'वैयक्तिक- कौटुंबिक अनुभवांचे सहज सुंदर, वस्तुनिष्ठ व समृद्ध चित्रण'
‘तीर्थरूप’ वनवासी जीवनाची गोष्ट'
कादंबरी हा साधना व तपश्चर्येचा भाग असतो. कादंबरी लिहिण्यासाठी तुलनेने अधिक मेहनत, एकाग्रता आणि कसोटी लागते. कादंबरी लेखनात एकाच वेळी विविध व्यक्तिरेखा विशिष्ट पद्धतीने व वैविध्यपूर्ण प्रकारे हाताळाव्या लागतात. घटना- प्रसंग यांचे योग्य क्रम राखताना काही ठळक गोष्टी, निवडक घटना अधोरेखित कराव्या लागतात. हे करताना आशयानुसार लेखनाची शैलीही सांभाळावी लागते. विशेषतः पहिल्यांदाच कादंबरी लिहिणाऱ्या हातांसाठी कादंबरीच्या या विविध घटकांमध्ये समतोल साधणे अधिक आव्हानात्मक ठरते. ‘निर्णय’ कथासंग्रहाने मराठी साहित्यात स्वतःची विशिष्ट ओळख निर्माण करणारे नाशिक येथील कथाकार संजय गोराडे हे एक जाणकार साहित्यिक- संवेदनशील व्यक्तिमत्त्व आहे. साहित्य व सांस्कृतिक उपक्रमांत विविध भूमिकांतून आणि सातत्याने वावरणारे मितभाषी लेखक म्हणून त्यांची ओळख आहे. ते ‘तीर्थरूप : वनवासी जीवनाची गोष्ट’ या पहिल्या कादंबरीतून मराठी वाचकांसमोर एका नव्या पद्धतीने व्यक्त होऊ पाहत आहेत.
आत्मकथनात्मक स्वरूपाच्या या कादंबरीत त्यांनी आपल्या आयुष्यातील काही प्रसंग नेमकेपणाने रेखाटले आहेत. मानवी आयुष्य कधीही एखाद्या रेषेसारखे साधे किंवा सरळ नसते. त्यात असंख्य खाच- खळगे, चढ- उतार, सुख- दुःखे असतात, किंबहुना या सगळ्यांमुळेच मानवी आयुष्याला एक विशिष्ट अर्थ प्राप्त होतो. माणूस म्हणून ज्या- त्या टप्प्यावर आपली जडणघडण होते. या पार्श्वभूमीवर मानवी जगण्यातील विविध आव्हानांची- त्यातील चढ- उतारांची व मानवी नातेसंबंधांतील आपले- परकेपणाची जाणीव ही कादंबरी आपल्याला नेमकेपणाने करवून देते. कळत्या वयापासून आयुष्याची चौरेचाळीस पाने उलटताना आलेले बरे- वाईट अनुभव लेखक म्हणून संजय गोराडे स्वतःशी प्रामाणिक राहात कौशल्याने कादंबरीत नोंदवतात. त्यामुळे त्यांनी मांडलेले वैयक्तिक अनुभव हे एकीकडे वाचकाला ‘वाचनानंद’ देतात त्यासोबतच ते वैयक्तिक न राहता समूहाचे अनुभव बनत ‘सार्वत्रिक’ ठरतात.
लेखकाचे व त्याच्या भावंडांचे बालसुलभ वर्तन, वडिलांचे गैरजबाबदार वागणे- बारा गावचा मुंजा बनून भटकणे, स्वतःच्या संसाराची वाताहत होणे, लेखकाची आई (ब)वर काम आणि नातेसंबंध जपण्याचा दुहेरी ताण येणे, अतिश्रम- अतिताण यातून निर्माण झालेल्या अल्प- आजारात आईचे निधन होणे, आजीने वार्धक्य बाजूला सारत कंबर कसणे, पोटच्या पोरांप्रमाणे या लेकरांना सांभाळणे, आईविना पोरं म्हणून शेजारीपाजारी व नातेवाईकांकडून लाड होणे, शाळेत शिक्षण घेणे, अभ्यासात आघाडीवर असणे, तीन विषय नापास होऊनही वर्गात पहिला नंबर मिळविणे, कुमारवयात मुलीबद्दल नैसर्गिक आकर्षण उत्पन्न होणे, त्यातून सुटका होणे, मुक्या प्राण्याला जीव लावत एक बेवारस कुत्रे पाळणे, त्याच्यासोबत भावानुबंध निर्माण होणे, जाणीव होत घराची जबाबदारी उचलणे, मोठे भाऊ आप्पांच्या धाक व शिस्तीत वाढणे, आय.टी.आय. करुन नोकरी स्वीकारणे, लग्न आणि त्यानिमित्ताने येणाऱ्या कौटुंबिक जबाबदाऱ्या स्वीकारणे, त्या उत्तम प्रकारे पार पाडणे, वेगवेगळी आजारपण यावर मात करत कुटुंबाचा डोलारा सांभाळणे आणि विशेष म्हणजे हे करताना जन्मदात्या बापाने आपल्यासाठी काहीही केलेले नसताना आपली जबाबदारी/ कर्तव्य म्हणून शेवटपर्यंत त्यांची जबाबदारी पेलणे, या सगळ्यांत आपल्यातील साहित्यप्रेम आणि सामाजिक जाणीव जपत शक्य ते योगदान देणे असा हा जीवनप्रवास सूत्रबद्ध पद्धतीने येथे चित्रित केलेला आहे.
साधारण १७ प्रकरणांमध्ये या कादंबरीची रचना गोराडे यांनी केलेली आहे. पहिल्या प्रकरणात मातृछत्र हरपण्याची आणि लेखक जीवनाची दिशा बदलण्याची संवेदनशील घटना घडते. लेखक अवघा चार वर्षांचा असताना आई (ब)च्या मायेला पारखा होतो. जिवंत असताना नवऱ्याच्या बेजबाबदारपणामुळे कुंकवाला कुणी नावे ठेवू नये म्हणून ती अहोरात्र राबते. कुटुंबाला एकत्र बांधत घराची जबाबदारी वयाच्या चौदाव्या वर्षी (लग्न झाल्यापासून) अंगाखांद्यावर घेते. सासु- सासरे आणि दीर यांच्या सहकार्यामुळे परिस्थितीशी लढत राहते. मात्र ज्याच्या भरवशावर ती उंबरा ओलांडून आली होती तो नवरा स्वतः काडीचेही काम न करता अहोरात्र राबणाऱ्या बायकोला मात्र काडीचीही किंमत देत नसल्याने नाराजही होते. नवऱ्याच्या जुगार- गांजाच्या व्यसनामुळे व उटारेट्या करत फिरण्यामुळे संपूर्ण गोराडे कुटुंबाला त्रास होतो. ‘ब’ला समाजाकडून मानहानी सहन करावी लागते. घरात उपासमारही घडते. नवरा कुणाचेच ऐकत नाही म्हणून ‘ब’ त्याला समजावण्याचा प्रयत्न करते; ; तेव्हा तो तिला बेदम मारतो. सततच्या ताणतणावाने, अतिकष्टाने ‘ब’ खचत जाते. तिचे अचानक निधन होते. चुलता- चुलती, आजी- आजोबा, मामा- मामी, शेजारी- पाजारी आईवेगळ्या या मुलांना जीव लावतात, याचे वर्णन कादंबरीच्या सुरुवातीला येते. मनाच्या कोपऱ्यातील हळवी बाजू व निवडक घटना- प्रसंगांमुळे कादंबरीची सुरुवात वेधक व लक्षणीय ठरते.
कादंबरीची सामर्थ्ये व उणीवांबाबत बोलायचे तर; या कादंबरीचे सगळ्यांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे सहजसुंदर मांडणी आणि वाचकाला खिळवून ठेवणारी आकर्षक भाषाशैली. लेखकाचा जीवनप्रवास मांडताना निवडलेल्या घटना नेमक्या आणि बोलक्या आहेत. . माणसाच्या जडणघडणीत त्याचा भूतकाळ आणि भोवताल या दोन महत्त्वाच्या बाजू असतात. या दोन्ही पातळ्यांमध्ये समतोल साधल्यामुळे कथानक गतिशील राहते. वाचनीय ठरते. मानवी नातेसंबंधाबाबत आस्था, साधे- सरळपणाने जगाकडे पाहणारा लेखक माणसातील आपुलकी आणि दुरावा अशा दोन्ही टोकांचे दर्शन कादंबरीतून नेमकेपणानेे घडवितो. आयुष्य कधीही साधेसरळ नसते त्यातील चढ- उतार यांची नेमकेपणाने मांडणी कादंबरीत जागोजागी येते.
साहित्य माणसाला अनुभूती देते, जाणीव देते, दिशा देते आणि समृद्धही करते या निकषावर ही कादंबरी प्रवाही आणि प्रभावी ठरते. कथानक फुलविण्यासाठी लेखक कुठेही तांत्रिकता- क्लृप्त्या वगैरे करण्याच्या भानगडीत पडत नाही. जे आहे ते साधे सरळ मांडण्याचा प्रयत्न करतो. काही ठिकाणी अजून रंजकता वगैरे आणता आली असती पण ती कटाक्षाने टाळून जसे आहे ते अधिकाधिक वास्तव आणि तेही सरळ पद्धतीने मांडण्याचा लेखकाचा प्रयत्न कौतुकास्पद आहे. निखळता आणि प्रामाणिकता हे या कादंबरीचे वैशिष्ट्य आहे. कलाकृती म्हणून सजवण्यापेक्षा माणूस म्हणून आलेले अनुभव अधिकाधिक वस्तुनिष्ठ पद्धतीने मांडल्याने कादंबरी वाचनीय, रंजक, प्रत्ययकारी आणि हृदयस्पर्शी ठरते. एका सर्वसामान्य कुटुंबाची, वनवासी जीवनाची शब्दांकित कहाणी म्हणून ‘तीर्थरूप’ ही आत्मकथनात्मक कादंबरी महत्त्वपूर्ण आहे.
डॉ. राहुल अशोक पाटील
समीक्षक - संशोधक - स्तंभलेखक
कादंबरी - तीर्थरूप : वनवासी जीवनाची गोष्ट
लेखक - संजय द. गोराडे
प्रस्तावना - डॉ. राहुल अशोक पाटील
प्रकाशन - घनश्याम पाटील, चपराक प्रकाशन, पुणे.
मूल्य - 250/-
https://shop.chaprak.com/product/tirthrup-vanwasi-jivnachi-gosht/
एक क्लिकवर मिळवा, चपराकच्या संकेतस्थळावर 'तीर्थरूप : वनवासी जीवनाची गोष्ट' कादंबरी
मुद्देसूद विश्लेषण सर
जवाब देंहटाएंसुंदर!
जवाब देंहटाएंसुंदर!
जवाब देंहटाएं