हीलर किंवा फोरव्हीलर चालविण्याचे धाडस करत नाही. खरंतर पुरुष वर्गाने स्त्रीला टू व्हीलर किंवा फोरव्हीलर चालविण्यास प्रोत्साहित करायला हवे. त्यामुळे त्यांच्यावरचा कामाचा ताण बराच हलका होणार आहे. शाळेत किंवा क्लासला मुलांना ने-आण करणे, बाजारहाट करणे, लग्नसभारंभास जाणे अशा अनेक कौटुंबिक जबाबदाऱ्या विभागल्या जाणार आहे. स्त्रीने पण स्वतःच्या विकासासाठी, स्वावलंबनासाठी व आत्मविश्वासासाठी टू व्हीलर किंवा फोरव्हीलर चालविण्यास पुढाकार घेतला पाहिजे. ड्रायव्हिंग करणे हा आजच्या युगातील स्त्री स्वातंत्र्याचा हक्क आहे याची लेखिकेने जाणीव या लेखात करून दिली आहे. सोबत ‘माझी गाडी... माझा वेग...!’ हा आत्मभानही ठेवायला सांगितला आहे. 

पुस्तकाच्या उत्तरार्धात ‘फॅशन’ या विषयावर लेख आहे. जो आजच्या तरुणाईने जरूर वाचायला हवा. सतत नवीन काहीतरी करण्याची उर्मी, वेगळेपणा दाखवण्याची हौस यात मुलांप्रमाणे मुलीही आघाडीवर आहेत. चित्रपटातील किंवा जाहिरातील हिरोईनने केलेली फॅशन, हेअरस्टाईल, मेकअप अशा ज्या ज्या फॅशन दाखवल्या जातात ; त्या त्या तरुणाई लगेच प्रत्यक्षात आणून मोकळे होते. परंतु त्या फॅशनचे अनुकरण करताना स्वतःला सुरक्षित वाटते आहे का ? फॅशनेबल राहण्याच्या किंवा दिसण्याच्या नादात आपले अस्तित्व धोक्यात येते आहे का ? याच्या नेमक्या टिप्स ‘फॅशन’ या लेखात लेखिकेने दिल्या आहेत. पाश्चात्य पोशाखांचे अंधानुकरण करण्यापेक्षा आपल्याच वातावरणाशी मिळतीजुळती फॅशन करण्याचा छान सल्लाही दिला आहे. शरीराचे सौंदर्य जपण्यापेक्षा मनाचे सौंदर्य जपण्यात त्यांनी चांगुलपणा मानायला सांगितला आहे. 

‘कन्यादान... दान की आदान ?’ शेवटचा लेख. कन्यादान या शब्दामागची चुकीची मानसिकता लेखिकेने या लेखात उलगडून सांगितली आहे. आजवर कन्यादानाला महादान म्हटले गेले आहे. ज्याप्रमाणे पैसे, धन, गाई दान करतो ; त्याप्रमाणे कन्येचे पण दान केले जाते. परंतु तो अधिकार पित्याला असतो का ? कारण अर्जित संपत्तीचे दान करण्याचा अधिकार व्यक्तीला असतो. आपली मुलगी नक्कीच अर्जित संपत्ती नाही. तिला दुसऱ्याला देऊन टाकणे ही भावना कुठेतरी कमीपणा, हीनपणा आणणारी आहे. तेव्हा पिता म्हणून आपण कन्येचे दान न करता आदान करायला हवे. अर्जुनाबरोबर सुभद्रेचा गांधर्वविवाहाच्या वेळी श्रीकृष्ण बलरामाला म्हणतात, ‘प्रदानमपी कन्याया : पशुवत को नुमन्यते ?’ पशुप्रमाणे कन्येचे दान करण्यास अनुमती नाही. तेव्हा कन्या ही सर्वार्थाने गृहलक्ष्मी असते. तिचा योग्य मान-सन्मान राखला गेला पाहिजे, असे या लेखात लेखिका जनजागृती करत रास्त संदेश देते. 

असे स्त्री जीवनावर आधारित विविध विषयांवर छत्तीस लेख ‘अंतरीचे रंग’ या पुस्तकात आहेत. स्त्रियांच्या जगण्यातील बारकावे, आनंद, अस्मिता, दुःख लेखिका सुरेखा बोऱ्हाडे यांनी सहज शैलीत नोंदले आहेत. लेखांची भाषा ओघवती व वाचकाला बांधून ठेवणारी आहे. लेख वाचताना त्यांचे निरीक्षण व अभ्यास अफाट असल्याचे दिसून येते. ‘अंतरीचे रंग’ या पुस्तकाच्या माध्यमातून त्या स्त्रियांमध्ये मोलाचे परिवर्तन करून पाहत असल्याचे जाणते. जे वाचनांती स्त्रियांबरोबर पुरुषांमध्येही परिवर्तन घडविणारे आहेत. असे रोजच्या जगण्याविषयी मार्गदर्शक ठरणारे पुस्तक प्रत्येकाच्या संग्रही असावे असे वाचक म्हणून मला वाटते. लेखिकेच्या हातून असेच समाज प्रबोधन करणारे लेखन घडो अशा शुभेच्छा देतो. धन्यवाद. 

अंतरीचे रंग (वैचारिक)
लेखिका सुरेखा बोऱ्हाडे
प्रकाशक घनश्याम पाटील (मो.७०५७२९२०९२)
चपराक प्रकाशन, पुणे
मूल्य - २००/-   
  
आस्वादक – लेखक संजय द. गोराडे (नाशिक) 
मो. नं – ९८५०६९१२१६      

          
       

गुरुवार, 18 मार्च 2021

कथा वास्तवातल्या (कथासंग्रह)


‘कथा वास्तवातल्या’ कथासंग्रह वाचताना लेखक प्रा. विजय काकडे छोट्याछोट्या घटनांकडे किती संवेदनशील नजरेने पाहतात याची प्रचिती येते. हलकेफुलके पण तितकेच मनाला भिडणारे विषय घेऊन लेखकाने वास्तवातल्या कथांना शब्दरूप देऊन कागदावर साकार केले आहेत. जे प्रसंग नित्य आपल्या अवतीभवती घडत असतात, पण त्याकडे आपण कधीच डोळे उघडे असूनही पाहत नाही, मात्र लेखक अशा घटनांकडे खूप गांभीर्याने पाहतात. घटना लहान असली तरी त्यात प्रबोधन करणारे खूप मोठे कथानक त्यांना गवसताना दिसते आहे. जे स्वतःमध्ये परिणामी समाजामध्ये परिवर्तन घडविणारे आहे. 
या कथासंग्रहात एकूण बाबीस कथा आहेत. सर्व कथांच्या घटना त्यांनी स्वतः अनुभवलेल्या व पाहिलेल्या आहेत, ज्या कल्पनेने किंवा लालीत्याने फुलवलेल्या नसून वास्तवातल्या कथा आहेत, म्हणून त्यांनी कथासंग्रहाला ‘कथा वास्तवातल्या’ हे शीर्षक दिले आहेत. जे कथासंग्रह वाचताना खूप सार्थ वाटते. आजकालची पिढी ही वास्तवात जगणारी पिढी आहे, त्यांना कल्पनेत जगायला बिलकुल आवडत नाही, याचं नेमकं भान असलेल्या लेखक प्रा. विजय काकडे यांनी आपल्या जीवनातील चांगल्या-वाईट वेगवेगळ्या घटना कथारूपाने उभ्या केल्या आहेत. ज्या वाचकाला आपल्याशा वाटणाऱ्या आहेत. 
‘आपली माणसं’ या कथेत सुखात गुळाला मुंग्या चिटकाव्या तशी माणसं चिटकतात, मात्र तीच दुःखात आपल्याकडे पाठ वळवतात, आर्थिक नाही तर साधा मानसिक आधार द्यायलासुद्धा पुढे येत नाही, तेव्हा कळते आपली माणसं कोणती आणि परकी माणसं कोणती ; मित्रावर ओढावलेल्या प्रसंगातून लेखकाने आजच्या आपमतलबी मानसिकतेचे नेमके दर्शन घडवले आहे.
‘सावित्री’ कथेत गरोदर सावित्रीला कोरोनाची लक्षणे दिसतात, पती संपत व त्याची आई तिला कुठलीही शहानिशा करता कोरोना पॉजिटिव्ह ठरवून मोकळे होतात व लगेच वाळीत टाकावे तसे विलग करतात, तिला खायला देत नाही की दवाखाना घेऊन जात नाही, परंतु दैवाचे फासे असे फिरतात की ; ती निगेटिव्ह व पती आणि सासू पॉजिटिव्ह निघतात. सावित्री मात्र नावाप्रमाणेच सावित्री असते, ती उलट पती आणि सासूची खूप शुश्रुषा व दवाखाना करते, अशी कोरोनावर आधारित ‘सावित्री’ नावाची खूप छान कथा वाचायला मिळते. लेखकाने या कथेला छान कलाटणी दिली आहे. 
‘ज्ञानेश्वरी’ कथेत ज्ञानेश्वरी नावाची एक हुशार विद्यार्थीनी आहे, ती एफ वाय बी एस सीला आहे, ती परीक्षेत फस्ट क्लासमध्ये पास होणार अशी कॉलेजाच्या शिक्षकांना आणि आईवडिलांना खात्री असते. पण अचानक अनपेक्षितपणे ती नापास होते. तो धक्का ज्ञानेश्वरीला सहन होत नाही आणि ती जे नको करायला हवे तेच करते. हा प्रकार निकालाच्या काळात सर्रास ऐकायला व पहायला मिळतो. अशा नैराश्यातून झालेल्या आत्महत्या पालकांप्रमाणे शिक्षकांनाही किती वेदना देणाऱ्या असतात हे ‘ज्ञानेश्वरी’ कथेतून लेखकाने सांगितले आहेत. 
‘कोविड १००’ ही एक विज्ञान कथा आहे, कोरोनाने सगळे जग बंदिस्त केलेले असताना दुसरीकडे लोक उपासमारीने मरत आहे, घराबाहेर पडले तर कोरोनाग्रस्त होऊन मरायचं आणि घरात थांबलं भुकेने मरायचं ; अशा सततच्या बातम्यांनी बालमनावर किती विपरीत परिणाम होतो हे या कथेतून लेखकाने खूप ताकदीने उभे केले आहेत, ही पुरस्कारप्राप्त कथा असून वाचकांच्या अंगावर रोमांच उभे करणारी आहे. 
खटारा गाडी, लेखकाची किंमत, छत्री, नानीचा निर्णय, मदिरेचा प्रवास, मनीषबाबू, कौटुंबिक सुख, पितृ अमावास्या अशा विविध विषयांवर या कथासंग्रहात बाबीस कथा आहेत, ज्या लेखकासह तुमच्या आमच्या रोजच्या जगण्यातल्या कथा आहेत. प्रत्येक कथेची मांडणी विषयाला धरून केलेली आहे, कुठेही पाल्हाळीकपणा आढळत नाही, प्रत्येक कथेतून लेखकाने सूचक असा वास्तवाची जाणीव करून देणारा बोध दिला आहे, जे लेखकाचे एक शक्तीस्थान वाटते, सोशल मिडीयावर या कथांना वाचकांनी भरभरू प्रेम दिले आहेत तेच आभासी जगातले प्रेम भासी जगात ‘कथा वास्तवातल्या’ या पुस्तकाला द्याल अशी मी अपेक्षा करतो व आवाहनही करतो, नक्कीच वाचकांच्या प्रेमाला खरा उतरणारा हा कथासंग्रह आहे, लेखक प्रा. विजय काकडे यांच्याकडून अशीच उत्तमोत्तम साहित्यनिर्मिती होत राहील अशा शुभेच्छा देतो.  धन्यवाद. 


कथासंग्रह - कथा वास्तवातल्या (भाग -१)
लेखक - प्रा. विजय काकडे
प्रस्तावना - संजय गोराडे (कथा/कादंबरी लेखक)
प्रकाशक - रंगतदार प्रकाशन
मूल्य - १५०/-

पुस्तक परिचय :-
संजय द. गोराडे (नाशिक) 
मो. नं - ९८५०६९१२१६      

मंगलवार, 16 मार्च 2021

उजेड पेरत जातो (कवितासंग्रह)


अंधारलेल्या आयुष्यांना प्रकाशाचा किरण देऊ पाहणार्‍या कवी राज शेळके यांच्या ‘उजेड पेरत जातो’ काव्यसंग्रहातील कविता म्हणजे नैराश्याने ग्रासलेल्यांना जगण्याकरिता सकारात्मक संजीवनी देणार्‍या आहे. खचलेल्यांना आधार देऊ पाहणारा हा कवी एका कवितेत म्हणतो, 

ही जगण्याची कैसी शर्यत
चढावयाचे शंभर पर्वत
अन थकण्याची नाही सवलत
हिंमत जपून ठेवा

जगण्याच्या शर्यतीत सुखदुःखाचे असंख्य पर्वत पार करायचे आहे, तेव्हा थकून चालणार नाही, श्वास चालू आहे तोवर हिंमत जपून ठेव. हलक्या फुलक्या शब्दात वाचकाला सहज समजेल अशा भाषेत कवी आपले विचार किती अलवार मांडताना दिसतो. प्रतिकं आणि प्रतिमांचा भडिमार न करता सरळ रोजच्या जगण्याला कविताचा आकार देत जातो. 

भूतकाळाच्या समिधा टाकून
यज्ञ कधी धगधगला का ?
दुःखाच्या खपल्यांना काढून
कुणी सुखाने जगला का ?

घडून गेलेल्या घटनेच्या विनाकारण खपल्या काढत राहणे व मनात संतापाचा अग्निकुंड पेटत ठेवणे यामुळे माणूस कधीच सुखी होऊ शकत नाही. कवीने या कवितेच्या शेवटच्या कडव्यात छान संदेश दिला आहे, ‘अक्कल खोटी, फोल पुरावे, व्यवहाराची गल्लत, शून्यामधून शून्य निघाला, ना बाकी ना शिल्लक’, घडून गेलेल्या गोष्टीवर उगाचच पुरावे देत राहणे, चुकीची गोष्ट कशी खरी आहे ते सांगत राहणे, परंतु शेवटी पदरी काय पडते ? एका अहंकाराचे खोटे समाधान. अशाच पध्दतीने कवी राज शेळके यांच्या लेखनीतून प्रसवलेल्या विविध कविता म्हणजे अहंकाराचा बुरखा पांघरलेल्या माणसाला वास्तवाचा आरसा दाखवणार्‍या आहे असे म्हटले तरी वावगे ठरू नये.   

शब्दाच्या पाणवठ्यावर
अर्थाचे होते येणे
कवितेची घागर भरता
दुःखाचे होते गाणे

असा हा कल्पनेत न रमणारा कवी आपल्या कवितेतून वास्तव मांडत जगाचं दुःख प्रामाणिकपणे शब्दबध्द करताना दिसतो. प्राप्त परिस्थितीत दुःखीकष्टी न होता त्याला तोंड कसे द्यायचे हेही तो सांगतो. दुःखाचा तट भरून आला की तो आपूसकच भावनिक होतो अन गहिवरल्या मनात शब्दांची गर्दी व्हावी तशी त्याची कवितेची घागर भरून येते, व त्याचे शब्द आपसूकच दुःखाचे गाणे होते. अशा या हळव्या मनाच्या कवीला अंत व उदय या दोन्ही गोष्टींची जाण आहे, त्यामुळे तो निव्वळ दुःख न मांडता त्यावर उपायही सुचवतो, सकारात्मक ऊर्जा देणार्‍या या कवितासंग्रहाच्या शीर्षक कवितेत कवी म्हणतो,  

अंधाराच्या काठावर मी
मशाल ठेवत जातो
उजेड पेरत जातो
मी उजेड पेरत जातो

असा हा ‘उजेड पेरत जातो’ कवितासंग्रह नक्कीच वाचकाचं जगणं हलकं करणारा आहे, तो लहानापासून थोरांपर्यंत सर्वांनीच वाचावा असा आहे. कारण लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच देहात परकाया प्रवेश करत कवीने कविता गुंफल्या आहे असे वाटते ; नव्हे तसे म्हटले तरी निरर्थक वाटू नये. कारण त्यांनी प्रत्येक वयोगटाची भुमिका तितक्याच कवितेतून आत्मितीयेने उभी केली आहे. त्यांची कविता समजायला जितकी सोपी आहे ; तितकीच सत्याची कास धरणारी आहे. असा कवी राज शेळके यांचा ‘उजेड पेरत जातो’ काव्यसंग्रह वैशाली प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केलेला आहे. आत्मशोध घ्यायला लावणारा हा कवितासंग्रह नक्कीच वाचकाचे आत्मभान जागे करणारा आहे इतकेच वाचक म्हणून मला वाटते. साहित्यिक वाटचालीसाठी कवी राज शेलके यांना खूप खूप शुभेच्छा... !


कवितासंग्रह - उजेड पेरत जातो
कवी - प्रा. राज शेळके
प्रकाशक - वैशाली प्रकाशन
मूल्य -

पुस्तक परिचय :- 
संजय द. गोराडे (नाशिक)
मो नं - 9850691216

उंबरगुज (ललितसंग्रह)


उंबरगुज (ललितसंग्रह)

नंत चौधरी एक मितभाषी व्यक्तिमत्त्व, तसे म्हणायला ते मितभाषी आहेत, कारण मितभाषी माणसं वास्तविक पाहता मनोमन स्वतःशी खूप बोलत असतात, सतत ती स्वतःशी संवाद साधत असतात, अशी स्वतःशी संवाद साधणारी माणसं खूप संवेदनशील व चिंतन करणारी असतात. ती छोट्याछोट्या गोष्टीत स्वतःला त्याच्या ठिकाणी पाहत भोवतालचं विश्व समजून घेत असतात. प्रत्येक सजीव निर्जीवासोबत गुजगोष्टी करत असतात. त्याचाच आविष्कार म्हणजे लेखक अनंत चौधरी यांचा ललितसंग्रह ‘उंबरगुज’ होय. 
माळावर, रानात, जाळीत पोसलेल्या पिकलेल्या फळांचं हितगुज स्पष्ट करणारा ‘उंबरगुज’ पुस्तकातील पहिलाच ललितलेख रसरसीत फळांची ओळख सांगणारा आहे. करवंद, उंबरं, आळवांनी, तोरणांनी अशा गारसलेल्या पिकलेल्या फळांचा आस्वाद घेण्याची इच्छा लेखकाच्या शब्दांनी जागृत केली तर नवल वाटू नये. तेवढी ताकद ललितलेख वाचताना लेखकाच्या प्रतिभासंपन्न लेखनीत नक्कीच असल्याचे जाणवते. विविध फळझाडांबरोबर उंबरगुज ललितलेखात उल्लेखलेलं उंबराचं झाड त्यांच्या विशेष आस्थेचे राहिले आहे. पिकलेल्या उंबराचा दरवळत असलेला उंबरवास, उंबराच्या झाडाखाली सगळीकडे पसरलेला उंबरसडा, लाल मुंग्याची उंबराच्या झाडावर वरखाली ये-जा, मधेच थांबून दोन मुंग्या आपसात एकमेकींशी उंबराविषयी गुजगोष्टी करत असाव्या असं लेखकाला वाटणं, खरंच... लेखकाच्या नजरेने टिपलेल्या छोट्याछोट्या गोष्टी त्यांच्या संवेदनशीलतेचे दर्शन घडवतात. काय बोलत असाव्या मुंग्या ! दोन मुंग्या एकमेकींजवळ थांबून नक्कीच कसली तरी देवाणघेवाण करत असाव्यात. अपघात झाला तरी मदतीचा हात न देणार्‍या काळात किड्यामुंग्याच्या भावविश्वाचा विचार करणारा लेखक किती कोमल मनाचा आहे हे संग्रहातील पुढील लेख वाचतानाही प्रकार्षाने जाणवते. त्यांना उंबर आजोबा तर मुंग्या नाती वाटतात. नातीप्रमाणे मुंग्या हळू आवाजात बोलत आहे, तर उंबर आजोबाप्रमाणे त्यांच्या गुजगोष्टी कान लावून ऐकत आहे, असं आस्था जडलेलं उंबराचं जीर्ण झालेलं झाड पाहून लेखकाच्या बालपणीच्या आठवणी आजही ताज्या होतात. बालपणी उपभोगलेली फळभाराची श्रीमंती, रानवैभव, फळणे, फुलणे, पिकणे सारंसारं आज नाहीसे झालेलं आहे, आज प्रगतीच्या नावाखाली सरार्स झाडांवर कुर्हाड चालविली जाते. चाखलेला फळाफुलांचा गंध-वासाला कायमचे मुकले जाण्याची भीती अखेर लेखक व्यक्त करतात. 
‘मामाची गुरं’ या लेखात लेखक शिकण्यासाठी म्हणून मामाच्या गावी आलेले आहे, बालवयात मामाच्या गावी शिक्षणाच्या बदल्यात काय-काय कामे करावी लागत असे, त्या आठवणींना त्यांनी या लेखात उजाळा दिला आहे. बालपणी शिकावं म्हणून शाळेत पाटीदप्तर कमी आणि गुरांमागे काठी-घोंगडेच जास्त घेऊन लागत असे. कधी-कधी नको वाटत असे त्यांना ते जीवन. गोठ्यातील शेणसडा काढणे, रानात गुरे चारायला घेऊन जाणे, थकलेलं जनावर हाकालणे, उधळलेलं जनावर वळून आणणे, यामुळे त्यांची फजिती होत ते रडकूंडीला येत असे. परंतु जनावरं वळत-वळतच शिक्षण घ्यावं लागणार आहे वस्तुस्थिथी कळल्यावर मात्र ते अजिबात तक्रार न मामाची गुरं वळतानाचे अनेक गंमतीदार अनुभव सांगतात, त्यातच त्यांना पुस्तकी ज्ञानापेक्षाही जीवनाचे अनमोल ज्ञान मिळते. त्याचेच फळ ते आज शहरातील संमृद्ध जीवन जगत आहे. बालपणीच्या त्या आठवणी लिहिताना मात्र लेखकाला तेच दिवस सुगीचे वाटतात. कारण तेव्हाची रानावनाची गोडी, रानातील गाणी, पक्षांची दाद, निसर्गाची भरभरून साद, झाडा-झुडपाची, वन औषधाची ओळख, पायवाट तुडवणं, बागडणं सारं सारं आता दुरापास्त झाले आहे. म्हणून लेखकाला आजचे सुखसीन जीवन बालपणीच्या जीवनाइतके संमृद्ध वाटत नाही.  
‘अंगण’ प्रत्येकाला आपलासा व भावणारा ललितलेख, जो प्रत्येकालाच स्वतःचे अंगण पारखे झाल्याची जाणीव करून देतो. घरापुढेचे अंगण ज्याच्या आपण इतक्या गहनतेने विचार करत नाही जितका घराचा करतो. घर बांधताना ते अमूक पध्दतीने असावं तमूक पध्दतीने असावं असा खूप अभ्यास व विचार केला जातो. पण अंगण... ज्याच्याविना घराला शोभा नाही ते मात्र अभ्यासाशिवाय तयार केले जाते. असं दुर्लक्षित असलेलं पण घराचं घरपण जपणारं अंगण लेखकाने त्यांच्या अभ्यासपूर्ण लेखनीतून सुबक व सुंदर रेखाटले आहे, जे लेखकाइतकेच प्रत्येकाच्या जीवनातील जिव्हाळ्याचे व महत्वाचे आहे. घरासमोरचे अंगण... जेथे बालपणी अंघोळीचा पाट थाटला जातो, खेळत लहानाचे मोठे होतो, गोट्या आणि कोयींचे डाव रंगतात, वयात आल्यावर अंगणात नजरानजर व इशारे केले जातात, बाहेरच्या मौल्यवान वस्तू घरात तर घरातील अडगळीच्या वस्तू अंगणात आणल्या जातात, भांडीकुंडी व कपडे धुण्यासाठी दगड अंगणात ठेवला जातो, धुतलेले कपडे, शेवया, कुराडया, पापड्या वाळत घालण्यासाठी अंगणच उपयोगाला येत असते. लग्नाचा मांडव व घरातील टोकाला गेलेलं भांडण अंगणातच उभे राहून केले जाते, असं इतर वेळी सावत्र असलेलं अंगण अप्रत्यक्षपणे किती महत्वाचं आहे हे लेखकाने खूप विस्ताराने व मार्मिक शब्दात सांगितले आहे, ‘घर आणि अंगण यात माणसाने जरी भेद केलेला असला तरी अंगणाला ठाऊक आहे, घरात जाणार्‍या प्रत्येक वस्तूंचा आणि माणसांचा मार्ग हा अंगणातून जातो, अंगणाला पाय लावूनच घरात पाऊल पडत असतं.’ असे अंगणाशी असलेले ॠणानुबंध लेखकाने छान शब्दात विशद केले आहे, अशा बदलत्या काळानुसार माणसाच्या मनाप्रमाणे संकोचित झालेले अंगण पुढील पिढीसाठी ‘अंगणाविना घर पारखे’ अशी भीती लेखकाप्रमाणे वाचकाच्याही मनाला शिवते. 
अनंत चौधरी लिखित ‘उंबरगुज’ हा पहिला ललितसंग्रह आहे, तरी त्यांच्या लिखाणात कुठलेही नवखेपणाचे लक्षणे आढळत नाही. उलट वाचकास प्रेरणादायी ठरणारे आहे, संग्रहात एकूण सोळा ललित लेख आहे. सगळे ललितलेख त्यांच्या गत आयुष्यातील स्मृतींसोबत आजच्या परिस्थितीशी सांगड घालताना तफावत दर्शवणारे आहे. बालपणी सोसलेलं, भोगालेलं, अनुभवलेलं खडतर आयुष्य तरीही आज जगत असलेल्या आयुष्यापेक्षा सरस असल्याची खंत ते प्रत्येक लेखाच्या अंती व्यक्त करतात. अंतर्मुख करणार्‍या अशा या ललितसंग्रहाला जेष्ठ साहित्यिक विवेकजी उगलमुगले व विजयकुमारजी मिठे यांची प्रस्थावना आहे. कादवाशिवार प्रकाशनाने हा संग्रह प्रकाशित केलेला असून अरविंदजी शेलार यांचे मुखपृष्ठ आहे तर आतील अक्षरजुळणी दीपक दंडवते यांची आहे. दोन पिढ्यांमधील भेद स्पष्ट करत माणसांचं माणूसपण जागं करणारा ‘उंबरगुज’ नक्कीच सर्वांनी वाचावा असा आहे. त्यांच्या पुढील लेखनास शुभेच्छा.  


ललितसंग्रह - उंबरगुज
लेखक - अनंत चौधरी
प्रकाशक - कादवा शिवार
मूल्य - 

************

पुस्तक परिचय :- 
संजय द. गोराडे (कादंबरी लेखक)
मो नं - ९८५०६९१२१६ 

एखाद्या शब्दासाठी (कवितासंग्रह)


‘एखादा श्वास निसटतो एखादे पान निखळते
एखाद्या शब्दासाठी एखादे स्वप्न अडकते....’

नुकताच प्रकाशित झालेला संतोष वाटपाडे लिखित ‘एखाद्या शब्दासाठी’ कवितासंग्रहातील वरील काव्यपंक्ती आहे. एखाद्या हिर्‍यातून चकचकत्या तेजाची असंख्य किरणं बाहेर पडावी  तशा संतोष वाटपाडे यांच्या काव्यसंग्रहातील कविता आहेत. वाचक ज्या दृष्टीने त्यांच्या कवितेकडे पाहिल ; तसा त्याला त्या दृष्टीने अर्थबोध होईल, काव्यसंग्रहाचे शीर्षक असलेल्या ‘एखाद्या शब्दासाठी’ या कवितेत कवी म्हणतो, ‘एखादा श्वास निसटतो एखादे पान निखळते’ एखाद्या हिरव्यागार वटवृक्षाचे एखादे पिवळे निखळून पडावे तसे या माणसांनी भरलेल्या जगात एखादा श्वास म्हणजे एखादा माणूस जग सोडून जातो तरी कुणाच्या खिजगणतीत नसते. क्षणभर दुःख करतात आणि विसरून जातात. 

‘एखाद्या शब्दासाठी एखादे स्वप्न अडकते....’ एखादा शब्द असा असतो ; ज्याने माणसांच्या स्वप्नांची पुर्तता होते, एखादा शब्द असा असतो ; ज्याने स्वप्नाची राखरांगोळी पण होऊ शकते. 

एखादा शब्द असा असतो ; ज्याने कवीला सहज कविता सुचते, आणि एखादा शब्द असा असतो ; कवीच्या कवी-मनात कवितेचे बीज रुजते मात्र स्फुरत काहीच नाही. शब्दांची ताकद माहीत असलेला असा हा कवी आपल्या कवितांमधून अफाट काहीतरी सांगू पाहतो आहे असे वाटते.

आयुष्य लाकडी मेणा
मी जन्मोजन्मी भोई
बदलावा खांदा केव्हा
मज अजून कळले नाही

संसाराच्या मोहमायेत अडकलेला माणसाला जीवनाविषयी एवढी आसक्ती निर्माण होते, तो इतका भौतिक सुखात जंजाळात गुरटफत जातो की, कुठं थांबलं पाहिजे हेच त्याला कळत नाही. आपण अडचण आहोत ; कपाळमोक्ष होतो तरी त्याला समजत नाही. तो फक्त धावत असतो. सुरुवातीला मौजेची वाटणारी वाट नंतर जीवघेणी ठरते तरी तो धावत असतो. कवीने आयुष्याला लाकडी मेणा म्हटलेलं आहे. हा लाकडी मेणा खांद्याचं कातडं सोलून काढतो तरी तो खाली ठेवायला तयार होत नाही, फक्त तो धावत असतो. माणसाच्या या आसक्तीवर कवीने ‘मेणा’ कवितेत छान भाष्य केले आहे. अशीच जीवन-मरणाचं गमक सांगणारी ‘जन्म एक ॠचा’ ही अभंग काव्य प्रकारातील रचना आहे, ‘सरणाच्या आत l जळते सरण l तसे रितेपण l लाभो आता ll’ माणसाच्या शरीरात जोवर आत्मा आहे, तोवर त्याला एक नाव आहे, पण आत्मा निघून गेला की लगेच लोकं त्याला बॉडी म्हणतात. ती बॉडी सरणावर ठेवतात, सरण पेटवले जाते, त्या सरणासोबत बॉडी पण जळत असते. आत्मा विरहीत त्या बॉडीला आता कुणाविषयीच लोभ, मोह, माया, मत्सर वाटत नाही. जिवंतपणी अहंमपणाने मिरवणारी ती बॉडी मरणानंतर अगदी रीती होऊन जळते आहे ; तसं रितेपण कवीला जिवंतपणी अपेक्षित आहे.

फाटलेल्या वाकळात म्हातारीची तगमग 
थकलेल्या काळजाने किती धरायचा तग
वाकळाच्या गाठोड्यात एक मणाचा पाचोळा
हात चाचपतो काठी पाणी झिरपते डोळा     
  
‘वाकळ’ ही कविता वाचल्यावर आपलाही शेवट उद्या असाच असणार आहे याची अनुभूती वाचकाला झाल्याशिवाय राहणार नाही. वार्धक्याचं जीणं किती भयंकर असतं याचं हुबेहूब चित्रण कवीने या कवितेत केले आहे. कविता वाचताना वार्धक्याचा पट जसाचा तसा डोळ्यासमोर साकारतो. कधीकाळी जिचं वजन पन्नास-साठ किलो असेल ती म्हातारी आता जेमतेम एक मणाच्या पाचोळ्यागत उरली आहे. किती अफाट शब्दसंपदा कवीजवळ आहे. घागर मे सागर दाखवण्याची ताकद कवीच्या ठायी आहे. प्रतिकं आणि प्रतिमाचा वापर कवितासंग्रहातील कवितेत अगदी लीलया केल्याचे आढळते. त्यामुळेच भोवतालचा प्रत्येक घटक किंवा घटना या कवीसाठी कविता बनली आहे. विविध विषय या काव्यसंग्रहात कवीने खूप छान हाताळले आहे. 

रघुवंशी राउळे जुनी गोदेच्या काठावरची 
रामकुंड स्पर्शण्यास जमते गर्दी घाटावरती 
जर्जर अस्थीपंजर काही वाटेवर बसलेले 
आयुष्याचे ओझे दिसते त्यांच्या डोक्यावरती  
                      
मग नाशिक कर्मभूमी असलेल्या कवीच्या नजरेतून ‘नाशिक’ हा विषय कसा सुटेल, नाशिकच्या नुसत्या गोदाकाठाचे वर्णन करायचे म्हटले तरी कमीतकमी एकशे सहा पान लागतील, पण या कवीने एकशे सहा शब्दात वाचकाला आपल्या काव्याद्वारे गोदावारीचे दर्शन घडवले आहे. गोदाकाठची राम मंदिरे, रामकुंड, सीतागुंफा, काळाराम मंदिर यांचा वेद घेत आजचे वास्तव ‘नाशिक’ या कवितेतून अचूक टिपले आहे. असा प्रतिभासंपन्न कवी एकाच विषयाला चिकटून न राहता अनेक विषयांना अगदी सहज  हाताळताना दिसतो आहे, तरीही कवी स्वतःविषयी लिहितो, 

लेखणी कुणाची असते हे मला माहिती नाही 
येतात कल्पना कोठुन हेसुद्धा ठाउक नाही 
ती जेव्हा हात पकडते कानात बोलते माझ्या 
येतात कागदावरती शब्दांच्या रांगा काही     
 
   छंद, वृत्त, अष्टाक्षरी, अभंग इतके सारे विविध साज परिधान करून कवीच्या लेखणीतून बहुरंगी व बहुढंगी कविता कागदावर साकारल्या आहे तरी कवी स्वतःला आश्वासकपणे कवी म्हणत नाही. यातूनच कवीची शोधक व अभ्यासक वृत्ती दिसून येते. ‘एखाद्या शब्दासाठी’ या कवितासंग्रहात एकूण एकोनव्वद कविता आहेत. त्या प्रेमरसासोबत समाजाला संदेश देणार्‍या तर आहेच ; पण जीवनाचं शाश्वात सत्यही उलगडणार्‍या आहे. प्रत्येक कवितेवर विस्ताराने लिहायचे ठरवले तरी दहा-दहा प्रबंध तयार होईल असे वाटते. अशा या कवितासंग्रहाचे प्रकाशक स्वयं प्रकाशन असून त्याचे अंतरंग व बाह्यरंग निलेश गायधनी सजवलेले आहे. ‘ही बाग कुणाची’ संतोष वाटपाडे यांच्या पहिल्या काव्यसंग्रहापाठोपाठ आलेला हा दुसरा काव्यसंग्रह ‘एखाद्या शब्दासाठी’ नक्कीच लिहिणार्‍या हातांना प्रेरणा देणारा आहे. प्रत्येकाने त्यांचे कवितासंग्रह अभ्यास म्हणून वाचावेत व संग्रही ठेवावे असं मी आग्रहपूर्वक म्हणेन. अशा या हरहुन्नरी कवीला त्याच्या पुढील भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. 


कवितासंग्रह - एखाद्या शब्दासाठी
कवी - संतोष वाटपाडे
प्रकाशन - वैशाली प्रकाशन
किंमत - 225/-

पुस्तक परिचय :-
संजय द. गोराडे (पाथर्डीफाटा नाशिक)
मो. नं - ९८५०६९१२१६ 

चांदणभूल (ललित कथासंग्रह)


चांदणभूल (ललित कथासंग्रह)
       लेखक - विजयकुमार मिठे 

काशातील चंद्र चांदण्या यांच्या प्रेमात पडलेले विजयकुमार मिठे यांचा नुकताच प्रकाशित झालेला ललित कथासंग्रह ‘चांदणभूल’ वाचकास वाचण्याचा सहज मोह होईल असाच निर्माण झाला आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये. कलेकलेने वाढत जाणारा कुणब्याचा कंदील असलेला चंद्र कागदावर उतरवताना ते अजिबात थकत नाही. आपल्या लेखनीद्वारे प्रसवणारा शब्द नि शब्द चंद्र प्रकाशासारखा  शीतल अनुभव देऊन जातो, प्रेयसी-प्रियकाराचा प्रसंग लिहितानाच चंद्र-चांदण्यांची आठवण होणार्‍या कवी-लेखकांना या ललित कथासंग्रहातून खूप काही शिकण्यासारखं आहे. प्रेयसीविनाही आकाशातील चंद्र-चांदण्यांची पडलेली भूल त्यांनी चांदणभूल या कथेत खूपच अलंकारिक व वेगवेगळ्या उपमा देत मांडली आहे. 
‘पुनवेचा चंद्र आईनं तव्यावर केलेल्या गोल गरगरीत भाकरीसारखा दिसायचा. त्याच्या शीतल प्रकाशापेक्षा त्याच्यावर काळे डाग कशाचे आहे, याचंच अधिक कुतूहल वाटायचे. आई आपल्या गोंडस बाळाला दृष्टीबाधा होऊ नये म्हणून काळी तिट लावते तशी चंद्राला कुणाची नजर लागायला नको म्हणून त्याच्या आईने ही काळ्या डागाची तिट तर लावली नसेल ना, बालपणी पाहिलेले चंद्रावरचे हे काळे डाग आजतागायत तसेच आहे हे पाहून वाटतं, एखाद्या पोरानं एकच सदरा रोज रोज वापरावा तसा चांदोमामा एकच अंगरखा घालून वर्षानुवर्ष फिरतो आहे. चंद्राच्या बाजूला काही अंतर राखून चमकणार्‍या ठळक चांदणीकडे पाहिलं की वाटायचं ही चांदोमामाची बायको असावी. सतत त्याच्या सोबतच असते. शिवाय एखाद्या घरंदाज बाईनं आपल्या नवर्‍यासमोर डोईवरचा पदर सावरून उभं रहावं, तशी ती आदबशीर चंद्रासमोर उभी असते.’ (पृष्ठ - १४)
अशी चंद्र-चांदण्यांची डोळ्यांवर नेहमीच भुरळ असलेला लेखक कथेच्या शेवटी खंतही व्यक्त करताना दिसतात, बालपणी अंगणात बसून आकाश न्याहाळताना त्यांना ते चांदण्यांनी खच्चून भरलेलं दिसायचं, पण वर्षागणिक चांदण्या पण घटल्या आहेत असं लिहित आजच्या पिढीची दृष्टीहीनता नकळत दर्शविताना वाटतात. आजच्या झपाट्याने होत औद्योगिकीकरणाच्या धावपळीत कुणालाही नैसर्गिक सौंदर्य पहायला वेळ नाही. फक्त आपलं कुटुंब आणि त्याचं सुख एवढेच संक्षिप्त विश्व झाले आहे. त्या पलिकडे कुणालाही काहीही दिसत नाही.  
विकसित आणि अविकसित असा दोन्ही काळाचा अनुभव असलेले लेखक आपल्या विविध कथांतून स्वतःच्या ग्रामीण शैलीत खूपच मार्मिक तुलना करताना दिसतात, या ललितकथासंग्रहात एकूण तेरा कथा असून प्रत्येक कथा काहीना काही संदेश देताना दिसते. त्यांच्या साहित्यनिर्मितीचे केंद्रस्थान हे गाव, गावाचा कारभार, गावातील माणसं, त्यांची सुखदुःख, शेती व भोवतालचा निसर्ग हे आहे. छोटेसे वाटणारे विषय पण खूपच छान पध्दतीने मांडणी करत वाचकांच्या समोर ठेवले आहे.
‘सोनपिवळ्या फुलांची बाभूळ’ या कथेत आज्यापंज्या जमान्यापासून वावराच्या मधोमध बिनकामाची जागा आडवून बसलेली बाभूळ पुर्वाजांनी सांभाळली म्हणून लेखक पण तिला जपतात. माणसांइतकं झाडांना जपणारा लेखक बाभळीविषयी कितीतरी जिव्हाळ्याच्या आठवणी सांगतात, पण तंत्रज्ञानाच्या युगात आजच्या पिढीला तिची अडचण होते, आणि ऐहिक सुखासाठी तिला निरुपोगी समजून तोडलं जातं, येथे लेखक कष्टी होत नैसर्गिक साधनसंपत्तीपैकी असलेली बाभूळही नामशेष होईल अशीही भीती व्यक्त करतात. 
‘गोष्टी रंगल्या ओठी’ ही लेखकाच्या बालवयातील गंमतीदार गोष्ट शब्दरूप व्यक्त होताना स्वतःसह सलमा आणि गुलतुरा या त्रिकोणी नात्याला खूपच सुंदर आयाम देतात. बालमैत्रिण सलमा हिच्याशी माहीत नसलेलं पण जडलेलं नातं निखालस व उत्कंठावर्धक मांडतात. दोघांच्या नात्यात धर्म-जात, लिंग, वय याचा कसलाही अडसर होत नाही, शेतात माँसोबत आलेली सलमा गुलतुर्‍याची पाने चावून ओठ लाल करण्याचा अनोखा खेळ ती आणि लेखक खेळतात. त्यानंतर त्यांना जो काही बेदम मार पडतो त्याने त्या अल्लड जिवांची कायमची ताटातूट होते. असं स्त्री-पुरुष नातेसंबंधाविषयी आकर्षण वाटावं अशा वयात ते कुठलाही आक्रस्ताळेपणा न करता आजच्या पिढीला सहज समर्पण शिकवून जातात.  
अशाच पुढील दहा कथा लेखकाची प्रगल्भता सिद्ध करत वेगवेगळा संदेश देतात. या सर्व ललित कथा त्यांच्या बालवयातील असून वयाच्या साठाव्या वर्षीही त्यांनी छान चितारल्या आहेत. खेड्यांचं झपाट्याने शहरीकरण होत असलेल्या काळात ज्याला खरंच खेडं अनुभवायचं असेल त्याने नक्की ‘चांदणभूल’ हा ललित कथासंग्रह वाचला पाहिजे. या पुस्तकाला विवेक उगलमुगले या चिंतनशील प्रस्तावना लाभल्याने पुस्तकाची उंची खूप वाढली आहे, मुखपृष्ठ अरविंद शेलार तर अंतर्गत सजावट दीपक दंडवते यांनी नाविन्यपूर्ण रेखाटली आहे. पन्नास वर्षापूर्वीचं लेखक विजयकुमार मिठे यांचं आयुष्य म्हणजे आजच्या पिढीसाठी पुस्तकरुपाने लाभलेला अस्सल खेड्यातला गावरान मेवाच आहे. एक वाचक या नात्याने पुस्तक शब्द रुपाने भूल पाडणार्‍या अशा जेष्ठ साहित्यिकास खूप खूप शुभेच्छा. 

पुस्तक परिचय :- 
संजय डी. गोराडे (कथा-कादंबरी लेखक)
मो. नं - ९८५०६९१२१६, नाशिक.
                                                           
               

अणीबाणी


स्वातंत्र्य असूनही पारतंत्र्यात असल्याचा अनुभव, इंग्रजाप्रमाणे थोपलेल्या जुलमी राजवटीचा भारतीयांना झालेला पुन्हा एकदा साक्षात्कार आणि हिरावलेले स्वातंत्र्य पुन्हा मिळविण्यासाठी कित्येकांना विनाकारण द्यावी लागलेली आहुती.
विजय जोशी लिखित व चपराक प्रकाशित ‘अणीबाणी’ पुस्तक वाचले आणि अणीबाणी शब्दाचा अर्थ खऱ्या अर्थाने कळला. आपण आपल्या वाट्याला थोडीजरी तणावग्रस्त परिस्थिती आली तरी सहज बोलून जातो, ‘अणीबाणी आहे का ?’ किंवा हल्लीच्या सरकारला उद्देशून हा शब्द बोलल्याचे सतत कानावर पडते आहे. मात्र ‘अणीबाणी’ पुस्तक वाचल्यावर ती व्यक्ती ‘अणीबाणी’ शब्दाचा नक्की खूप जपून वापर करेल असे वाटते. 
 अणीबाणीत ज्यांनी काही काळ तुरुंगवास भोगला व जुलमी राजवटीचा जुलूम सोसला असे विजय जोशी यांनी अनुभवातून लिहिलेले ‘अणीबाणी’ पुस्तक आजच्या पिढीला कधी काळी लोकशाहीला कलंक ठरलेल्या इतिहासाबद्दल खूप काही माहिती सांगणारे आहे. 
भारताच्या इतिहासामधील १९७५ ते १९७६ दरम्यान २१ महिने तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशाची सुरक्षा धोक्यात असल्याचे कारण सांगून देशव्यापी अणीबाणी लागू केली होती. याद्वारे इंदिरा गांधींनी लोकशाही स्थगित करून भारत प्रशासनाचे सर्वाधिकार आपल्या हाती घेतले व निवडणुका अमर्यादित काळासाठी पुढे ढकलल्या होत्या. कारण अलाहाबाद उच्च न्यायलयाने त्यांच्या विरोधात निकाल दिला होता. १९७१ च्या निवडणुकीत सरकारी अधिकारी व यंत्रणेचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवत पुढील सहा वर्ष लोकसभेची व विधानसभेची निवडणूक लढविता येणार नाही असा निकाल दिला होता. मात्र भ्रष्टाचार सिद्ध होऊही राजकीय महत्वाकांक्षेपायी इंदिरा गांधी सत्ता सोडायला तयार नव्हत्या. परिणामी अणीबाणी लागू करत जयप्रकाश नारायण, अटलबिहारी वाचपेयी, जॉर्ज फर्नांडिस अशा अनेक राजकीय विरोधकांना त्यांनी तुरुंगात डांबले होते, तसेच प्रसारमाध्यमांच्या अधिकारांवर गदा आणली होती. कोणीही त्यांच्या विरोधात ब्र शब्द जरी उच्चारला तरी कारवाई म्हणून वीस कलमी कार्यक्रम त्यांनी तयार केला होता. तो असा. 
१. अणीबाणीस विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यास किंवा सत्याग्रहीस शिव्या देऊन अपमानित करणे व धिंड काढणे, २. सत्याग्रहीस विवस्त्र करून यातना देणे. ३. सत्याग्रहींना अटक केल्यानंतर त्यांना काही दिवस झोपू न देणे व उपाशी ठेवणे. ४. सत्याग्रहींच्या शरीरावर सिगारेटचे व मेणबत्यांचे चटके देणे. ५. अटक झालेल्या कार्यकर्त्यांना उलटे लटकवणे. ६. गुप्तांगात दांडा घुसवणे. ७. डोळ्यांत व गुप्तांगात लाल मिरचीची पावडर टाकून छळ करणे. ८. खुर्चीप्रमाणे उभे करून यातना देणे. ९. हातापायाची नखे उपटून काढणे. १०. विजेचे शॉक देणे. ११. झाडाला उलटे टांगून मार देणे व दहशत पसरवणे. १२. केस जोराचे उपटणे व भिंतीवर डोके आपटणे. १३. विवस्त्र करून बुटाने तुडवणे. १४. रोलर फिरवणे. १५. तळपायावर काठीने किंवा वेताने मांस येईपर्यंत मारणे. १६. इंग्रजी Z अक्षरासारख्या स्थितीत तासनतास उभे करणे. १७. अंडकोषाच्या गाठी दाबून वेदना देणे. १८. कडाक्याच्या थंडीत रात्रभर नागवे उभे करणे व थंड पाणी टाकणे. १९. झोपवून कोपरावर चालण्यास भाग पाडणे. २०. हाताच्या बोटात छडी ठेवून दाबणे  व गुडघ्यात दांडा ठेवून दाबणे. 
असे प्रकारचे अनन्वीत अमानवी अत्याचार अणीबाणीच्या काळात निरपराध जनतेवर केले गेले. तसेच महत्त्वाच्या वृत्तपत्रांच्या कार्यालयांची वीजसेवा खंडित केली गेली. एक प्रकारची हुकुमशाही राजवट सुरु झाली. कुणालाही आपले मत खुलेपणाने मांडता येत नव्हते किंवा आवाज उठवता येत नव्हता. असा लोकशाहीला काळींबा ठरलेला एकवीस महिन्यांचा काळ व त्याविरुद्ध दिलेली झुंज विजय जोशी यांनी ‘अणीबाणी’ पुस्तकात नेमकेपणाने मांडली आहे. 
अणीबाणी पुस्तक वाचताना अनेक गोष्टींची उकल होते. त्यात महत्त्वाची उकल पुस्तकाचे शीर्षक ‘अणीबाणी’ शब्दाबद्दल होते. इतिहासातही रूढार्थाने ‘आणीबाणी’ शब्द याप्रमाणे  वापरल्याचे निदर्शनास येते. मात्र तज्ञांच्या मते ‘अणीबाणी’ असा आहे. अणी म्हणजे निकाराची झुंज. तसेच अनेक ज्ञात-अज्ञात व्यक्तींच्या आणि सामाजिक संस्थाच्या नावांची ओळख होते, ज्यांनी अणीबाणीत स्वतःसह आपला संसार डावावर लावला व पुन्हा स्वातंत्र्य मिळविण्यास मोलाचे योगदान दिले. 
वाचक म्हणून अणीबाणी पुस्तक मला इतिहासाची नव्याने ओळख करून देणारे वाटले. कादंबरी नाही पण कादंबरीच्या अंगाने जाणारे पुस्तक असल्यामुळे ते अजिबात कंटाळवाणे वाटत नाही. किरकोळ एकदोन त्रुटी वगळता पुस्तक नव्या पिढीसाठी नक्कीच महत्त्वाचा दस्तावेज आहे. पुस्तकाला तितक्याच तोलामोलाची प्रस्तावना घनश्याम पाटील यांनी लिहिल्याने वाचक पुस्तक वाचण्यास प्रवृत्त होतो हे खासकरून नमुत करावेसे वाटते, अशा प्रत्यक्ष अनुभावावर आधारित असलेल्या ‘अणीबाणी’ या अस्सल ऐतिहासिक पुस्तकाचा वाचक भरभरून स्वागत करतील अशी आशा करतो.  लेखक  व प्रकाशकांच्या या निर्मितीला शुभेच्छा देतो. 

पुस्तक - अणीबाणी 
लेखक - विजय जोशी 
प्रकाशन – चपराक प्रकाशन 
प्रस्तावना - घनश्याम पाटील 
मूल्य - १५०रुपये.

पुस्तक परिचय – संजय द. गोराडे (नाशिक) 
मो नं – 9850691216.

सोमवार, 15 मार्च 2021

सदाशिव (भयकथा)


सासुरवाडीहून म्हणजे पिंपळगावहून चांदोरी-सायखेडामार्गे मी माझ्या गावी बारागाव पिंपरीला बाईकने जात होतो. दुपारचे दोन अडीच वाजले असतील. बाईकवर होतो तरी उन्हाच्या झळा माझं अंग होरपळून काढत होत्या, बाईकच्या वेगासोबत तर अधिकच भाजून काढत होत्या, आगीच्या भट्टीतून आपण बाईक चालवत आहोत असेच मला वाटत होते. तरी मेव्हुणा म्हणत होता, ‘दाजी ऊन खाली झाल्यावर जा !’ पण मीच ऐकले नव्हते, एक-दीड तासात गावी पोहचेल म्हणत मी भर उन्हाचे निघालो होतो. अर्धेअधिक अंतर चालून आल्यावर वाटू लागले होते ; आपण मेव्हुण्याचे ऐकायला हवे होते. डोक्यावरचा कलेला सूर्य आगीचे मोठमोठे गोळे माझ्यावर बरसवत मला ‘तावून सुलाखून निघणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ खूपच दाहकपणे समजून सांगत होता. 
मी घटकाभर विश्रांतीसाठी रस्त्याने सावली शोधू लागलो. रस्त्याच्या कडेला एखादे झाड दिसते का पाहू लागलो. बाईकने बरेच अंतर कापल्यानंतर एका ठिकाणी लिंबाऱ्याच्या झाडाची सावली नजरेस पडली. शेजारीच आंब्याचेही झाड होते. दोन्ही झाडं छान हिरवीगार डाफळलेली होती. ती घनदाट थंडगार सावली पाहून मी लागलीच बाईक वळवली. बाईक स्टँडवर उभी करताना लिंबाऱ्याच्या झाडाच्या बुंद्याशी असलेला चौथरा नजरेस पडला. चौथरा कुठल्या तरी साधूसंताच्या नावाने बांधलेला दिसत होता. मी चौथऱ्यावर बसता-बसता मूर्तीच्या पायथ्याशी लिहिलेली अक्षरे वाचू लागलो, ‘सदाशिव...!’ पुढची अक्षरे तेलाने काळपट पडून दिसेनाशी झालेली होती. कोणीतरी योगी पुरुष असावेत मी अंदाज केला. भोवताली नजर टाकताच दूरदूरपर्यंत वस्ती दिसत नव्हती. असेल कशी म्हणा, सर्वत्र जिरायती मुरमाटी बरडाची जमीन होती, गवताचा तर उन्हाने वाळून पाचोळा तयार झाला होता, आडरानी आढळलेली दोन झाडे एखाद्या कल्पवृक्षासारखी मला भासली होती, मी कपाळावरचा घाम रुमालाने टिपत मोठा सुस्कार टाकला. आता मला निंबाऱ्याच्या घनदाट सावलीत खूप हायसे वाटले होते. अजून काही काळ मला सावलीचा आश्रय मिळाला नसता तर मी नक्कीच उष्माघाताचा बळी ठरलो असतो, परंतु कोण हे सदाशिव महाराज अशा विरान ठिकाणी मदतीला धावून आले अन माझ्या अंगाची होणारी काहली थांबली, मी नकळत त्यांना हात जोडले होते.
चौथरा निर्मनुष्य ठिकाणी असूनही खूप साफसूफ होता. कोणीतरी देखभाल करणारा असावा, जो चौथऱ्याची नित्य खूप आस्थेने निगा राखतो आहे. माझी सुखावलेली नजर चौथरा निहाळत असताना माझ्या कानांवर आवाज पडला, “कोण गावचं पाव्हणं म्हणायचं ?” 
मी झर्रकन आवाजाच्या दिशेने वळून पाहिलं, समोर काष्टी धोतर नेसलेले, नेहरू शर्ट घातलेले व डोक्यावर गांधी टोपी असलेले एक पन्नाशी ओलांडलेले काळासावळे गृहस्थ मला उभे दिसले. प्रथम मी आकस्मित आलेल्या आवाजाने घाबरलो होतो, पण पटकन मी स्वतःला सावरलं. त्यांच्या काखेतली चटई पाहून तेही बहुदा उन्हाची विश्रांती करायला आले असावे. मी आदबीने उत्तर देत म्हणालो, “मी पिंप्रीचा !” 
चौथऱ्याच्या दुसऱ्या कडेला चटई अंथरत व त्यावर बुड टेकवत त्या गृहस्थांनी पुन्हा प्रश्न केला, “कोणत्या पिंप्रीचं, बारागाव पिंप्रीचं की पाटपिंप्रीचं ?” 
“बारागाव पिंप्रीचा !” त्या गृहस्थांना सिन्नर तालुक्याची बारीकसारीक माहिती दिसत होती.    
“मग इकडं कुठं ?” त्या गृहस्थांनी प्रश्न केला.  
“बसवंत पिंपळगावलां गेलो व्हुतो, तिकडून येऊन रायलो !” मी निःसंशयी  उत्तर दिलं. 
“असं असं...!” माझ्या उत्तराने त्या गृहस्थांचे समाधान झालेले दिसत होते, अधिक काही न विचारता मोठा उसासा टाकत ते पुढे म्हणाले, “या वर्षी ऊन लईच मरणाचं हाये बुवा !” 
“हो ना, गाडीवर चाललोय तरी जीव पाणीपाणी करून राहायलाय, म्हणून म्हटलं उन्हाचं घटकाभर सावलीत बसावं !” मीही दुजोरा दिला होता. 
“बसा बसा...मीही आपलं दररोज उन्हाचं येथ आराम कराया येतुया !” ते गृहस्थ चटाईची वळकुटी पसरवत म्हणाले.  
माझ्याकडे तोंड करून चटईवर एक कानी झोपलेल्या त्या गृहस्थांकडे पाहत मी म्हणालो, “करा करा... मीही थोडं थांबतो अन निघतो !”
“ऊन खाली झाल्यावरच जावा आता !” त्या गृहस्थांनीही तोच सल्ला दिला ; जो पिंपरीला निघताना मघाशी मेव्हुण्याने दिला होता.  
“हा... थोडंसं बसतो !”
दुपारची वामकुक्षी घेण्याच्या तयारीत असलेले ते गृहस्थ निद्रादेवीची प्रतीक्षा करू लागले. त्यांना जागे काही झोपलेले पाहून मी सहज प्रश्न केला, “काका, हे सदाशिव महाराज कोणी संत-महंत होते का ?” 
“पोरा, हा लहान भावाने मोठ्या भावाच्या स्मरणार्थ बांधलेला चिरा हाय, जो गेल्याच साली बांधलेला हाय !” ते गृहस्थ पुन्हा उठून बसले. 
सदाशिव महाराजांच्या मूर्तीवरून माझी नजर हटवत त्या गृहस्थांकडे पाहत उद्गारलो, “असं आहे का ते !”   
“व्ह्य.... ती खूप मोठी हकीकत हाये दोघा भावांची !”
 ते गृहस्थ सदाशिव महाराजांची हकीकत सांगू लागले. 
सदू आणि महादू दोघे भाऊ होते. सदू मोठा तर महादू लहान होता. त्यांचा शेती व्यवसाय होता. ते पारंपारिक पध्दतीने बैलांच्या मदतीने शेती करत असत. मिरगाचा पाऊस चांगलाच पडून गेल्याने इतर शेतकर्‍यांप्रमाणे सदू आणि महादूचीही शेतात बाजरीचं बियाणं पेरण्याची धावपळ सुरू झाली होती. 
बरडाच्या जमिनीत अर्ध-अधिक पेरून झालं होतं, सदू पाभरीने पुढे पेरत होता तर महादू राहाख्याने मागे ते ढाळत (सपाट करणे) होता. वावराच्या कडेला पोहचलेला महादू आऊत मागे वळवत असताना त्याचं लक्ष सहज पुढे पेरत चाललेल्या सदूच्या आऊताकडे गेले. बैलं हाकारत पेरत पुढे चाललेल्या सदूच्या दोन्ही पायांच्या मधे पांढरं-शुभ्र पात्यासारखं काहीतरी वळवळताना चमकलेले त्याला दिसले. निरखून पाहताच त्याच्या काळजात धस्स झाले. एक भला मोठा साप पाभरीच्या दात्यांमध्ये गुरफटलेला होता. पाभरीच्या दात्यांमध्ये अडकलेला तो साप आऊतासोबत फरपटत-फरपटत चालला होता. सात-आठ पावलं त्याची ती जीवघेणी फरपट तशीच चालू होती. कशीतरी सापाने स्वतःची पाभरीच्या दात्यांमधून सुटका करून घेतली ; तोच सदूचा पाय सापावर पडला. कामात मग्न सदूने सापाच्या शेपटीवर पाय देताच तो चवताळला, अन फूस करत त्याच्या उजव्या पायाला डंख मारत कडाडून डसला. चावा घेऊन पलटी झालेला साप पुन्हा सोयीचा होत जवळच असलेल्या गवतात मरणाच्या भीतीने सळसळ करत निघून गेला.
डोळ्यांदेखत सदूला झालेला सर्पदंश पाहून महादू खूप घाबरला. आता आपला भाऊ सापाच्या विषारी दंशामुळे मरणार या विचारानेच त्याच्या काळजात धडकी भरली. ती घटना इतकी निमिषार्धात घडली होते की, तो सदूला सावधही करू शकला नव्हता. कळले तेव्हा साप गवताचा आश्रय घेत गायब झाला होता. काय करावं काही त्याला सुचेना. त्या आडरानात चिटपाखरूही नजरेत पडत नव्हते, जे मदतीला धावून येईल. काय करावे ? कुणाला बोलवावे ? तो हादरून गेला होता.  
सदूचं मात्र काही झालंच नाही असं पेरणी करायचं काम चालू होतं. त्याच्या गावीही नव्हते की, आपल्याला साप चावला आहे. आऊताच्या सहा-सात तासाच्या फेर्‍या झाल्यानंतर त्याच्या लक्षात आले की, महादूने आऊत थांबवलेले आहे, व तो चमत्कारिक नजरेने आपल्याकडे पाहतो आहे. महादूचं ते खुळ्यागत एकटक आपल्याकडे पाहणं विचित्र वाटल्याने त्याने पण आऊत थांबवून विचारणा केली, “काय रं... काय झालं, असं काय येड्यागत पाहतोया !”
साप चावूनही धडधाकट असलेल्या भावाकडे महादू अविश्वासाने पाहत होता. सापाच्या विषारी दंशाने कोणीही असो वाचण्याची सुतरामसुद्धा शक्यता नव्हती, पण सदूला काहीही झालेले नव्हते. तो विस्मय चकित होत म्हणाला, “काय नाय, असंच पाहतोया, कौतुक वाटतंया, तू लयीच पक्का हाय !” 
“म्हणजे ? समजलो न्हाय !” काम थांबवून हा काय वेड्यागत बडबडतो आहे, बोलणे विषयाशी सुसंगत न वाटल्याने सदू संभ्रमित झाला होता.  
‘सापाचं इष लगेच नायतर हळूहळू अंगात भिणत असण !’ मनात विचार येताच महादू बांधावरच्या निंबाची एक छोटी फांदी मोडून घेऊन आला. व सदूच्या समोर धरत म्हणाला, “ते राहू दे... हा निंबाचा पाला खा, कडू लागतूया का, पहा ?”
“मी जनावर हाय व्हय, निंबाचा पाला खाया !” देणं न घेणं आणि कंदील लावून येणं, मधेच नको ते खुसपट काढलेले पाहून सदू त्याच्यावर डाफरला होता.  
विषारी साप चावल्यावर निंबाचा पाला खाल्ला तर कडू लागत नाही असं महादूने कुठंतरी ऐकलं होतं. आता त्याला ते आठवताच तो लागलीच निंबाची छोटी फांदी तोडून घेऊन आला होता. मन चिंती ते वैरीही न चिंती, मनात नको-नको त्या घोंघावणार्‍या विचारांची खात्री तरी करून घ्यावी ; साप विषारी आहे की बिनविषारी. तो आग्रह करत म्हणाला, “खा तरी, आयुर्वेदिक असतुया, मी म्हणतू म्हणून खा !”
“आण !” वैतागल्यागत सदूने त्याच्या हातातून निंबाची फांदी हिसकावून घेतली. लहान मुलागत हा असा काय वागतो आहे हे त्याला अजिबात कळत नव्हते. लहान भावाचा नादानपणा पुरावायचा म्हणून त्याने निंबाचे तीन-चार पाने तोडून कचंकचं चावली. माळरान शेतातला कडूनिंब तो ; त्याच्या पानापानांत खचून कडूपणा भरलेला होता. खाताच त्याला भयंकर कडू लागला होता. तोंड वेडंवाकडं करत तो म्हणाला, “लेका किती कडू हाय, काहीपण खाया सांगतूया !”
“काही नाय... बिनइषारी हाय !” 
निंबाचा पाला खाऊन सदूचं वेडंवाकडं झालेलं तोंड पाहून महादूला गंमतही वाटली होती आणि मनाला धीरही आला होता. ‘काळ आला हुता पण येळ आली नव्हती !’ मनोमन म्हणत त्याने देवाचे आभार मानले होते. चावलेला साप एकतर बिनविषारी तरी असावा किंवा विषारी असेल तर त्याच्या विषदंती वेळेवर प्रसरण तरी पावल्या नसाव्या. मनाला समजूत घालणारे असे वेगवेगळे अंदाज तो मनात बांधत होता, मात्र त्याने एका गोष्टीची विशेष खबरदारी बाळगली होती. त्याला झालेल्या सर्पदंशाबद्दल चकार शब्दाने देखील त्याने वाच्यता केली नव्हती, कारण सदू एक नंबरचा भित्रा आहे हे त्याला चांगलेच ठाऊक होते. उगाचच तो न घडलेल्या घटनेचा व्यर्थ विचार करत बसेल आणि नको त्या गोष्टीचा धसका घेऊन अनर्थ ओढावून घेईल असे त्याला वाटले होते. 
तोंडातील निंबाच्या पानांचा हिरवा चोथा ‘थू-थू’ बाजूला थुंकत सदू म्हणाला, “निंबाचा पाला इषारी नव्हं कडू असतूया !”
“मला वाटलं, इषारी असतूया... !”
महादू गंमतीने त्याच्या अजाणतेपणाची फिरकी घेत हसत होता. त्याच्या हसण्यात भाऊ सुखरूप असल्याचा आनंद ओतप्रोत होता.  
एक वर्षानंतर 
सदू आणि महादू सालाबादप्रमाणे बरडाच्या जमिनीत बाजरीच्या बियाणाची पेरणी करत होते. अर्ध-अधिक पेरून झालं होतं. बैलांना विसावा व औतकर्‍यांना पाणी प्यायचे म्हणून औतं उभी केली होती. पाणी पिता-पिता महादूला मागच्या वर्षाची घडलेली घटना आठवली. मागच्या वर्षी या वावरात पेरणी करत असताना सदूला साप चावला होता. तो साप पाहूनच मूर्च्र्छा येईल इतका तो भयंकर होता. मात्र सदूला त्या सापाच्या दंशाने काहीही झाले नव्हते. उलट गेल्या एक वर्षात त्याला साधा तापदेखील आला नव्हता. सापाचे विष पचविणारा सदाशिव म्हणजे शंकराचाच दुसरा अवतार आहे की काय असे त्याला वाटले होते. असेही सदाशिव म्हणजे शंकराचे दुसरे नाव आहे. त्याच्या या बहादूरीचे त्याला नेहमीच कौतुक राहिले होते, पण त्याची ही बहादूरी त्याने कटाक्षाने इतरांजवळ सांगण्याचे टाळले होते. एक वर्षापासून मनाच्या कुपित बंद करून ठेवलेला भित्र्या भावाचा भीम-पराक्रम आज उघड करावा असे त्याच्या मनात आले होते, पण त्याचं साशंक मन त्याला परवानगी देत नव्हते.        
“दादा, मांगच्या वर्षी या वावरात तुझ्यासंग एक इपरीत घडले हुते. सांगितले असते, पण नग.. तू घाबरून जाशीन !” न राहूनही महादू बोलला होता.  
“नाय घाबरणार, सांग !” घटाघटा वाडग्याने पाणी पित असलेला सदू आश्वासकपणे बोलला होता.  
“नग, तू लय डरपोक हाय, मला ठाव हाय !” नकार देत महादूने मनातलं गुपित सांगायचं टाळलं होतं.  
“येक वर्षात काई झालं नाय, तर अता काय हुणार हाय ? सांग...!” सदू बेफिकीरेने बोलला होता.  
“पहाय बरं !” सदूची भयरहित मुद्रा पाहून महादूला त्याच्यातील भित्रेपणा चांगलाच कमी झालेला दिसला होता, तरी मनातले गुपित उघड करायला त्याचं मन चाचरत होते. खूप आग्रह केल्यावर अखेर टोपरा नको म्हणून तो शब्द सोडवून घेत म्हणाला, “परत मला दोष देशीन !”  
“नही देणार, सांग !” सदूला आता उत्सुकता लागली होती.   
“तू म्हणतू म्हणून सांगतूया !” त्याचा निडरपणा पाहून महादूला विश्वास आला होता. ‘येक वर्षात काई झालं नाय, तर अता हुणार हाय ?’ हे त्याचं म्हणणं त्याला पटलं होतं. जे काही व्हायचे ते तेव्हाच एक वर्षापूर्वी झाले असते. वर्षापासून मनात दडवलेलं गुह्य उघड करण्यास राजी होत तो म्हणाला, “मागच्या वर्षी याच वावरात त्या ठिकाणी एक इषारी साप तुला चावला हुता, पाहून तूही घाबरून गेला असता इतका तो मोठा हुता, पण तुला त्याच्या डसण्याने काईच झालं नही !” 
“काय सांगतूया !” ऐकूनच सदूच्या तोंडाचा धक्का बसल्यागत ‘आ’ झाला होता.   
“खरं सांगतूया... देवाशपथ !” निलकंठेश्वराप्रमाणे हलाहाल पचविणार्‍या त्याच्या धाडसाबद्दल महादू विश्वास देत कौतुकाने म्हणाला, “तू फकस्त मनाने डरपोक हाय, शरीराने नाय !” 
घडलेली हकीकत मग महादू मिठमिरची लावून रंगवून रंगवून सांगू लागला, ‘गेल्या वर्साला आपुन  दोघं या वावरात पेरणी करत हुतो... एक भला मोठा साप तुया औताखाली म्हंजे पाभरीच्या खाली आला हुता... पाभरीच्या दात्यांमधे अडकलेला इषारी साप खूप प्रयत्नांनी सुटला... पुढं तो साप तुया पायाखाली आला... तू पाय दिल्याने सापाने तुया उजव्या पायाला डंख मारला... मी खूप घाबरलू... तुला मात्र काईच झाले नव्हते... मी तुला निंबाचा पाला खाया लावला... असं वैगरे वैगरे...!’ मनात एक वर्षापासून दाबून ठेवलेलं रहस्य रित करताना किती आणि कसं सांगू असं त्याला झालं होतं. 
बराच वेळ झाला उभी केलेल्या औताची जनावरं कंटाळली होती, तरी महादू बोलायचं थांबत नव्हता. भारतातील सर्वात विषारी जातीच्या सापाचे विष पचविणारा सदाशिव त्याच्या लेखी जगातल्या सात आश्चर्यापैकीच एक होता, गर्व करावी अशी ती घटना तो कौतुकाने तोंडाला फेस येईपर्यंत सांगत होता. मात्र बोलताना एक गोष्ट तो अजूनही बिलकुल विसरला नव्हता. सदू प्रमाणापलिकडंचा भित्रा आहे. त्याला त्याच्या जिगरबाजपणाची जाणीव करून देणं गरजेचं आहे. त्याच्यात आत्मविश्वासाचं बळ भरत हिंमत वाढवणं आवश्यक आहे. नाहीतर नको तो अनर्थ व्हायचा.  
विनाकारण खांद्यावर जू घेऊन उभे असलेल्या बैलांपैकी एका बैलाने जू सांडवले तेव्हा गप्पांत दंगलेला महादू बोलायचा थांबला. वेळ बराच झालेला पाहून दोघं भाऊ काळजी करावी तसे उठले व राहिलेलं वावर पुन्हा जोमाने पेरायला भिडले. सूर्य मावळतीकडे झुकलेला प्रथमच त्यांना दिसला होता. आजच्या आज बरडाची पट्टी त्यांना पेरायची होती. हयगय न करता ठरलेलं काम पूर्ण करायला पुन्हा नेटाने ते जुंपले होते. तासातासाने पेरायचे वावर कमी होत होते. पेरत असताना सदूचे औत त्याला साप चावला होता त्या ठिकाणी पोहचले असेल-नसेल, अचानक त्याला काय झाले कुणास ठाऊक ! तो धाडकन जमिनीवर कोसळला. पाठीमागे राहाख्याने पेरलेलं वावर ढाळत असलेल्या महादूने ते उघड्या डोळ्यांनी पाहिलं, आणि हातातील औत तेथेच सोडून देत घाबरून त्याने त्याच्याकडे धाव घेतली. 
इतक्यात चांगले गप्पा मारत होतो, अचानक काय झाले त्याला ? काहीच कळायला मार्ग नव्हता. घाबरलेला महादू त्याच्याजवळ पोहचताच त्याने प्रथम त्याचा श्वास आणि नस दोन्ही हात लावून तपासून पाहिले. दोन्हीही थांबल्यासारखे भासले. घाईघाईने उठून बसवत तो त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करू लागला, पण सगळं अचेतन होतं. धावतपळत जाऊन बांधावरच्या मटक्यातले गार पाणी आणले, त्याच्या चेहर्‍यावर शिंपडले, पण अजिबात सादास प्रतिसाद मिळत नव्हता. मनात भीती होती तेच अखेर घडले होते. साप चावला आहे या हैबतीने तो गतप्राण झाला होता. आपला भाऊ जग सोडून निघून गेला आहे हे समजताच त्याने टाहो फोडला, “दा... दा...!”
पावसाने हिरवं होऊ पाहणार्‍या रानाला चिरत महादूची ह्रदयद्रावक साद कितीतरी वेळ प्रतिसाद होऊन सगळ्या रानात घुमत होती ; काळजाला चिरावी तशी. एक वर्षापूर्वी चावलेला साप पण त्याने आता सदूचा जीव घेतला होता. विनाकारण मानगुटावर बसलेलं भीतीचं भूत इतकं सगळं समजावूनही अखेर जीवघेणं ठरलं होतं.
*** 
“अशी दोघा भावांची हकीकत, म्हणून महादूनं आठवण म्हणून हा शेताच्या कडंला चिरा बांधलेला हाय !” 
ते गृहस्थ स्वतःची हकीकत सांगावी इतके त्यात गढून गेले होते. त्यांच्या प्रत्येक शब्दांगणित दोघा भावांचा पट हुबेहूब डोळ्यासमोर उभा राहिला होता. त्यांनी इतके आत्मितेने सदाशिव महाराजांच्या शेताच्या कडेला मूर्ती स्थापनेमागची कथा ऐकवली होती की, मनात विचार आला, हे नक्कीच सदूचे लहाने बंधू महादू असले पाहिजे. चौथरा आणि चौथऱ्यावरील मूर्तीची स्थापना अलीच्या काळातील होते, त्यावरून अंदाज करत मी सहज प्रश्न केला, “तुम्ही सदाशिव महाराजांचे लहान बंधू महादू का ?”
त्या गृहस्थांनी माझ्या प्रश्नाचे उत्तर टाळले होते, बहुतेक त्यांना माझा प्रश्न बालसुलभ व निर्थक वाटला असावा. राग आल्याने बोलायचे असूनही न बोलत ते गुळणा धरावे तसे गप्प झाले. राग आला की काय म्हणून मी माफी मागणार तेवढ्यात ते उद्गारले, “नाही, मी सदू !”
उत्तर ऐकताच भर उन्हाळ्यात माझ्या अंगावर भीतीचा काटा फुलला होता. ते अबोल गृहस्थ आणि चौथऱ्यावरील मूर्ती प्रथमच मला मिळतीजुळती भासली होती. आडरानात आपण एकटे, आपली गाठ भूताखेताशी पडली तर नाही ना ! मनात नकोनको ते विचार येताच माझ्या उभ्या अंगाला कापरे सुटले होते. तसा माझा भूताखेतावर विश्वास नाही, पण रिकामं मन भूताचं घर असतं, भीतीने मेल्याहून मेल्यासारखे झाल्याने मला ओरडताही येईना आणि पळताही येईना, माझी भावस्था ओळखून ते गृहस्थ माझ्याकडे वळून न पाहत निमुटपणे खाट्या वावराच्या बांधाबांधाने मागे हात टांगत निघून गेले. मी त्या गृहस्थांची पाठ फिरताच बाईकला किक मारत तेथून पळ काढला. बारागाव पिंपरी येईपर्यंत मी साधं मागे वळूनसुद्धा पाहिले नाही. 
त्या गृहस्थांचे नावही योगायोगाने सदाशिव असेल कदाचित किंवा मला एकटे पाहून त्यांनी घाबरवण्याचा प्रयत्न करत माझी फिरकीही घेतली असेल ; देवच जाणे. मी मात्र आजतागायत त्या मार्गाने परत कधीच गेलो नाही. जी चूक सदाशिवबाबत महादूकडून केली ; ती मी माझ्याबाबत करणे शक्य नव्हते. सौभाग्य मनातील ती धास्ती माझी जीवघेणी ठरली नाही.         
          ******** 
 
© कथा लेखक - संजय द गोराडे (नाशिक)
मो. नं - ९८५०६९१२१६
ईमेल - goradesd@gmail.com

   

 

माती मागतेय पेनकिलर (कवितासंग्रह)

' माती मागतेय पेनकिलर ': समकालीन शेतीसंस्कृतीच्या विदारक वास्तवाचा आरसा ​ कवी: सागर जाधव जोपुळकर पाठराखण : पी. विठ...