तीर्थरुप : एक प्रांजळ आत्मकथन!
जन्मदाता...! वडील, बाप, तात, पिता... तीर्थरुप अशा विशेषणांनी सजलेले एक रुप! प्रत्येकाच्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व असणारे व्यक्तिमत्त्व! आपल्या अपत्याच्या उन्नतीसाठी, प्रगतीसाठी स्वतःचे सर्वस्व पणाला लावणारा तो बाप! तरुण वयात पत्नीच्या निधनानंतरही तिने प्रसवलेल्या अपत्यांना सावत्र आईचा जाच सहन करायला लागू नये म्हणून आजीवन एकटा राहून पत्नीने अर्धवट सोडलेला संसार फुलविणारा, मुलांची आई आणि बाबा अशी दुहेरी भूमिका कर्तव्य निष्ठेने पार पडणारा माणूस आपण अनेकदा पाहिला आहे, अनेकांनी अनुभवला आहे परंतु या सर्व भूमिकांना छेद देणाराही एक बापच असू शकतो, नव्हे तो नाशिक येथील लेखक संजय गोराडे यांनी प्रत्यक्ष सहन केलाय हे आपल्याला गोराडे यांच्या पहिल्याच आत्मनिवेदनपर कादंबरीतून वाचायला आणि अनुभवयाला मिळते. समाजात शानशोक करणारी, पत्नीला छळणारी, वडिलोपार्जित संपत्तीची उधळण करणारी माणसे नवीन नाहीत परंतु लेखकाच्या जीवनात आलेले बाप हे पात्र काही वेगळेच आहे.
तीर्थरुप! किती चांगल्या अर्थाने आपण वापरतो. तीर्थ ही संकल्पनाच मोठी आदरयुक्त अशी आहे. धार्मिकदृष्ट्या पवित्र आहे. वेगवेगळ्या धार्मिक स्थळी असणाऱ्या तीर्थामध्ये स्नान केल्याने, तीर्थ प्राशन केल्यामुळे पापांचा नाश होतो, एक वेगळे समाधान मिळते, जीवन सफल होते, जीवनाचा उद्धार होतो असे मानणारा एक फार मोठा वर्ग आपल्या अवतीभवती असतो. अशा पवित्र तीर्थाचे रुप म्हणजे तीर्थरुप! आपले जन्मदाते! आपल्या अपत्याच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र झटणारे, संसाररुपी सागरात आपल्या संततीची नौका यशस्वीपणे पैलतीरी पोहोचविणारा एक आदर्श नावाडी!
परंतु लेखक संजय गोराडे यांना पित्याच्या बाबतीत आलेले अनुभव या सर्वांना छेद देणारे आहेत. ते त्यांनी स्वतः भोगलेले आहेत त्यामुळे ते लिहिताना त्यात अस्सल जिवंतपणा आला आहे. हे रंगविलेले कथानक नाही तर अनुभवलेले, भोगलेले, सहन केलेले असे कथानक आहे. कथानक लिहायचे म्हणून कुठेही कृत्रिमता येऊ दिलेली नाही.
'तीर्थरुप : वनवासी जीवनाची गोष्ट' हे शीर्षक घेऊन येणारी संजय गोराडे यांची ही पहिलीच आत्मनिवेदनपर कादंबरी आहे असे वाटत नाही कारण या कथानकात कुठेही नवखेपणाच्या, पहिलेपणाच्या खुणा जाणवत नाहीत. एखाद्या सिद्धहस्त लेखकाच्या लेखनीतून प्रकटलेली ही गोष्ट असावी असा भास होतो. लेखकाच्या नावे याआधी 'निर्णय' हा वाचनीय नि दर्जेदार कथासंग्रह आहे. आपले दुसरे पुस्तक तेही थेट आत्मकथा म्हणून मांडताना लेखक कुठेही कचरला नाही उलट सर्वसाधारणपणे आत्मकथन करताना त्यात जीवनातील काही गोष्टी समाजापुढे येऊ नये अशा असतात. अनेकांच्या तारुण्यात जडलेले प्रेम आणि नंतर झालेला प्रेमभंग हा नंतर आलेल्या सहचारिणीच्या कानावर जाऊ नये, गेला तरी हातचे राखून जावा अशी साधारणपणे एक भूमिका असते. लेखक गोराडे या भूमिकेलाही छेद देतात.
गुरुवर्य प्रा. राम शेवाळकर हे त्यांनी लिहिलेल्या 'पाणीयावरी मकरी' या आत्मचरित्रात काय लिहितात हे उद्धृत करण्याचा मोह होतो....
'विवेचनाच्या ओघात काही आत्मपर उल्लेख स्वाभाविकपणे आले असले, तरी विनोबांना आत्मलेखन मानवत नाही. त्यांच्या मते तसा प्रयत्न केला तर ती आत्मकथेऐवजी अनात्मकथा होईल. विनोबा आत्मा या शब्दाचा विचार आत्मवस्तू या अर्थाने करीत. आपण त्या शब्दाच्या गूढ व व्यापक आशयाला 'स्व'पुरते मर्यादित करून ठेवले आहे. 'स्व'ची कथा लिहिता येईल; पण ते आत्म्याचे चरित्र होणार नाही. आत्म्याचा शोध घेणे जितके अवघड आहे तितके 'स्व'चा शोध घेणे नाही. 'स्व'चा शोधसुद्धा आपण प्रामाणिकपणे व पूर्णपणे घेत नाही. पूर्णपणे घेतला तरी तो तसाच्या तसा निवेदन करण्याची धिटाई सर्वांमध्ये नसते. त्यांचा भर जे आहे ते झाकण्यावर अधिक असतो...'
प्रा. शेवाळकर यांच्या वरील निवेदनातील धिटाई लेखक संजय गोराडे यांनी दाखवली आहे म्हणून ते अभिनंदन आणि कौतुकास पात्र आहेत. एकतर प्रत्यक्ष जन्मदात्याचे वर्णन आणि स्वतःचे प्रेम त्यांनी जाहीरपणे मांडले आहे. सुरवातीलाच लेखक एका कविसंमेलनातील एका कवितेचा संदर्भ देऊन लिहितात, 'कवी राजेंद्र उगले यांनी कदाचित वेगळ्या अर्थाने कविता केली असेल पण मी मात्र कवितेचा शब्दाशी अर्थ घेत तीर्थरुपांच्या आठवणीने व्यथित झालो होतो. त्यांच्यामुळे क्षणात आमच्या वाट्याला आलेल्या वनवासी जीवनाची एकेक गोष्ट आठवू लागली होती...'
प्रत्यक्ष 'पित्यामुळे वनवास' या शब्दांमुळे हे पुस्तक हातात घेतल्यानंतर शीर्षक वाचून वाचकांची जी एक मनोभूमिका तयार होते तिला धक्का बसतो कारण 'तीर्थरुप: वनवासी जीवनाची गोष्ट!' या शीर्षकामुळे वाचकांना असे साहजिकच वाटू लागते की, नायकाच्या वडिलांनी त्यांच्या संसारासाठी, अपत्यांसाठी जे सोसलं, जे भोगलं, दुसऱ्या शब्दात जो वनवास भोगला त्या कष्टांचे वर्णन, पित्याचा चांगुलपणा याचे दर्शन या कथानकात असेल परंतु लेखकाच्या वरील वाक्याने वाचकांचा दृष्टिकोन बदलतो. एवढे सारे असूनही लेखक ही आत्मकथा आपल्या दादांच्या अर्थात तीर्थरुपांच्या चरणी अर्पण करतात. कादंबरीचा शेवटही लेखक आईवडिलांचे ऋण व्यक्त करून करताना लिहितात,
'आज मागे वळून पाहतो तेव्हा मनात विचार येतो, आपल्याला इतकं लढायचं बळ कोणी आणि कसं दिलं! आपसूकच वनवासी बनवून गेलेली 'ब' आठवते व दुराव्याने वागणारा 'बा' आठवतो अन् आपोआपच सारं काही विसरून मन त्यांच्या चरणावर लीन होते.'
आईच्या बाबतीत लेखक अतिशय हळवे आहेत. त्यांचा हळवेपणा ठिकठिकाणी जाणवतो. ते म्हणतात, 'चार वर्षांचा असताना हरवलेली 'ब.' आज चव्वेचाळीशीचा झालो तरी डोळ्यांना एक आस होती, 'येईल कुठूनतरी माझी ब... रडताना पाहून पुसेल तिच्या पदराने माझे डोळे... करेल बोबड्या बोलात खोटं खोटं सांत्वन... म्हणेल, आता मी नाही जाणार तुला टाकून कुठे...!'
वडील बिघडले कुठे, कधी आणि कुणामुळे याचा शोध घेताना लेखक म्हणतात...
'दादांचं बोलणं आणि राहणीमान पुढाऱ्याला लाजवील असे होते. १९७४मध्ये ते सरपंच निवडणुकीत सदस्य म्हणून निवडून आले होते तेव्हापासून त्यांना सगळं गाव 'मेंबर' नावाने संबोधत होतं परंतु काही कु लोकांच्या संगतीने त्यांना जुगार आणि गांजाची लत जडली होती...'
समाजात सर्वत्र दिसणारं चित्र लेखकाने उजागर केले आहे. कुणी समोर जात असेल, प्रगती करीत असेल तर त्याचे पाय ओढण्याची वृत्ती सर्वत्र दिसून येते. विविध प्रकार अवलंबून एखाद्या चांगल्या माणसाला संपविण्याचा, त्याला जीवनातून उठविण्याचा कुटील डाव खेळणारी वाकबगार माणसे राजकारणात अधिक असतात. स्वतःच्या साम्राज्याला कुणी भविष्यात आव्हान देणारा जन्मुच द्यायचा नाही असा हिंस्र विचार करणारी माणसं सज्जनाला वेळीच संपवतात कदाचित संजय यांच्या वडिलांबाबतही असेच घडले असणार परंतु त्यामुळे एका खात्यापित्या घराला त्या घटनेने वनवासाची दुःखे भोगायला लावली हे ठसठशीत सत्य नाकारून चालत नाही. त्यानंतर ज्या घटना घडल्या त्या साऱ्यांचा बालवयातील लेखकाच्या मनावर खोल परिणाम झाला आणि कदाचित पित्याविषयीचा तिरस्कार, नकारात्मक भावना जन्माला आली असणार. आपला बाप म्हणजे व्यसनी, मारकुटा असा एक दृढ समज बालमनावर कोरल्या गेला. हे वयच असे असते की, या वयात जे समोर दिसते, जे अनुभव येतात ते आजन्म संगतीला राहतात. 'आळसभिकारी' हा शब्द लेखकाची आई नवऱ्यासाठी वापरते तेव्हा सारे काही यात सामावले आहे. तिला कोणत्या संकटांचा, छळाचा सामना करावा लागला हेही समजू शकते.
आईचा मृत्यू! कोणत्याही वयातील लेकरासाठी अत्यंत क्लेशदायक, दुःखदायक प्रसंग! लेखक चार-पाच वर्षांचे असताना त्यांना पोरके करून आई निघून गेली... कायमची! आईच्या आयुष्याची अखेर लेखकाने जणू स्वतःच्या पेनमध्ये शाईऐवजी अश्रू टाकून लिहिली आहे की काय असे वाटते कारण आईच्या मृत्यूचा तो प्रसंग वाचताना वाचकांच्या भावनाच ओल्या होत नाहीत तर नकळत अश्रूही प्रसवतात...
सर्वत्र दुःखाचे डोंगर सर करताना, लेखक आठव्या इयत्तेत शिकत असताना त्यांच्या साहित्यिक जीवनाचा श्रीगणेशा झाला. संजय गोराडे यांनी 'शेंड्या आणि गोंड्या' ही एकांकिका लिहिली. ह्या विनोदी एकांकिकेचे शिक्षकांनी तोंडभरून कौतुक केल्याची नोंद लेखक अभिमानाने करतात.
प्रकाशक घनश्याम पाटील यांनी चपराक प्रकाशनाच्यावतीने प्रकाशित केलेल्या या आकर्षक
पुस्तकाला सिद्धहस्त चित्रकार संतोष घोंगडे यांचे मुखपृष्ठ लाभले आहे. तसेच घनश्याम यांनी या पुस्तकाची पाठराखणही मोजक्या परंतु आशयघन शब्दात केली आहे. लेखक मनोगतात लिहितात त्याप्रमाणे ही कादंबरी लिहिण्यासाठी लेखकाला प्रेरित करणारे डॉ. राहुल अशोक पाटील यांची सविस्तर आणि अभ्यासपूर्ण प्रस्तावना लाभली आहे. या साऱ्या बाबी या कादंबरीसाठी महत्त्वपूर्ण ठरतात. कागद, छपाई आणि मांडणी हे चपराकचे वैशिष्ट्य यानिमित्ताने ठळकपणे जाणवते.
जीवनात असाही एखादा प्रसंग येतो की, एखाद्या व्यक्तिबद्दल आपले मत पुन्हा एकदा तपासून पहावे वाटते. त्या व्यक्तिकडे सकारात्मकतेने पहावेसे वाटते. लेखकाचेही असेच होते. आजीवन निष्ठुर वाटणारा बाप क्षणार्धात दुधाच्या सायीसारखा मऊ वाटतो आणि लेखकाला वाटते, 'बच्या पश्चात मला कधीच वनवासी वाटले नव्हते. मी फक्त 'ब'च्या मातृत्वाचा भुकेला होतो पण दादांच्या वैकुण्ठगमनाने मला पूर्ण वनवासी केले आहे...!' या वाक्यात पुस्तकाच्या शीर्षकाचा खराखुरा अर्थ दडला आहे.
एकंदरीत संजय द. गोराडे यांची ही आत्मकथनपर कादंबरी सत्याचे, प्रामाणिकपणाचे, धाडसाचे पदर लेवून येत असल्यामुळे ती वाचनीय झाली आहे. एका बैठकीत वाचून हातावेगळी करावी अशी उत्कंठावर्धक आहे. साधीसरळ अशा शब्दांची गुंफण असल्यामुळे मनात घर करणारी अशीच आहे. संजय गोराडे यांच्या आगामी लेखनास अनंत शुभेच्छा! वयाचे अर्धशतक गाठत असलेल्या या लेखकाकडून एकापेक्षा एक सकस ग्रंथाची निर्मिती व्हावी ही सदिच्छा!
००००
तीर्थरुप: वनवासी जीवनाची गोष्ट: कादंबरी
लेखक :- संजय द. गोराडे
प्रकाशक :- घनश्याम पाटील
चपराक प्रकाशन, पुणे. (७०५७२९२०९२)
मुखपृष्ठ :- संतोष घोंगडे, पुणे
पृष्ठसंख्या :- १६८
किंमत :- ₹२५०/-
परिचय :- नागेश सू. शेवाळकर, पुणे
(९४२३१३९०७१)
खूपच सुंदर परिचय
जवाब देंहटाएं