असंवेदनशीलतेचे दर्शन
कोरोना गेला असे वाटत असताना पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आली आणि सुधारत असलेलं माणसाचं जीवनमान पुन्हा विस्कळीत झाले. आज महाराष्ट्रात हजारोच्या संख्येने दिवसाला कोरोना रुग्ण सापडत आहे. सरकारी व खाजगी सर्व रुग्णालय कोरोनाग्रस्त रुग्णांनी खचाखच भरले आहे. बेड मिळत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी तर रुग्णालयाच्या आवारात रुग्ण उपचार घेत आहे. लॉकडाऊन करूनही रुग्णसंख्या आटोक्यात येत नाही आहेत. मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीत दोनदोन दिवस थांबावे लागत आहे. एकीकडे असे भयावह चित्र असताना दुसरीकडचे चित्र मात्र असंवेदनशीलतेचा कळस करणारे पहायला मिळते आहे. त्यात पहिला नंबर लागतो डॉक्टरांचा, दुसरा नंबर राजकारण्याचा आणि तिसरा नंबर हलगर्जीपणाने वागणाऱ्या लोकांचा.
धन्वंतरीचा वारसा चालणारे डॉक्टर आज कोरोना काळात खरोखर प्रामाणिक सेवा देत आहे ? कधीकाळी देव वाटणारे डॉक्टर आज का कुणास ठाऊक गिधाडाच्या अवलादीची वाटू लागली आहे. गिधाडे तरी मेलेली जनावरे खातात. डॉक्टर रुपी गिधाडे जिवंत माणसाला अर्धमेले करून त्याच्या टाळूवरचे लोणी खात आहे. इतकी कशी संवेदनशीलता मारून टाकली आहे ! मान्य आहे डॉक्टर जीव धोक्यात घालून कोरोनाग्रस्त रुग्णांना सेवा देतात. म्हणून कसायाप्रमाणे रुग्णाचा गळा आर्थिक सुरीने कापणार ! मोठ्या अपेक्षेने रुग्ण हॉस्पिटलची पायरी चढतात. त्यांचा स्कोर आणि ऑक्सिजन सामान्य माणसांप्रमाणे असतो, परंतु ते कोरोनाने बाधित असतात. त्यांना जुजबी गोळ्या औषधे व मानसिक आधार दिला तरी ते बरे होणारे असतात. परंतु चालू आलेली शिकार जिवंत सोडतील ते डॉक्टर कसले. काही डॉक्टर चांगलेही असतील. पण गव्हात खडे नसून खड्यात गहू तसे आहेत.
डॉक्टरांनी आपल्या सेवेचा धंदा केला आहे. आज दवाखान्यात रुग्ण अॅडमिट झाला की कमीतकमी एक लाख रुपये बिल निघते. मग त्या रुग्णाची बिल भरण्याची कुवत आहे की नाही याच्याशी अजिबात घेणेदेणे नसते. एक दिवसाचे रुग्णालयाचे चार्जेस कमीतकमी सात हजार रुपये आहेत. मेडिकलचा खर्च वेगळा. त्यात रेमडीसिवीरचे इंजेक्शन नसतानाही काही रुग्णालयात रुग्ण अॅडमिट करून घेतात आणि रेमडीसिवीरचे इंजेक्शन काळ्या बाजारातून आणायला सांगतात. वर काळ्या बाजारातून इंजेक्शन आणायचे संपर्क क्रमांकही तेच सुचवतात. आधीच परिस्थितीने हवालदिल वर्षापासून तग धरून आहे ; त्यात कोरोना होणं म्हणजे भिकेस लागण्यासारखे आहे. अशा प्रसंगी पैसाच सर्वस्व न मानता डॉक्टरांनी माणूसपणाला काळिमा फासणारी कृत्य कुठेतरी थांबवली पाहिजे, थोडेसे माणुसकी जिवंत ठेवली पाहिजे. कधीकाळी डॉक्टर आणि रुग्ण यांच्यात एक कौटुंबिक विश्वासाचे नाते होते. सर्व सामान्यासाठी देव असलेल्या डॉक्टरांनी या विश्वासाचा घात करू नये इतके सांगणे.
कोरोनासारखी महामारी संबध जगावर ओढवली असताना सर्वात गलिच्छ राजकारण महाराष्ट्रात केलं जात आहे. तीन पक्ष सत्ता टिकवण्यासाठी तर एक पक्ष सत्ता मिळविण्यासाठी भांडत आहे. कुणालाच महाराष्ट्राच्या जनतेशी घेणेदेणे नाही. यात दोघांचे भांडण तिसऱ्याचे नुकसान होते आहे. नहाग निरपराध जनता यांच्या भांडणात भरडली जात आहे. केंद्र सरकार म्हणते आम्ही लसी पाठवल्या आहेत, राज्य सरकार म्हणते आम्हाला लसी मिळाल्या नाहीत. कोण खोटं बोलतं आणि कोण खरं बोलतं तेच कळत नाहीये. आतापर्यंत सचिन वाझे प्रकरणावर राजकारण चालू होते ; आता रेमडीसिवीर इंजेक्शनवर राजकारण चालू केले आहे. सत्ता पक्ष आणि विरोधी पक्ष दोघे एकमेकांना बदनाम करत आम्ही कसे जनतेचे कैवारी आहोत हे दाखवत आहे. खरंतर संपूर्ण देशात महाराष्ट्रात सगळ्यात जास्त कोरोना रुग्ण आहेत. अशा वेळी कोणतेही राजकारण न करता सर्व पक्षांनी एकत्र येऊन व स्वतःचा पक्ष विसरून जनतेचा मदतीसाठी धावून यायला हवे होते. परंतु तसे न होता सर्व पक्ष कुरघोडी करण्यात मग्न आहे.
यात सर्वात अग्रेसर विरोधी पक्ष आहे. विरोधी पक्ष हा महाराष्ट्र सरकारचा विरोधक आहे की महाराष्ट्रातील जनतेचा तेच कळत नाहीये. इतक्या वर्षाच्या राजकारणात कधी नव्हे इतका भयंकर विरोधी पक्षनेता महाराष्ट्रातील जनतेला पहायला मिळाला आहे, सत्ता नाही म्हणून जनतेला वेठी धरण्याचं राजकारण अगदी नीच पातळीचे आहे, एकीकडे महाराष्ट्र सरकारला कुच्छकामी ठरवत आम्ही केंद्राकडून मदत आणू म्हणायचे, दुसरीकडे महाराष्ट्राला कशी कमीतकमी मदत मिळेल म्हणून पडद्यामागे राजकारण करायचे हे न कळण्याइतकी महाराष्ट्रातील जनता नक्कीच दुधखुळी नाही आहेत. कोरोनावर संजीवनी ठरणाऱ्या रेमडीसिवीर इंजेक्शनचा साठा करणाऱ्या राजेश डोकानियाला सोडवण्यासाठी अर्ध्या रात्री धावून जाणारे विरोधी पक्ष नेते जनतेच्या मदतीसाठी धावून आले असते तर महाराष्ट्रातील जनतेला अडचणीच्या काळात धावून येणारे नायक वाटले असते. परंतु पाण्याविना मासा तशी सत्तेविना भाजपची स्थिती झाली आहे. त्यांच्यातील खलनायकाला जनतेचे हाल दिसेनासे झाले आहे. अर्थात विरोधी पक्षनेते केंद्राच्या सांगण्यावरून तसे वागत असावे अशी कुठेतरी शंका येते आहे, नाहीतर महाराष्ट्रीय म्हणून त्यांच्या काळजाला पाझर फुटायला हवा होता. परंतु महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहेत. ती सगळे उघड्या डोळ्यांनी पाहते. जनतेच्या हा तळतळाट सूडबुद्धीने वागण्याऱ्या राजकारण्यांना नक्की भोगावा लागेल. आता या घडीला निष्पक्ष जनतेच्या मदतीसाठी धावून येणारा देव ठरेल, परंतु तेवढी सदसदविवेकबुद्धी असायला हवी.
पुलावरून इतके सगळे पाणी वाहते आहे तरी जनतेचा हलगर्जीपणा मात्र कमी होताना दिसत नाहीये. जनतेची अवस्था गोष्टीतल्या वाघासारखी झाली आहे, एक वाघ माणसांच्या वस्तीत आला, तो वाघ पाहून माणसं सुरुवातीला खूप घाबरायची, परंतु तो वाघ कायमचाच माणसांच्या वस्तीत येऊन राहिल्याने त्यांची भीती कमी झाली. मग ते वाघाला शेजारी घेऊन झोपू लागले. परंतु वाघच तो, एकेकाला शक्तीने नव्हे युक्तीने गोडीत खाऊ लागला. हळूहळू सगळी वस्ती कमी झाली तरी माणसं म्हणत होती, ‘तो वाघ काही नाही करत रे !’ तशी सगळया महाराष्ट्रातील जनतेची गत झाली आहे, कोणीही कोरोनाला गांभीर्याने घ्यायला तयार नाहीत. स्वतःच्या घरात जोपर्यंत कोरोना घुसत नाही व पैसे देऊन आक्कल विकत घेत नाही ; तोपर्यंत एकालाही शहाणपण सुचणार नाही. लॉकडाऊन असूनही लॉकडाऊन नसल्यासारखे लोक वागत आहे. आपलं कोणी गेलं नाही ना ! असा संकोचित विचार करून बेफिकरीने वागत आहे, परंतु असे हलगर्जीपणाने वागणे म्हणजे भिकेचे डोहाळे लागण्यासारखे आहे. विनाकारण स्वतःच्या चुकीने आपण डॉक्टर मोठे करत आहोत व आपली जमापुंजी त्यांच्या घशात घालत आहोत. अशा वेळी राजकारणी सोडा रक्ताचीही माणसं उभी राहत नाही. तेव्हा कोरोना कोणीही हलक्यात घेऊ नये हे कळकळीचे सांगणे आहे, नाहीतर गोष्टीतील वाघासारखा कोरोना आपला केव्हा घास घेईल कळणार नाही. तेव्हा स्वतःसह कुटुंबाला कोरोनापासून वाचवावे व सुरक्षात्मक काळजी घेत लसीकरण करून घ्यावे, सामान्य जणांसाठी हाच काय तो बुडत्या जहाजाला काडीचा आधार आहे, नाहीतर आपल्या चुकीची किमंत आपल्याला मोजावी लागेल....
संजय द. गोराडे (नाशिक)
मो. नं – ९८५०६९१२१६
बढिया लिखाण
जवाब देंहटाएंमार्मिक लेखन सर
जवाब देंहटाएंफार मार्मिक सर
जवाब देंहटाएंजोड्याने मारेल जनता एके दिवशी यांना! सगळीकडे नुसता गैरफायदा उचलण्यासाठी आटापिटा चाललेला दिसतोय.
जवाब देंहटाएंजबर दस्त गोराडे सर
जवाब देंहटाएंसगळे मुद्दे कवर केलेत.
जवाब देंहटाएं