माणसाच्या जीवनात विवाह हा सगळ्यात महत्वाचा टप्पा असतो. तो बहुदा सगळेच जण उत्साहाच्या भरात पार करतात, नंतर नैराश्याच्या खाईत होरपळत बसतात. परंतु विवाहासारखा इतका महत्त्वाचा टप्पा पार करताना व जीवनाचा जोडीदार निवडताना कोणती काळजी घ्यायला हवी. विवाह झाल्यानंतर नवदाम्पत्यांनी एकमेकांना कसं जुळवून घ्यायला हवं आणि आपली संसारबाग फुलवत ती कशी सदाबहार ठेवायला हवी असे अनेक संसारमूल्य सांगणारी कादंबरी म्हणजे प्रा. डॉ. यशवंत पाटील सर लिखित ‘संसारवेल’ कादंबरी होय.
लेखक प्रा. डॉ. यशवंत पाटील सर अतिशय हुशार व्यक्तिमत्व. वडील शेतकरी. घरातील वातावरण शिक्षणास पूरक नाही, तरीही ते इयत्ता अकरावीला केंद्रात पहिले आले होते. खरंतर त्यांचे दोन मोठे भाऊ त्यांच्या शिक्षणात अडथळा बनून उभे होते. ते कुटुंबात सर्वात लहान, त्यांच्यापेक्षा दोन मोठे भाऊ व तीन मोठ्या बहिणी अशी सहा भावंडे. नुकतेच कळायला लागले तेव्हा दैवाने मातृछत्र हिरावून घेतले. वाट्याला वनवासी जीवन असतानाही त्यांनी शिक्षणाची कास सोडली नाही. शिक्षणाबद्दलची आवड व जिद्दीच्या जोरावर ते अकरावीत प्रथम आले.
लेखकाचे यश खुपत असलेल्या भावांना ते शिकू नये असे वाटत होते, त्यात वृद्धत्वाने घेरलेले वडील लहान मुलाचे लग्न आपल्या डोळ्यांदेखत व्हावे म्हणून सारखे मागे टुमण लावत होते व पितृत्वाची भावनिक साद त्यांना विवाह बंधनात अडकविण्यास मजबूर करत होती. कात्रीत सापडलेले लेखक शिक्षण अर्ध्यात सोडून देतात आणि पोष्टाची नोकरी पत्करतात. येथून पुढे संसारवेल कादंबरीला मुख्य सुरुवात होते.
नांदगाव पोष्ट ऑफिसमधून त्यांची बदली नाशिकच्या जनरल पोष्ट ऑफिसमध्ये होते. १० बाय १५ टपरीवजा खोली घेऊन ते राहतात. त्या खोलीपेक्षा त्यांच्या गावाकडचा जनावरांचा गोठा चांगला असतो. भावाची परवड पाहून आईसमान बहिणी त्यांना लग्नासाठी गळ घालतात, केंद्राची पक्की नोकरी पाहून लग्नाच्या बाजारात त्यांचा भाव बधारतो. परंतु आपल्याला स्वतःचे काहीतरी विश्व निर्माण करायचे म्हणून ते स्थळं नाकारत असतात. त्यांची नकारघंटा ऐकून घरच्या वडिलधाऱ्या माणसांना व मोठ्या मेव्हुण्याचा राग येत असे. परंतु ते त्याबाबत बेफिकीर होते.
एकदा ते असेच मोठी बहीण सोनुबाईंना भेटायला गेलेले असताना एका तालेवार स्थळाबद्दल सुचवतात. आधी अनेक स्थळे पाहिली तसे ते हेही स्थळ पहायला जातात. मात्र बहिणीने वर्णन केल्याप्रमाणे कितीतरी पट अधिक गुणसंपन्नता मुलीत आणि मुलीच्या परिवारात त्यांना दिसून येतो. तरी पण होकार-नकार न कळवताच नाशिकला परतात.
त्यांचे मोठे मेव्हणे श्री स्वामी समर्थ भक्त असतात. ते नाशिकला सतत ब्रम्हभूती नारायणदास पिठले महाराजांना दर्शन भेटीला येत असत. त्यांच्या सततच्या आग्रहानंतर एकदा तेही सहजच पिठले महाराजांच्या दर्शनाला जातात. त्यांच्या दर्शनाने कधी नव्हे ती त्यांना मनःशांतीचे समाधान लाभते. त्यानंतर त्यांची पिठले महाराजांच्या ठायी कायमची श्रद्धा जडते. ते स्वामी समर्थाचे भक्त झाले तरी गंडेदोरे, कर्मकांड किंवा अंधश्रध्दा यावर त्यांचा बिलकुल विश्वास नसतो. मेव्हुणेकरवी त्यांच्या लग्नाचा विषय पिठले महाराजांच्या कानावर जातो. मुलगी पसंत असूनही या ना त्या कारणाने विवाह टाळत असलेल्या लेखकास पिठले महाराज लग्न करण्याची आज्ञा करतात. लग्न करण्यापूर्वी पिठले महाराजांनी लेखकाला केलेला लग्नासंबधीचा उपदेश आजच्या भरकटत चाललेल्या पिढीसाठी खूप मोलाचा वाटतो.
लग्न ठरल्यापासून तर लग्न होईपर्यंतचा पट व लग्न झाल्यापासून नाशिकला पत्नीस आणण्याचा पट लेखकाने खूपच मनोरंजक पद्धतीने रेखाटला आहे. तो प्रत्येकाच्या जीवनात थोड्याफार फरकाने तसाच घडलेला असल्यामुळे तो वाचकास आपलासा वाटतो. लेखकाच्या जीवनातील पाच-सहा पात्रे खूप महत्त्वाचे वाटतात. दिनकर घोडपडे ; जे त्यांचे जिवलग मित्र आहे, जीवनाचा प्रत्येक अवघड निर्णय ते त्यांना विचारून घेतात . दुसरे जांभेकरकाका ; जे लग्न झाल्यानंतर यशस्वी संसाराचा म.सा.वि. कसा काढायचा असतो यावर चिंतनशील मार्गदर्शन करतात. तिसरे अप्पासाहेब रामदासी ; वैवाहिक जीवनाबद्दल अनमोल मार्गदर्शन करतात. तारुण्याच्या उत्साहाला मूठमाती देत लेखक विवाहासारखा महत्त्वाचा टप्पा खूप विचारपूर्वक पार करतात.
सासरची कौसल्या माहेरी येऊन झालेली सुमनशी त्यांचा विवाह होतो. १० बाय १५ टपरीवजा खोलीपासून त्यांचा संसार सुरु होतो. दिवसभर पोष्टाची नोकरी करायची, सकाळी आणि संध्याकाळी मुलांचे इंग्रजी विषयाचे क्लास घ्यायचे. ओढाताण होऊ लागल्याने ते एक दिवस पत्नीला विश्वासात घेत नोकरीला राजीनामा देतात व पूर्ण वेळ क्लास सुरु करतात. केंद्राची पक्की नोकरी सोडून क्लास चालू करणे त्या वेळी काही जणांना वेडगळपणाचे वाटते, परंतु या धाडसी निर्णयाला पत्नीची भक्कम साथ मिळते. यशवंत क्लास ; स्वतःच्या नावाने सुरु केलेला छोटासा क्लास एक दिवस त्यांना प्रगतीच्या उंच शिखरावर नेऊन बसवतो. एका पत्र्याच्या खोलीत सुरु झालेला संसार फ्लॅट व फ्लॅटनंतर राजस बंगला असा प्रवास करतो. सोबत क्लाससाठी नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी जागा घेतली जाते, त्यांच्या संसारवेली चार फुले उमलतात ; जे उच्च शिक्षित व उच्च पदस्थ आहे. एका यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो तशी पदोपदी त्यांना अर्धागिनीची साथ मिळते. लेखक ते प्रामाणिकपणे कबूलही करतात.
‘संसारवेल’ कादंबरीत प्रा. डॉ. यशवंत पाटील सर नायकाच्या भूमिकेत असले तरी त्यांना अर्धागिनी ऋण व्यक्त करायचे आहे, पडद्यामागची खरी नायक ते अर्धागिनीला मानतात. कादंबरीच्या मुखपृष्ठातही तसाच काहीसा आशय प्रतीत होतो. एक डेरेदार बहरलेले झाड आहे, बुड हिरव्यागार वेलीने गुंफले आहे, आधारवड असलेले झाड म्हणजे स्वतः लेखक प्रा. डॉ. यशवंत पाटील सर व वेल म्हणजे त्यांच्या अर्धागिनी. जणू अर्धांगीनी रुपी वेलीने त्यांच्या ओबडधोबड आयुष्याला फुलवत आकार दिला आहे.
लग्न झाल्यापासून व वयाच्या उत्तरार्धापर्यंत म्हणजे ५०/५५ वर्षाचा पट कादंबरीत बेतलेला आहे. कादंबरीची भाषा खूप ओघवती आहे, वाचकास खिळवून ठेवणारी आहे, जुन्या-नव्या गोष्टींचा फरक स्पष्ट करत आजच्या पिढीला मार्गदर्शन करणारी आहे. विवाह करू इच्छिणाऱ्या, नुकताच विवाह झालेल्या, विवाह करून आपला संसार सुखी-समाधानी व आनंदी करू इच्छिणाऱ्या अशा सर्वांनी ही कादंबरी वाचायला हवी, नक्कीच त्यांच्यासाठी लाभदायी ठरणारी आहे. अनुभवसंपन्न लेखणीतून जीवनावर आधारित आकाराला आलेली कादंबरी संस्काराचे संसारमूल्य सांगणारी कादंबरी आहे असेच वाचक म्हणून मला वाटते. आदरणीय प्रा. डॉ. यशवंत पाटील सरांना पुढील लेखनास खूप खूप शुभेच्छा.
कादंबरी - संसारवेल
लेखक - प्रा. डॉ. यशवंत पाटील सर
आस्वादक - संजय द. गोराडे (नाशिक)
मो. नं. – ९८५०६९१२१६

छान परीक्षण
जवाब देंहटाएं