रविवार, 14 मार्च 2021

दरवळ (वैचारिक)


दरवळ ; वाचकांच्या भावनांचे प्रतिनिधित्व करणारे पुस्तक

लॉकडाऊन खुले होताच प्रथम प्रकाशनाचा मान पटकावणारे घनश्याम पाटील लिखित ‘दरवळ’ हे कदाचित पहिलेच पुस्तक असावे. दरवळ हे वैचारिक पुस्तक आहे. भोवतालच्या अपप्रवृत्तींनी नकळत केलेले वार, त्यातून उमटलेले पण न दिसणारे कृती किंवा विचारांचे वळ दाखवून देणारे पुस्तक म्हणजे दरवळ होय. या पुस्तकात एकूण पंचवीस लेख आहेत. जे समाजातील विविध अपप्रवृत्तींविरुद्ध आवाज उठवितात. मुळाशी जात पुराव्यासह वास्तवाचं दर्शन करून देतात. वाचकाला अंतर्बाह्य हलवत आत्मपरीक्षण करायला भाग पाडतात.  
प्रकाशक आणि संपादक असलेले लेखक घनश्याम पाटील यांचे दरवळ हे चौथे वैचारिक पुस्तक आहे, डॉ. द. ता. भोसले यांची प्रस्तावना असून पाठराखण डॉ. प्र. चिं. शेजवलकर यांची आहे, मुखपृष्ठ सजावट संतोष घोंगडे यांनी केलेली असून अंतर्गत मांडणीसह पुस्तकाची बांधणी अतिशय आकर्षक झाली आहे, हातात पुस्तक घेताच क्षणी वाचकाला वाचण्याचा मोह व्हावा इतके छान बनले आहे.
मराठवाड्यातील चाकूर तालुक्यातील हिंप्पळनेर गावातून आलेले लेखक घनश्याम पाटील गरिबीशी झुंजत परिस्थितीवर मात करत आज महाराष्ट्रातील आघाडीच्या चपराक या प्रकाशन संस्थेचे ते प्रकाशक आहेत, हे यश नक्कीच इतक्या सहजासहजी मिळालेलं नाही. त्यासाठी त्यांना बरेच श्रम करावे लागले आहेत, नव्हे खूप काही गमवावेही लागले आहेत, पण त्याबद्दल ते अजिबात खंत करत नाही. उलट आयुष्यात जे करायचे राहिले आहे ; ते राहिलेलं तसेच राहू द्या म्हणत एका उदाहरणातून ते खूप मार्मिकपणे व्यक्त होत समजावतात, गाडीची समोरची काच मोठी असते आणि मागचा रस्ता दाखवणारा आरसा इवलासा असतो. मागून कोणी ठोकू नये यासाठी भूतकाळावर आरशाद्वारे लक्ष जरूर असावे, पण लांबचा पल्ला गाठण्यासाठी समोरच्या काचेतून दूरवर पहावे ; इतके ते स्वतःच्या गतायुष्यातील कटू प्रसंगांना दूर सारत जगण्याकडे सकारात्मक पाहतात व वाटचाल करतात, ते भोगलेलं दुःख चघळत बसलेले नाही. ‘चिंता करितो विश्वाची’ या समर्थांनी दिलेल्या दृष्टीचा अंगीकार करत ते सामान्यांचा आवाज बनले आहे, आपली लेखणी उपेक्षित व दबलेल्यांच्या बाजूने उभी करत कळतनकळत ते त्यांच्या मनात क्रांतीची विचारज्योत पेटवत आहे. आजवर त्यांनी शब्दांना अस्त्र मानत दिवाळीअंक, वृत्तपत्र व ब्लॉगवर विपुल लेखन केले आहे व अनेकांच्या प्रश्नांना वाचा फोडली आहे. त्यापैकीच गाजलेले पंचवीस लेख लेखक घनश्याम पाटील यांनी दरवळ पुस्तकात दिले आहेत, जे वाचकाला वस्तुस्थितीची जाणीव करून देणारे आहेत.       
‘स्वतःपासूनची सुरुवात महत्त्वाची !’ या लेखात लेखक आजच्या तरुणाईमध्ये मरगळ झटकत जोश निर्माण करताना दिसतात. केवळ उपदेशाचे डोस पाजून समाज बदलत नाही, त्याची सुरुवात ही स्वतःपासून व्हायला हवी. त्यासाठी लेखकाला संस्कारमूल्यही तेवढीच महत्त्वाची वाटतात. ते संस्कारमूल्य जपण्यात आणि परिवर्तन घडवून आणण्यात आजची तरुणाई कुठेतरी कमी पडते आहे, त्याबद्दल लेखक छान मार्गदर्शन करतात. ज्या राज्यात धान्याअभावी दुष्काळ पडतो तिथली जनावरं मरतात, काही वेळा माणसंही मरतात ! मात्र जिथं  संस्कारांचाच दुष्काळ पडतो तिथली मानवताही मरते, त्यामुळे संस्कारांचा दुष्काळ पडू नये असे लेखकाला वाटते.                     
 ‘दुर्बल सबल व्हावेत !’ या लेखात सबल माणसांच्या दुर्बल वृत्तीचा उहापोह केलेला आहे, ‘बळी तो कान पिळी’ या म्हणीप्रमाणे सबल दुर्बलांना अजून दुर्बल करत आहेत. हे चित्र पालटले तरच आपल्या समाजाचा सर्वांगीण विकास होईल असे लेखकाला वाटते, हे त्यांनी काही आदर्श व्यक्तींची उदाहरणे देऊन खूप छान समजावले आहे.
‘अगम्य, अतर्क्य !’ या लेखात स्त्रियांच्या विविध रुपांवर प्रकाश टाकला आहे. स्त्री शिकली, तिने अनेक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली, आज ती पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून बरोबरीने लढते आहे, हे नक्कीच गौरवास्पद आहे, परंतु त्याच वेळी थोडेफार उणेदुणे झाले की स्त्रीया लगेच स्त्री असल्याची कवचकुंडले धारण करतात, हे लौकिक दृष्ट्या अशोभनीय आहे, सोयीनुसार बदलणारी स्त्रियांची विविध रुपं लेखकाला खूपच अगम्य आणि अतर्क्य वाटतात. 
‘धोका प्रतिक्रियावाद्यांचा !’ हा लेख वाचाळवीरांवर घणाघात करतो. लोकशाहीने आपल्याला अभिव्यक्ती स्वांतत्र्याचा अधिकार दिला असला तरी आपण जपून विधानं करायला हवीत, आपल्या विधानाने समाजात दुही माजणार नाहीत याची काळजी घ्यायला हवीत. कोणत्याही घटनेची सत्यता पडताळून मगच आपण आपली प्रतिक्रिया द्यायला हवी असे लेखक सांगतात.  
‘क्षणिक मोहापायी !’ या लेखात प्रगतीच्या नावाखाली पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण करणारी आजची पिढी आपली भारतीय संस्कृती विसरली आहे, चंगळवाद व क्षणिक मोहापायी आपल्या संस्कृतीचा कुठेतरी ऱ्हास होतो आहे, आपल्या हिंदू धर्मशास्त्रात विवाह ही संकल्पना अत्यंत पवित्र मानली आहे, याचे भान आजच्या युवा पिढीला राहिलेले नाही. हरवलेली ती नीतीमूल्य चपखल शब्दात लेखकाने युवा वर्गाला सांगत नेमकी कान उघडणी केली आहे. 
‘ऊर्जादायी भक्तीसोहळा’ हा लेख माणसाने जीवनात येऊन एकदा तरी पंढरीची वारी करावी हे सुचवतो. पैशाच्या मागे धावणाऱ्या माणसाला खरा आनंद पहायचा असेल तर त्याने पंढरपुरी जाऊन आषाढी कार्तिकीचा ऊर्जादायी भक्तीसोहळा पहावा, त्याला नक्की जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटेल. वारीला जायचे म्हणून एक महिनाभर अगोदर तयारी, दिंडी पंढरपुराला जात असते तेव्हा लोकांचे मुक्त अन्नदान, दिंडीची स्वयंशिस्त, गरीबश्रीमंती विसरून हरिनामात एकरूप झालेले वारकरी लेखकाने खूप छान शब्दात चितारले आहेत. 
‘दोन घडीचा डाव’ हा लेख नैराश्याने ग्रासलेले व आत्महत्याचा विचार करणाऱ्या लोकांचे समुपदेशन करतो. संकटांना पाहून हादरून जाणे व आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत जीवन संपविणे नक्कीच निंदनीय आहे, समाजासाठी आदर्श असलेल्या व्यक्तीही असा अघोरी पर्याय निवडतात ; तेव्हा त्यांच्या कमकुवत मानसिकतेचे दर्शन होते. खरेतर जीवन दोन घडीचा खेळ आहे, तो प्रत्येकाने हसत हसत खेळला पाहिजे असे लेखक तळमळीने सांगतात. 
‘साहित्यिक दहशतवाद घातक’ या लेखात दर वर्षी आयोजित होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनांचे आयोजन व अध्यक्षांचे विवादित वक्तव्य याबद्दल लेखकाने रोकठोक भाष्य करत भविष्यातील धोक्यांबद्दल सूचित केले आहे, विवादाशिवाय पार पडलेले साहित्य संमेलन ऐकवातच नाही, विनाकारण निर्माण केला जाणारा हा साहित्यिक दहशतवाद नवोदितांच्या मानसिकतेवर किती विपरीत परिणाम करणारा व साहित्यविश्वासाठी घातक ठरणारा हे सांगितले आहे. 
‘राहिलेलं राहूच द्या !’ हा लेख लेखकाने स्वतःच्या जीवनावर गुंफला आहे, अनेकांना लिहायला प्रेरित करणारे लेखक क्वचितच स्वतःबद्दल लिहितात किंवा बोलताना दिसतात. सहा पानात त्यांनी जेही काही स्वतःबद्दल लिहिले आहे ते नक्कीच ह्रदयाला स्पर्श करणारे आहे, त्यांच्या सन्यास्त जीवनाला वाचक जरूर सलाम करेल. 
असे एकापेक्षा एक सरस व सकस पंचवीस लेख दरवळमध्ये आहे, जे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व साहित्यिक अशा विविध विषयांवर बेतले आहे, प्रत्येक विषय त्यांनी पोटतिडकीने व वाचकाला समजेल अशा सोप्या पद्धतीने मांडला आहे, त्यांचा डोळसपणा त्यांना सामाजिक बांधिलकी जपण्यास अस्वस्थ करत असावा, त्यामुळे प्रत्येक लेखाची निर्मिती खूपच आत्मितेने केली आहे. लेखाचा विषय समजावताना ते केवळ आध्यामिक दाखले देत नाही तर आजच्या समकालीन कवी-लेखक व व्हाटसअप्प-फेसबुकचे उदाहरणे दाखले म्हणून देतात, जे वाचकाला समजायला खूप मदतगार ठरले आहे, 
असे हे उपेक्षित व दबलेल्यांच्या मनावरचे ओझे हलके करणारे पुस्तक म्हणजे दरवळ आहे. जे वाचकांच्या मनातील भावनांचे प्रतिनिधित्व करते. अशी २०२० मधील घनश्याम पाटील लिखित वैचारिक दरवळ प्रत्येकाने वाचावी असा मी जरूर आग्रह करेन...! 

पुस्तक - दरवळ 
लेखक - घनश्याम पाटील 
प्रकाशन - चपराक प्रकाशन 
मूल्य - २०० रुपये.

पुस्तक परिचय - संजय द. गोराडे (नाशिक) 
 मो. - ९८५०६९१२१६              
                     
          

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

माती मागतेय पेनकिलर (कवितासंग्रह)

' माती मागतेय पेनकिलर ': समकालीन शेतीसंस्कृतीच्या विदारक वास्तवाचा आरसा ​ कवी: सागर जाधव जोपुळकर पाठराखण : पी. विठ...