सोमवार, 2 मई 2022

हंगामी (कथासंग्रह)


हंगामी : कामगाराच्या संघर्षमय जीवनाच्या कथा

भारत प्रगतीची अनेक शिखरे पार करत आहे, सर्वत्र विकासाचे वारे वाहत आहे, जगातील एक नंबरची महासत्ता बनण्याचे स्वप्न भारत पाहतो आहे, पण हे केवळ एक दिवास्वप्न आहे, खोलात विचार केला तर प्रगतीच्या नावाखाली सर्वत्र खाजगीकरण चालू आहे. कामावर कायम असणारे कामगारही देशोधडीला लावण्याचे षडयंत्र आखले जात आहे, त्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढते आहे, रोजंदारीवर तरुणांकडून कामे करून घेतली जात आहे. आस्थापनेत काम असेल तर कामावर यायचे ; काम नसेल तर घरीच बसायचे असे हंगामी तत्त्वावर कामे करून घेतली जात आहे. हीच आजच्या तरुणांची हंगामी कामगारांची व्यथा लेखक विलास पंचभाई यांनी ‘हंगामी’ कथासंग्रहात मांडली आहे.

लेखक विलास पंचभाई हे खाजगी आस्थापनेत काम करत आहे, त्यांनी हंगामी कामगारांचं जिणं काय असतं हे स्वतः अनुभवलं आहे. बालपणापासून ते एका आस्थापनेत कायम होण्यापर्यंतचा मोठा संघर्ष त्यांना करावा लागला आहे. खेड्यातील अतिशय हलाखीचे जीवन जगणारे लेखक कसेबसे स्वतःचे शिक्षण पूर्ण करतात. एक स्वप्न घेऊन खेड्यातून शहरात येतात. हंगामी कामगार ते कायम कामगारपर्यंतचा संघर्ष करतात. तो एकेक संघर्ष लेखकाने कथा रूपाने या कथासंग्रहात बेतला आहे.

‘सत्पात्री दान’ दान मिळालेल्या गायीची ही कथा आहे. गावाकडच्या आठवणीने लेखक कथासंग्रहाची सुरुवात करतात. ज्योती नावाची दान मिळालेली गाय घराला कशी बरकत आणते व तिच्या जाण्याने बरकत कशी हरवते वाचताना वाचक नक्कीच भावूक होतो.

‘शेजारधर्म’ कथा वाचताना तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना या म्हणीची प्रचिती येते. लेखकाचे वडील अण्णा व शेजारचे अप्पा यांचे वैर टोकाचे आहे, पण घरातील माणसांचा घरोबा तितकाच घट्ट आहे, असा हा शेजारधर्म जपताना लेखकाने टिपलेल्या व्यक्तिरेखा कौतुकास्पद आहे.

‘मायाडी’ कथेत लेखकाच्या आत्या बहिणीचे म्हणजे मायाचे एका आतंरजातीय मुलाशी प्रेम जुळते, परंतु जातीपातीत गुरफटलेल्या समाजाला ते मान्य होणे शक्यच नसते. घडून गेलेल्या चुकीची जाणीव होताच माघारी फिरलेल्या मायाची संघर्षमय हिमंत वाचकास नक्कीच थक्क करणारी आहे.

‘बदली’ कथेत लेखक बहिणीकडे शिकायला असतात. काही कारणावरून बहीण आणि वडिलांत वाद होतात. दोघांचे भांडण आणि तिसऱ्याचे नुकसान, हुशार लेखकाच्या आयुष्याची दिशास कशी चुकून जाते ते या कथेत वाचायला मिळते.

शहरात स्थिरस्थावर झालेल्या लेखकाला गावाबद्दल आजही आस्था आहे, गावाकडच्या शिवलाल शेठची भज्यांची चव आजही त्यांच्या जिभेवर रेंगाळते आहे, ती आठवण वाचताना लेखक अनेर नदीच्या काठी वसलेल्या होळनाथे गावात वाचकालाही सहज ‘शिवलाल शेठची भजी’ चाखायला घेऊन जातात. ही कथा भज्यांइतकीच चविष्ट वाटते.

‘हंगामी’ या शीर्षक कथेत लेखक एका आस्थापनेत हंगामी तत्त्वावर काम करतात. सहा महिने काम करायचे सहा महिने घरी बसायचे. आयुष्याची ही परवड सहन न झाल्याने कंटाळून अजय नावाचा मित्र विष पिऊन आत्महत्या करतो, काही मित्र बेभरवशाची नोकरी सोडून गावी निघून जातात. मात्र लेखकाला आस्थापनेतील कायम कामगारांप्रमाणे आपणही कायम होऊ अशी आशा असते. म्हणून ते तब्बल आठ वर्ष हंगामी कामगाराचं जिणं जगतात. या काळातील त्यांची ससेहोलपट वाचताना नको ते कामगाराचे जिणे असा विचार मनात येतो. ही कथा औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक बेरोजागर तरुणांची प्रतिनिधित्व करणारी आहे.

आस्थापनेत कामाचा नियोजित हंगाम पूर्ण करून घरी बसलेला लेखकाचा मित्र रिकामा वेळ आहे म्हणून एका मुलीच्या प्रेमात पडतो. मात्र ते प्रेम मित्राच्या कसे अंगलट येते हे ‘प्रेम’ कथेत सांगितले आहे.

नाशिकमध्ये आल्यानंतर लेखकाला सर्वात मोठा आधार कुणी दिला असेल काळे गुरुजींनी. ते काळे गुरुजींना गुरुस्थानी मानतात. संकट कितीही मोठे असू द्या ; त्याला कसे सामोरे जायचे याचे धडे त्यांनी काळू गुरुजींकडून गिरवले आहे, मात्र त्यांचा शेवट खूपच विदारक झाल्याने ‘काळे गुरुजी’ कथा वाचताना मन खूपच कष्ट होते.

‘मागचे दार’ कथेतील लालित्य वाचताना लेखक भविष्यात खूप छान ललित कथा लिहितील यात शंका नाही. घराच्या मागच्या दाराविषयी इतके सारे ऋणानुबंध असू शकतात वाचल्यानंतर खरोखर वाचक मंत्रमुग्ध होतो.

शेवटची ‘प्रमोशन’ कथा आहे, आठ वर्षाचा हंगामी कामगाराचा वनवास भोगल्यानंतर आस्थापनाकडून कायम करण्याचे आश्वासन दिले जाते. कायम व्हावे म्हणून लेखक सण सभासभारंभात व आप्तमित्रांना देखील भेटण्याचे टाळतात, कारण दांड्या मारल्या तर हाताशी आलेलं प्रमोशन डिमोशनमध्ये बदलते की काय अशी धास्ती त्यांना असते. हा परीक्षेचा खडतर काळ वाचताना प्रत्येकाला तो आपलासा वाटतो. इतका तो वास्तवदर्शी साकारला आहे.


अशा एकूण ‘हंगामी’ कथासंग्रहात दहा कथा आहेत. बालपणापासून ते आस्थापनात कायम होईपर्यंतच्या संघर्षमय जीवनाच्या कथा लेखकाने या कथासंग्रहात चितारल्या आहे, प्रत्येक कथेतील त्यांचा अनुभव त्यांचा न राहता सार्वत्रिक व तितकाच महत्त्वाचा वाटतो. औद्योगिक क्षेत्रात आख्खी हायत खर्च करून कायम न झालेल्या कामगारांच्या प्रश्नांना या कथासंग्रहातून थोडीबहुत वाचा फोडली आहे असे वाटते. लेखकाचा हा पहिलाच कथासंग्रह असूनही पहिलारू असल्याचे कथा वाचताना अजिबात वाटत नाही. कथांची मांडणी साधीसोपी असल्यामुळे कथा व कथांतील पात्र वाचकाच्या स्मरणात राहतात. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनी वाचावा असा कथासंग्रह आहे, लेखक विलास पंचभाई यांच्या ‘हंगामी’ कथासंग्रहाचे वाचक भरभरून स्वागत करतील अशी आशा करतो व पुढील लेखनास शुभेच्छा देतो.

संजय द. गोराडे (नाशिक)

मो. नं - ९८५०६९१२१६

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

माती मागतेय पेनकिलर (कवितासंग्रह)

' माती मागतेय पेनकिलर ': समकालीन शेतीसंस्कृतीच्या विदारक वास्तवाचा आरसा ​ कवी: सागर जाधव जोपुळकर पाठराखण : पी. विठ...