चांदणभूल (ललित कथासंग्रह)
लेखक - विजयकुमार मिठे
आकाशातील चंद्र चांदण्या यांच्या प्रेमात पडलेले विजयकुमार मिठे यांचा नुकताच प्रकाशित झालेला ललित कथासंग्रह ‘चांदणभूल’ वाचकास वाचण्याचा सहज मोह होईल असाच निर्माण झाला आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये. कलेकलेने वाढत जाणारा कुणब्याचा कंदील असलेला चंद्र कागदावर उतरवताना ते अजिबात थकत नाही. आपल्या लेखनीद्वारे प्रसवणारा शब्द नि शब्द चंद्र प्रकाशासारखा शीतल अनुभव देऊन जातो, प्रेयसी-प्रियकाराचा प्रसंग लिहितानाच चंद्र-चांदण्यांची आठवण होणार्या कवी-लेखकांना या ललित कथासंग्रहातून खूप काही शिकण्यासारखं आहे. प्रेयसीविनाही आकाशातील चंद्र-चांदण्यांची पडलेली भूल त्यांनी चांदणभूल या कथेत खूपच अलंकारिक व वेगवेगळ्या उपमा देत मांडली आहे.
‘पुनवेचा चंद्र आईनं तव्यावर केलेल्या गोल गरगरीत भाकरीसारखा दिसायचा. त्याच्या शीतल प्रकाशापेक्षा त्याच्यावर काळे डाग कशाचे आहे, याचंच अधिक कुतूहल वाटायचे. आई आपल्या गोंडस बाळाला दृष्टीबाधा होऊ नये म्हणून काळी तिट लावते तशी चंद्राला कुणाची नजर लागायला नको म्हणून त्याच्या आईने ही काळ्या डागाची तिट तर लावली नसेल ना, बालपणी पाहिलेले चंद्रावरचे हे काळे डाग आजतागायत तसेच आहे हे पाहून वाटतं, एखाद्या पोरानं एकच सदरा रोज रोज वापरावा तसा चांदोमामा एकच अंगरखा घालून वर्षानुवर्ष फिरतो आहे. चंद्राच्या बाजूला काही अंतर राखून चमकणार्या ठळक चांदणीकडे पाहिलं की वाटायचं ही चांदोमामाची बायको असावी. सतत त्याच्या सोबतच असते. शिवाय एखाद्या घरंदाज बाईनं आपल्या नवर्यासमोर डोईवरचा पदर सावरून उभं रहावं, तशी ती आदबशीर चंद्रासमोर उभी असते.’ (पृष्ठ - १४)
अशी चंद्र-चांदण्यांची डोळ्यांवर नेहमीच भुरळ असलेला लेखक कथेच्या शेवटी खंतही व्यक्त करताना दिसतात, बालपणी अंगणात बसून आकाश न्याहाळताना त्यांना ते चांदण्यांनी खच्चून भरलेलं दिसायचं, पण वर्षागणिक चांदण्या पण घटल्या आहेत असं लिहित आजच्या पिढीची दृष्टीहीनता नकळत दर्शविताना वाटतात. आजच्या झपाट्याने होत औद्योगिकीकरणाच्या धावपळीत कुणालाही नैसर्गिक सौंदर्य पहायला वेळ नाही. फक्त आपलं कुटुंब आणि त्याचं सुख एवढेच संक्षिप्त विश्व झाले आहे. त्या पलिकडे कुणालाही काहीही दिसत नाही.
विकसित आणि अविकसित असा दोन्ही काळाचा अनुभव असलेले लेखक आपल्या विविध कथांतून स्वतःच्या ग्रामीण शैलीत खूपच मार्मिक तुलना करताना दिसतात, या ललितकथासंग्रहात एकूण तेरा कथा असून प्रत्येक कथा काहीना काही संदेश देताना दिसते. त्यांच्या साहित्यनिर्मितीचे केंद्रस्थान हे गाव, गावाचा कारभार, गावातील माणसं, त्यांची सुखदुःख, शेती व भोवतालचा निसर्ग हे आहे. छोटेसे वाटणारे विषय पण खूपच छान पध्दतीने मांडणी करत वाचकांच्या समोर ठेवले आहे.
‘सोनपिवळ्या फुलांची बाभूळ’ या कथेत आज्यापंज्या जमान्यापासून वावराच्या मधोमध बिनकामाची जागा आडवून बसलेली बाभूळ पुर्वाजांनी सांभाळली म्हणून लेखक पण तिला जपतात. माणसांइतकं झाडांना जपणारा लेखक बाभळीविषयी कितीतरी जिव्हाळ्याच्या आठवणी सांगतात, पण तंत्रज्ञानाच्या युगात आजच्या पिढीला तिची अडचण होते, आणि ऐहिक सुखासाठी तिला निरुपोगी समजून तोडलं जातं, येथे लेखक कष्टी होत नैसर्गिक साधनसंपत्तीपैकी असलेली बाभूळही नामशेष होईल अशीही भीती व्यक्त करतात.
‘गोष्टी रंगल्या ओठी’ ही लेखकाच्या बालवयातील गंमतीदार गोष्ट शब्दरूप व्यक्त होताना स्वतःसह सलमा आणि गुलतुरा या त्रिकोणी नात्याला खूपच सुंदर आयाम देतात. बालमैत्रिण सलमा हिच्याशी माहीत नसलेलं पण जडलेलं नातं निखालस व उत्कंठावर्धक मांडतात. दोघांच्या नात्यात धर्म-जात, लिंग, वय याचा कसलाही अडसर होत नाही, शेतात माँसोबत आलेली सलमा गुलतुर्याची पाने चावून ओठ लाल करण्याचा अनोखा खेळ ती आणि लेखक खेळतात. त्यानंतर त्यांना जो काही बेदम मार पडतो त्याने त्या अल्लड जिवांची कायमची ताटातूट होते. असं स्त्री-पुरुष नातेसंबंधाविषयी आकर्षण वाटावं अशा वयात ते कुठलाही आक्रस्ताळेपणा न करता आजच्या पिढीला सहज समर्पण शिकवून जातात.
अशाच पुढील दहा कथा लेखकाची प्रगल्भता सिद्ध करत वेगवेगळा संदेश देतात. या सर्व ललित कथा त्यांच्या बालवयातील असून वयाच्या साठाव्या वर्षीही त्यांनी छान चितारल्या आहेत. खेड्यांचं झपाट्याने शहरीकरण होत असलेल्या काळात ज्याला खरंच खेडं अनुभवायचं असेल त्याने नक्की ‘चांदणभूल’ हा ललित कथासंग्रह वाचला पाहिजे. या पुस्तकाला विवेक उगलमुगले या चिंतनशील प्रस्तावना लाभल्याने पुस्तकाची उंची खूप वाढली आहे, मुखपृष्ठ अरविंद शेलार तर अंतर्गत सजावट दीपक दंडवते यांनी नाविन्यपूर्ण रेखाटली आहे. पन्नास वर्षापूर्वीचं लेखक विजयकुमार मिठे यांचं आयुष्य म्हणजे आजच्या पिढीसाठी पुस्तकरुपाने लाभलेला अस्सल खेड्यातला गावरान मेवाच आहे. एक वाचक या नात्याने पुस्तक शब्द रुपाने भूल पाडणार्या अशा जेष्ठ साहित्यिकास खूप खूप शुभेच्छा.
पुस्तक परिचय :-
संजय डी. गोराडे (कथा-कादंबरी लेखक)
मो. नं - ९८५०६९१२१६, नाशिक.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें