बंगल्याच्या आवारात लहानग्या सात वर्षाच्या वैष्णवीने पिंपळाचे छोटेसे रोपटे लावले होते. ते आता तिच्या कंबरेच्या उंचीचे झाले होते. खोड तर तिच्या इवल्याशा मुठ्ठीत बसणार नाही इतके जाड झाले होते. त्याची कोवळी लुसलुशीत हिरवी-गुलाबी पाने हुबेहूब ह्रदयाच्या आकाराची दिसत होती. वारा आला की ; छान एकमेकांवर आदळत टाळी दिल्यागत ‘चटचट’ आवाज करायची. जणू तिला पाहून आनंदीत होत तिच्याशी संवाद साधत आहे. तिलाही वाऱ्याच्या तालावर त्या छोट्या पिंपळाचं डोलणं खूप आवडायचे.
ती शाळेतून नाहीतर खेळून आली की ; पहिले ती पिंपळाच्या झाडाकडे धाव घेई. त्याला पाहिले की तिच्या चेहऱ्यावर एक वेगळेच चैतन्य विलसत असायचे. सकाळी झोपेतून उठली तरी आधी पिंपळाला पाही, तांब्याभरून पाणी त्याच्या बुडाशी घाली, त्यानंतर तिच्या दिवसाची सुरुवात होई. इतकंच नव्हे तर शाळेत जाताना एक वेळ तिच्या मम्माला आणि आजीला ‘बाय-बाय’ करत नसे, परंतु पिंपळाला न विसरता ती ‘बाय-बाय’ करून शाळेत जायची.
तिचे पिंपळप्रेम पाहून एकदा-दोनदा आजी कौसल्याबाई तिला रागावल्याही होत्या. कुठूनही आलं की ; तिचं ते पिंपळदर्शन घेणं, बोलतानाही तिच्या मुखी पिंपळपुराण असणं, त्यांना थोडेसे विचित्र वाटे. परंतु बापाचं छत्र हरवलेली पोर ; त्यांना तिला बोलावेसे वाटत नसे. तिची मम्मा देवयानी सकाळी नऊला घराबाहेर पडते तर सांयकाळी सहालाच घरी परतते. मुलाच्या माघारी तिला नोकरी करणे भाग पडले होते. घरादाराचा सगळा भार बिचाऱ्या सुनेच्या खांद्यावर आल्याचे पाहून त्याही मदत म्हणून दिवसभर वैष्णवीला सांभाळ करत होत्या. तिचा टिफिन भरणे, शाळेत नेऊन सोडणे, शाळेतून घरी घेऊन येणे, तिच्याकडून अभ्यास करून घेणे, वैगेरे.
हट्टी वैष्णवीला पप्पांचं म्हणजे अविनाशचं आकस्मित जाणं काहीसं चटका लावून गेल्यासारखं वाटत होतं. अविनाश असताना तिच्यात जो अल्लडपणा होता ; तो अजिबात राहिला नव्हता. ती मोठ्या मुलांसारखी समजदार वागू लागली होती. ती कौसल्याबाईंना त्रास देत नसे. देवयानी ऑफिसला जातानाही तिच्यामागे लागत नसे. मात्र तिचा हा समजदारपणा पिंपळाच्या झाडाबाबत बिलकुल दिसत नव्हता. तिचं पिंपळवेड पाहून कौसल्याबाई रागावल्या तरी ती एक ऐकत नसे. तिच्या वयाच्या मुली बाहुला-बाहुलीशी भातुकलीचा खेळ खेळत. ती मात्र एकटीच पिंपळासोबत खेळत असे. तिचा खेळही अजब तऱ्हेचा होता. छोट्या पिंपळाच्या बुंद्याशी मातीचे आळे बनवणे, त्यात पाणी ओतणे, खराट्याच्या काड्यांचे कंपाऊंड तयार करणे,
खरंतर पिंपळ कोणी अंगणात लावत नाही, त्यावर मुंजाचा वास असतो म्हणे. शेताच्या बांधाला किंवा पडीक जमिनीत पिंपळ उगवला तर शेतकरी त्याला वाढू देतो अन मोठे होऊ देतो, परंतु अजाण वैष्णवी अनभिज्ञ होती. तिने लावलेल्या पिंपळाला ती खूप जपत होती. तिला पिंपळाला खूप मोठे करायचे होते. त्याच्या सावलीत तिच्या पप्पांचा सगळा बंगला झाकोळला जावा इतके तिला विशालकाय वटवृक्ष बनवायचे होते, म्हणून ती दिवसंरात्र त्याची काळजी घेत होती.
आताही वैष्णवी अभ्यासाला बसली होती तर तिला तिचा लाडका पिंपळ दरवाजातून बुडापासून शेंड्यापर्यंत नखशिखांत संपूर्ण दिसत होता. त्याच्याकडे तिचे लक्ष जाई तेव्हा तो तिला खेळायला येण्यास खुणावतो आहे असेच वाटे जणू. तिला त्याच्यासोबत खेळायला जावेसे वाटे. परंतु आता मम्मा ऑफसहून येण्याची वेळ झाली होती.
पिंपळ नजरेआड होऊ नये म्हणून ती शाळेचा अभ्यास असो किंवा जेवण करायचो असो, दिवाणखान्यात सोप्यावर ठरलेल्या ठिकाणीच बसत असे. त्या ठिकाणी बसायला आणखी दुसरे एक कारण पण होते. त्या सोप्याच्या मागे भिंतीला तिच्या पप्पांचा मोठ्ठा फोटो लावलेला होता. त्या सोप्यावर बसून जेवण केलं किंवा अभ्यास केला की, तिला तिच्या पप्पांच्या मांडीवर बसून जेवण केल्यासारखे वाटायचे किंवा अभ्यास केल्यासारखा वाटायचा. तिच्या पप्पांना जाऊन एक वर्ष झाले तरी ती त्यांना विसरली नव्हती. तिचे आवडते पप्पा ऑफिसहून घरी येताना दररोज तिच्यासाठी कॅटबरी आणायचे, मस्ती करताना घोडा बनून पाठीवर बसवत घरभर फिरवायचे व रुसल्यावर नाना तऱ्हेने मनवायचे.
भिंतीवरील तिच्या पप्पांचा फोटो तर इतका बोलका होता की, आता ते फोटोतून बाहेर येतील व कडेवर उचलून घेतील असे तिला वाटे. एक वर्षापूर्वी कार अपघातात वारलेले तिचे पप्पा आजही तिला आठवतात. ती शेवटचं हॉस्पिटलमध्ये त्यांना भेटायला गेली होती.
****
आय. सी. यू.चा दरवाजा ढकलून वैष्णवी देवयानीचा हात धरून आत आली. आत पाऊल टाकताच तिला तिचे शांत झोपलेले पप्पा दिसले. त्यांच्या तोंडाला ऑक्सिजन लावलेला होता. अंगाला वायरी जोडलेल्या होत्या, वर उशाशी मल्टीपॅरा मॉनिटर टुकटुक आवाज करत वाकड्यातिकड्या रेषा दाखवत होते. तिला समजत नव्हते ; डॉक्टरांनी इतक्या साऱ्या मशीन्स तिच्या पप्पा का लावल्या आहेत. तिने जिज्ञासापोटी देवयानीला विचारले, “मम्मा, पप्पांच्या तोंडाला ते काय लावलंय ग ?”
“बेटा, ऑक्सिजन आहे, पप्पांना श्वास घ्यायला त्रास होतोय !”
“त्यातून त्यांना ऑक्सिजन मिळतो का ?”
“हो बेटा !”
दोघी मायलेकी बोलत असताना कोमात असलेला अविनाश अचानक घाबरा झाला. आधीच कार अपघातात जायबंदी तो प्राणाशी झुंजत होता, त्यात एकाकी जोरजोरात आचके देऊ लागला. बहुतेक ह्र्दयविकाराचा झटका आला असावा. त्याला कॉटवर हातपाय खोडताना पाहून देवयानी घाबरली. स्थिर वाटणारी त्याची तब्बेत अस्थिर होताच तिने डॉक्टरांना आवाज दिला, “डॉक्टर... डॉक्टर...!”
डॉक्टर येईपर्यंत अविनाश शांत झाला होता. त्याच्या हाताच्या नसेचे ठोके तपासातच डॉक्टर चेहरा उतरवत म्हणाले, “He is dead !”
डॉक्टरांनी मृत घोषित करताच देवयानीने टाहो फोडला. ऐन तारुण्यात ध्यानीमनी नसताना नियतीने तिच्या कपाळाचे कुंकू पुसले होते. आजन्म साथ देण्याचा वायदा केलेला अविनाश संसाराचा डाव अर्ध्यातच सोडून निघून गेला होता. ऊर बडवत तिने सगळे हॉस्पिटल डोक्यावर घेतले. आपल्या आईचा आकांत पाहून लहानगी वैष्णवीही धायमोकलून रडू लागली होती. तिचे आवडते पप्पा जग सोडून निघून गेले होते.
****
अविनाशला जाऊन एक वर्ष झाले तरी वैष्णवी विश्वास ठेवायला तयार नव्हती. तिचे पप्पा देवाघरी गेले नसून फोटोत जाऊन बसले आहे असे ती मानत होती. म्हणून ती त्यांच्या कुशीत बसल्यासारखी फोटोच्या नजीक सोप्यावर बसून अभ्यास करत असे, जेवत असे व झोपतही असे. आताही ती सोप्यावर अभ्यास करत बसली होती.
कोणीतरी आत आल्याची चाहूल कानी पडताच तिने मान उंचावून समोर पाहिलं. तिची मम्मा दरवाजातून आत आली होती. भिंतीवरील घड्याळाकडे तिचे लक्ष गेले. बरोबर सहा वाजले होते. घड्याळाच्या काट्यावर घरी परतलेली मम्मा हल्ली का कुणास ठाऊक तिला यांत्रिक मानवासारखी भासत होती. कमी बोलत व सतत कोणते नि कोणते काम करताना दिसे. पप्पा होते तेव्हा एखाद्या सिनेमातील नायिकेला लाजवील असा तिचा थाटमाट होता. प्रत्येक महिन्याला पप्पा तिच्यासाठी एक नवी साडी आणत. तिच्या गौर वर्णाला कोणतीही साडी आणली तरी शोभून दिसते. तिचा मोहक रेखीव बांधा, गौर वर्ण, चाफेकळी नाक, मोरपिसावरील काळ्या ठीबक्यांसारखे डोळे, लाल गुलकंदासारखे ओठ, मोत्यांसारखे चमचमणाऱ्या दंतपंक्ती पाहून पप्पांचे तर भान हरखून जात.
परंतु पप्पांच्या जाण्याने तिचे सौंदर्य नजर लागावी तसे कोमेजून गेले होते. त्यांच्यामाघारी सगळ्या जबाबदाऱ्या तिच्यावर पडल्या होत्या. मम्माची ओढाताण तिला पाहवत नव्हती. पप्पांच्या पश्चात तिची झालेली परवड पाहून तिला मदत करावीशी वाटे. परंतु आपण लहान असल्याची तिला पदोपदी जाणीव होई व खंतही वाटे.
तिने स्मित चेहऱ्याने तिच्याकडे येणाऱ्या देवयानीकडे पाहिले. कितीही थकलेली असलेली तरी स्मितहास्य करणारी मम्मा आज तिला जरा वेगळीच भासली होती.
“हे काय आहे वैष्णवी ?”
देवयानीने वैष्णवीच्या स्कूलचे रिपोर्टकार्ड समोर धरत जळजळीत नजरेने तिच्याकडे पाहत विचारले. तिच्या शब्दांची धार व डोळ्यांतील अंगार वैष्णवीला सहन होत नव्हता. घाबरत तिने मम्माच्या हातातील रिपोर्ट कार्डकडे पाहत तिची नजर चुकवली.
“सगळ्या विषयांत तुला सी ग्रेड ?”
देवयानीचा दुर्गावतार पाहून तिच्या अंगाला कंप सुटला होता. टीचरांनी तिच्याकडे अभ्यासाची तक्रार केलेली दिसत होती. काहीही न बोलत तिने मान खाली घातली.
“अभ्यास करत नाही, तुझ्या टीचरांनी कंप्लेट केलीये !”
शिक्षकांचा फोन येताच देवयानी ऑफिसमधून दोन तासाची सुट्टी घेत परस्पर वैष्णवीचा शाळेत जाऊन आली होती. शिक्षकांनी बोलावून तिच्या अधोगतीचा पाढाच तिला वाचून दाखवला होता. त्यामुळे तिचा राग अनावर झाला होता. वैष्णवी काहीही उत्तर देत नाही पाहून तिने पुन्हा विचारले, “बोल, अशी गप्प का ?”
देवयानीचा चढलेला आवाज ऐकून किचनमधून कौसल्याबाई दिवाणखान्यात आल्या. तिला वैष्णवीला अभ्यासावरून रागावताना पाहून त्याही तक्रार करत म्हणाल्या, “मी तिला सारखं सांगत असते, अभ्यास कर... पण ऐकेल तर ना... उठसूट त्या पिंपळासोबत काय खेळत असते तिलाच ठाऊक ?”
“उपटूनच फेकते पिंपळाचे झाड, म्हणजे अभ्यास तरी करशील ?”
देवयानी लगेच तावातावाने दरवाजाकडे वळाली. आजवर तिने मुलीचं पिंपळखूळ दुर्लक्ष केलं होतं. परंतु त्याचा अभ्यासावर परिणाम होणार असेल तर ते उपटून फेकलेले बरे ! मागचा-पुढचा विचार न करत ती संतापात पिंपळाचे झाड उपटायला ताडताड बाहेर चालली.
इतक्या मेहनतीने वाढवलेले पिंपळाचे झाड उपटले जाणार पाहून वैष्णवी घाबरली. मांडीवरचा अभ्यास तसाच बाजूला फेकत ती तिला आडवी झाली. हात जोडत रडवेल्या स्वरात गयावया करत म्हणाली, “नको मम्मा, प्लिज...!”
“का ग... एवढं काय आहे त्या झाडात ?”
रागातही अचंबित होत देवयानीने प्रश्न केला. एका साध्याशा झाडासाठी वैष्णवी एवढी का काकुळतीला आली आहे ? ती विचारात पडली होती. पितृछत्र हरवलेली आपली पोर मुंजाच्या फेऱ्यात सापडली की काय ? मनात भूताबाधेचा विचार डोकावताच ती मनोमन काळजीने धास्तावली.
मम्माला सांगू की नको या द्विधेत असलेली वैष्णवी हिमंत करत उद्गारली, “श्वास... तुझा, माझा अन आजीचा !”
तिचं उत्तर ऐकून देवयानी व कौसल्याबाई दोघीही अवाक होत उद्घारल्या, “श्वास.... म्हणजे ?”
“टीचरांनी सांगितलंय, अंगणात झाडे लावा, ती आपल्याला ऑक्सिजन देतात !”
“ते ठीकय बेटा, झाडे आपला श्वास आहे पण ?”
‘पण अभ्यासाकडे दुर्लक्ष करणे चूक आहे’ असे देवयानी पुढे बोलणार होती. परंतु तिचं वाक्य अर्ध्यात तोडत वैष्णवी घायाळ स्वरात उद्गारली, “पप्पांसारखं तुला पण काही झालं तर... तेव्हा तुला ऑक्सिजन नको कमी पडायला मम्मा !”
“ओ... बेटा...!”
अंगणात पिंपळाचे झाड लावण्यामागचे कारण कळताच देवयानीचे डोळे अश्रूंनी भरून आले. क्षणात तिला अविनाशचा अंतकाळ आठवला. शेवटचा तो प्रसंग वैष्णवीच्या बालमनावर खूप खोल आघात करून गेला होता. अविनाशप्रमाणे नोकरीनिमित्त बाहेर राहणारे आपण ; आपल्यासोबतही त्याच्याप्रमाणे काहीतरी अघटित घडेल अशी भीती तिच्या बालमनाला सतावत असल्याचे तिला जाणवले. ग्रासलेल्या तिच्या कोमल मनाची चिंता ध्यानात येताच तिने तिला ह्रदयाशी कवटाळले. भावना अनावर झाल्याने तिला गहिरून आले होते. अविनाशच्या विरहात दोघी मायलेकी मूक रुदन करत एकमेकींचे खांदे अश्रूंनी भिजवू लागल्या होत्या.
“मम्मा, मला तुला गमवायचं नाहीये ग ?”
देवयानीच्या कुशीत सामावलेली वैष्णवी कोंडलेल्या भावनांना वाट करून द्यावी तशी गदगदलेल्या स्वरात पुन्हा-पुन्हा बोलत होती.
“नाही बेटा, असं काही नाही होणार, देव तुझ्याशी इतका निष्ठूर वागणार नाही !”
वैष्णवीच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू रुमालाने टिपत देवयानीने तिचे सात्वन केले होते. कोवळ्या मनात वसलेली अनामिक भीती तिच्या काळजाला आरपार भिडली होती. कल्पनेच्या जगात वावरणारी लहान मुलं किती संवेदनशील विचार करतात पाहून तिच्या मनातील राग आता वात्सल्यामय झाला होता.
कौसल्याबाईंनाही दिवसंरात्र पिंपळासोबत खेळणारी नात स्वतःपेक्षा कितीतरी पट अधिक समजदार वाटली होती. कौतुकाने त्यांचा ऊर भरून आला होता.
वैष्णवीच्या कोमला भावना आदर करत दोघीही स्वतःहून पिंपळाच्या मुळाशी एकेक तांब्या पाणी ओतून आल्या. त्या दोघांनी न सांगता केलेली सकारात्मक कृती पाहून वैष्णवीला खूप आनंद झाला होता. इतकंच नव्हे तर पिंपळाशेजारी आणखी चार झाडे लावण्याचे आश्वासनसुद्धा देवयानीने दिले.
कारण वैष्णवी आज त्या दोघींचा श्वास होती तर लावलेली झाडे वैष्णवीसारख्या निष्पाप मुलांचा उद्याचा श्वास होते हे त्यांना समजले होते.
*************
झाडे लावा झाडे जगवा
*************

ह्रदयस्पर्शी
जवाब देंहटाएंअतिशय हृदयस्पर्शी 🙏
जवाब देंहटाएंअंतःकरणाचा ठाव घेणारी कथा..
जवाब देंहटाएंसुंदर!👌💐
जवाब देंहटाएंखूप ह्रुदयस्पर्शी कथा आहे.तान कथाबीज
जवाब देंहटाएंखूप छान कथा 👌💐
जवाब देंहटाएंसुंदर 👌👌
जवाब देंहटाएंखूपच हृदयस्पर्शी कथा..आणि झाडे जगवा श्वास वाचवा संदेशही अप्रतिम...ग्रेट लेखनी
जवाब देंहटाएं